ठाणे – ठाण्यात कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता ठाणे शहरात २ ते १२ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासोबत चर्चा करून संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतलाय.
वाचा – मोठी बातमी! महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवला, १ जुलैपासून ‘मिशन बिगिन अगेन २.०’
लॉकडाऊनच्या काळात शहरात केवळ मेडिकल, दवाखाने आणि दुग्ध दुकाने सुरू राहतील. याव्यतिरिक्त सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लॉकडाऊनची सूचना दिलीी होती. अनलॉक जाहीर झाल्यापासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत गेले. दाटीवाटीच्या वस्तूपासून मोठ्या सोसायट्यांमध्येही कोरोनाचा शिरकाव झाला. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर, कळवा, मुंब्रा, दिव्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ते भाग शोधून हॉटस्पॉट घोषित करून त्या भागांमध्येच बंद करण्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार, २२ ठिकाणीही निश्तित करून त्या ठिकाणांमधील हॉटस्पॉट ठरवण्यात आले. दरम्यान, त्यानंतर सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत केवळ हॉटस्पॉट बंद करून चालणार नसल्याचे प्रत्येक उपायुक्तांनी सांगितले. कारण या हॉटस्पॉटमधील नागरिक दुसऱ्या भागात ये जा करतात. त्यामुळे इतर भागातही कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे संपूर्ण ठाणे शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याबरोबर आयुक्तांची बैठक झाली.
२ जुलैपासून पुढील १० दिवस ठाणे शहरात संपूर्ण लोकडाऊन जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. @TMCaTweetAway
— Thane City Police (@ThaneCityPolice) June 29, 2020
काय राहणार बंद
लॉकडाऊनच्या काळात अंतर्गत रस्ते बंद राहणार. प्रत्येक महत्त्वाच्या स्पॉटवर पोलिसांचा खडा पाहारा असणार आहे. याशिवाय शहरातील किराणा मालाची दुकाने, इतर साहित्याची दुकाने, भाजी मार्केटदेखील बंद राहणार आहे. कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.
काय सुरू राहणार
लॉकडाऊनच्या काळात केवल दुधाची दुकाने, मेडिकल आणि दवाखाने सुरू राहणार आहेत. तसेच, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच या कालावधीतच ये जा करण्याच मुभा देण्यात आली आहे.