लॉर्डस, लंडन- येथील ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर सुरू असलेल्या भारत – इंग्लंड क्रिकेट संघातील दुसर्या कसोटी सामन्यात आज दुसर्या दिवशी टीम इंडियाचा पहिल्या डावांत अवघ्या 107 धावांतच खुर्दा उडाला. पुन्हा एकदा इंग्लंडच्या तिखट मार्या समोर आणि स्विंग होणार्या चेंडूंसमोर भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सामन्यातील महत्त्वाची नाणेफेक इंग्लिश कर्णधार रुटने जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली.
त्याच्या या निर्णयाचा इंग्लिश वेगवान गोलंदाजांनी पुरेपूर फायदा घेत टीम इंडियाची दाणादाण उडविली. त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज अॅन्डरसनने अवघ्या 20 धावांत 5 बळी टिपून भारतीय फलंदाजी मोडीत काढली. त्याला वोक्सने 2 आणि ब्रॉड, कुरानने प्रत्येकी एक बळी घेऊन चांगली साथ दिली. भारताची सुरुवातच खराब झाली. सलामीची जोडी विजय-राहुल 10 धावांतच तंबुत परतले. मग यामधून भारतीय संघ शेवटपर्यंत सावरला नाही. पुजारा दुर्दैवीरित्या एक धाव काढून धावचित झाला.
कर्णधार कोहलीने कारण नसताना धाव घेण्याची चुक केली आणि त्याचा फटका पुजाराला बसला. कर्णधार कोहली-राहणेने 4 थ्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशीच ठरला. उपहाराला भारताने 2 फलंदाज गमवले. नंतर पुजाराला गमावले. तर चहापानानंतरच्या शेवटच्या सत्रात तब्बल 7 भारतीय फलंदाज माघारी परतले. उपहारापर्यंत अवघा 6.3 षटकाचा आणि चहापानापर्यंत आणखी 2 षटकांचा खेळ झाला. भारतातर्फे सर्वाधिक धावा अश्विनने केल्या त्याने 38 चेंडू खेळताना 4 चौकार मारून 29 धावा केल्या. कर्णधार विराटने 23, राहणेने 18 आणि शमीने 10 धावा केल्या इतर फलंदाजांना 2 आकडी धावसंख्यादेखील काढता आली नाही. पावसाने चहापानापर्यंत वारंवार सामन्यात व्यत्यय आणला. काल पहिल्या दिवशी पावसामुळे एकही चेंडूचा खेळ झाला नव्हता.
भारताने दुसर्या कसोटीसाठी पुजारा आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संधी दिली. तर शिखर धवन आणि उमेश यादवला विश्रांती दिली. इंग्लंडतर्फे पोपने कसोटीत पदार्पण केले. सामन्यावरील पंच मारएसीस यांचा आजचा हा 50 वा कसोटी सामना होता.
#INDvsENG second Test Match: England wins the toss and elects to field first. pic.twitter.com/IgLV9yHkiT
— ANI (@ANI) August 10, 2018