बेळगाव – वडिलांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा इतर कोणतेही वाहन न मिळाल्याने मुलांनी मृतदेह थेट सायकलवरुन स्मशानभूमीत नेला. ही घटना बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील हुबळी गावात घडली आहे. कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांनी वाहन देण्यास नकार दिल्याने मुलांना हा मार्ग पत्करावा लागला.
हुबळी गावात १५ ऑगस्टला एका ७० वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची तब्येत बिघडली. पण वृद्धाला दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जाण्यास एकही रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वृद्धावर उपचार होऊ शकले नाहीत आणि घरातच त्यांचा रात्रीच्या दरम्यान मृत्यू झाला.
या नंतर सकाळी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह स्मशानात नेण्यासाठी रुग्णवाहिका किंवा अन्य वाहन देखील मिळाले नाही. त्यामुळे मृत वृद्धाच्या कुटुंबीयांनी सायकलवरून मृतदेह स्मशानात नेण्याचा निर्णय घेतला. सायकलवरून स्मशानात मृतदेह नेण्यात येत असलेले पाहून ग्रामस्थही अवाक झाले.