नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना अद्यापही व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या आर्मी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. मेडिकल बुलेटीनद्वारे मुखर्जी यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिलीय.
दिल्ली छावणी स्थित ‘आर्मी रिसर्च अॅन्ड रेफरल हॉस्पीटल’च्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तज्ज्ञांची एक टीम माजी राष्ट्रपतींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार, ‘त्यांच्या वडिलांची प्रकृती पहिल्यापेक्षा चांगली असून स्थिर आहे’. रविवारी सोशल मीडियाद्वारे अभिजीत मुखर्जी यांनी ही माहिती दिलीय. ‘काल मी माझ्या वडिलांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. देवाच्या कृपेनं आणि तुम्हा लोकांच्या शुभेच्छांमुळे त्यांची प्रकृती अगोदरपेक्षा चांगली आणि स्थिर आहे. आम्हाला पूर्ण आशा आहे की ते लवकरच आपल्यासोबत असतील. धन्यवाद’ असं ट्विट अभिजीत मुखर्जी यांनी केलं होतं.
गेल्या सोमवारी १० ऑगस्ट रोजी प्रणव मुखर्जी यांना दुपारी १२.०७ वाजता गंभीर परिस्थितीत ‘आर्मी रिसर्च अॅन्ड रेफरल हॉस्पीटल’मध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुखर्जी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गुठळी आढळल्यानंतर प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूवर शस्रक्रिया (Life saving surgery) पार पडली होती. सोबतच प्रणव मुखर्जी करोना चाचणीत करोना संक्रमित असल्याचंही आढळलं होतं. ‘माननीय प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतही परिवर्तन आढळलेलं नाही. त्यांची प्रकृती स्थिर आहं आणि ते व्हेन्टिलेटरवर आहेत’ असं रुग्णालयाकडून जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटलंय.