मुंबई – कोरोनाच्या साथीने गेले पाच महिने मुंबईत तळ ठोकला आहे. पण हळूहळू कोरोनाने मुंबईतील काही विभागांमधून काढता पाय घ्यायला सुरुवात केल्याचे चित्र आहे. मुंबईत २४ पैकी २० वॉर्डांमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तर केवळ चार वॉर्डमध्ये रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा अधिक आहे.
मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा (डबलिंग रेट) कालावधी ८५ दिवसांवर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कालावधी वाढत असल्याने पालिकेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डांतील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतला असता, केवळ चार वॉर्डांतील रुग्णवाढीची टक्केवारी एक टक्के किंवा त्याहून अधिक असल्याचे समोर आले आहे. उर्वरित २० वॉर्डांतील रुग्णवाढीचा वेग कमी होत चालल्याचे दिसत आहे. बोरीवली (आर-मध्य), ग्रँट रोड (डी), फोर्ट, चंदनवाडी (सी), वांद्रे पश्चिम (एच पश्चिम) हे परिसर असलेल्या वॉर्डांमध्ये रुग्णवाढीचा वेग थोडा जास्त आहे.
इतर २० वॉर्डांत कोरोना संसर्ग प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्यापैकी सात वॉर्डांत दरवाढीचा दर अर्ध्या टक्क्यापेक्षा जास्त आहे. सांताक्रूझ (एच पूर्व), अंधेरी (के पूर्व) वॉर्डात प्रत्येकी ०.५६ टक्के आणि कुर्ला (एल) वॉर्डात रुग्ण दरवाढीचा दर ०.५१ टक्के आहे. तर दादर, धारावी भागात ०.७६ टक्के, तर वरळी, प्रभादेवी वॉर्डातील ०.७७ टक्के रुग्ण दरवाढ आहे. भायखळ्यातील ई वॉर्डात हे प्रमाण ०.८१ टक्के असून यापूर्वी वाढत्या संख्येने चर्चेत आलेल्या भांडुप एस वॉर्डमध्ये हे प्रमाण ०.५८ टक्के आहे.
वॉर्डनिहाय रुग्ण दरवाढीची स्थिती पुढीलप्रमाणे :-ग्रँटरोड (डी) – .४टक्के,बोरिवली (आर-मध्य) – १.३५ टक्के,चंदनवाडी (सी) – १.१८ टक्के,वांद्रे पश्चिम (एच पश्चिम) – १.११ टक्के, भायखळा – (ई) – ०.८१ टक्के,वरळी, प्रभादेवी (जी दक्षिण) – ०.७७ टक्के,दादर, धारावी (जी उत्तर) – ०.७६ टक्के,भांडुप (एस) – ०.५८ टक्के,अंधेरी (के पूर्व) – ०.५६ टक्के ,सांताक्रूझ (एच पूर्व) – ०.५६ टक्के, कुर्ला (एल) – ०.५१ टक्के इतका आहे.