मुंबई – मुंबईत अखेर उद्यापासून मद्याची होम डिलिव्हरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यातून कंटेनमेंट झोनला वगळण्यात आलं आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश काढले असून शनिवारपासून घरपोच मद्य विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
घरपोच मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी दुकानं मात्र बंदचं असणार आहेत. सोशल डिस्टंसिंगचं पालन होत नसल्याने मद्याची दुकानं बंदचं ठेवली जातील, असं आदेशात म्हटलं आहे. तसंच होम डिलिव्हरी करताना देखील सोशल डिस्टंसिंगच्या सर्व नियमांचं पालन केलं जाईल, असं सांगण्यात आलं आहे.
याआधी राज्यात कंटेनमेंट झोन वगळून सशर्त मद्यविक्रीची परवानगी देण्यात आली होती. मात्र यामुळे तळीरामांनी मद्याच्या दुकानांबाहेर एकच गर्दी करत सोशल डिस्टंसिंगचा चांगलाच फज्जा उडवला होता. त्यामुळे सरकारने त्वरित हे आदेश मागे घेत मुंबईत मद्याची दुकानं बंद करण्यात आली होती.