मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजाप पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे यांनी आज भाजपला रामराम ठोकला. त्यांनी पक्ष सोडला असल्याची अधिकृत माहिती राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी दिली तर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा का दिला याबाबत स्पष्टता व्यक्त केली. एकनाथ खडसे पक्ष सोडणार याबाबत बरेच दिवस चर्चा सुरु होती. मात्र 40 वर्ष एका पक्षात काम केल्याने ते दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत असं प्रत्येकाला वाटत होतं. मात्र तरीही त्यांनी पक्ष सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपच्या काही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
खडसे यांच्या भाजप सोडण्याने भाजप नेत्यांना धक्का बसला आहे. ही धक्कादायक बातमी असून ही पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे, असं आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तर खडसेंचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीय. तर मी यावर लगेचच प्रतिक्रिया देऊ शकणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’- मुनगंटीवार
माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, एकनाथ खडसेंनी भाजप सोडणं ही धक्कादायक बातमी आहे. ही पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे. खडसेंसारखा नेता ज्यांनी पक्षाची सेवा केली. मी निशब्द आहे. त्यांनी जाऊ नये असं वाटायचं, असं ते म्हणाले. ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’ असं म्हणत मुनगंटीवार यांनी ज्यांनी संघटनेवर प्रेम केलं. पक्ष वाढवला. त्यांचं जाणं नक्कीच जाणं चांगलं नाही, असं म्हटलं आहे. पक्षात अन्याय होतोय असं त्यांना वाटलं. पण मला वाटायचं की चर्चेतून होईल, हे धक्कादायक आहे. खूश रहो तुम सदा ये दुवा है हमारी. अन्याय झाला की नाही यावर चर्चेतून, संवादातून मार्ग निघू शकला असता. एकनाथ खडसे हे संघर्षशील, दिलदार मनाचे नेते आहेत, असं मुनगंटीवार म्हणाले.
दिल्या घरी सुखी राहावे – रावसाहेब दानवे
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की, एकनाथ खडसेंचा हा दुर्देवी निर्णय आहे. त्यांचं राजकीय करिअर भाजपमध्ये घडलं. काही कारणांनी ते मुख्य प्रवाहातून बाहेर गेले. ते जिकडे जात आहेत, त्या लोकांनीही त्यांच्यावर टीका केल्या आहेत. काही काळ त्यांनी वाट पाहायला हवी होती. त्यांच्याविषयी आदर आहेत. त्यांनी दिल्या घरी सुखी राहावे. त्यांना आम्ही वेगळं समजत नव्हतो. आम्ही चिंतन नेहमीच करतो. देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. आमच्यात मनभेद नव्हते, मतभेद होते. मतभेद सर्वच पक्षात असतात. राजकारणात अशा घटना घडत असतात. खडसे आणि फडणवीस हे चांगले मित्र होते. आमच्यात बिनसलं काही नव्हतं, असं दानवे म्हणाले. आम्ही खूप प्रयत्न केले की त्यांनी पक्षांतर करु नये. त्यांनी पक्षासाठी खूप केलं. पक्षानही त्यांना खूप दिलं, असंही दानवे म्हणाले.
एकनाथ खडसेंचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांना मिळाला : केशव उपाध्ये
एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्षांना मिळाला आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं. नाथाभाऊ जाऊ नये यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न केले. संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. खडसेंवर अन्याय झाला की नाही हा विषय व्यक्तिसापेक्ष आहे, असंही ते म्हणाले.
अधिकृत माहिती मिळालेली नाही : देवेंद्र फडणवीस
अधिकृत माहिती मिळालेली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.