नवी दिल्ली – राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत हरियाणाची युवा नेमबाज मनू भाकरने चमकदार कामगिरी करताना महिलांच्या 10 मीटर एअरपिस्तूल प्रकारात अव्वल क्रमांक मिळविला. तिने महिला आणि ज्युनिअर विभागात प्रथम क्रमांक मिळवून डबल धमाका उडवून दिला. 50 मीटर रायफल, थ्री पोझिशन प्रकारात अंजुम मोदीगलनेदेखील सुवर्णपदक जिंकले. मनूने सुवर्णपदक जिंकताना महिला विभागांत 242.1 गुणांची कमाई केली. याच गटांत 13 वर्षीय ईशा सिंहचा दुसरा क्रमांक लागला. तर अनुराधाने तिसरा क्रमांक मिळविला. महिला विभागांत अंजुम पाठोपाठ गायत्रीला रौप्य आणि महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतला कांस्यपद मिळाले. ज्युनिअर महिला विभागांत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात शिरीन गोदराने अचूक नेम साधताना सुवर्णपदक जिंकले. जेनाबला रौप्य आणि आयुषीला कांस्यपदक मिळाले.
