मुंबई – -सामाजिक न्यायमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. त्या तरुणीने मुंडे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे. यानंतर त्यांच्यावर भाजपकडून टीकेची झोड उठली आहे. सोबतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: कबूल केलं आहे की, त्यांनी दोन लग्न केली आहेत. अनेक मुलं आहेत. तसंच तिसऱ्या महिलेशीही त्यांचे संबंध आहेत. त्यांनी हे देखील सांगितलं आहे की, त्यांनी पत्नी आणि मुलांच्या नावे अनेक प्रॉपर्टी घेतल्या आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात हे काही दिसत नाही, म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे या सर्व गोष्टींचा तपास व्हायला हवा, अशी तक्रार केली आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.