मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज याबाबत निर्णय घेतला. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे गेल्याने अनेक विरोधकांनी समाधान व्यक्त केलं. त्याचप्रमाणे महाविकासआघाडीतील युवा नेत्यानेही सीबीआयकडे प्रकरण गेल्याने सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवारांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी सुशांतच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच, पार्थ पवारांनी सत्यमेव जयते असं ट्विट केलं. पार्थ पवारांच्या या ट्विटला अनेक विरोधकांनी पाठिंबा दिलाय. पण पार्थ यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
सत्यमेव जयते!
— Parth Pawar (@parthajitpawar) August 19, 2020
पार्थ पवारांच्या ट्वीटला देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा
‘पार्थ पवारांनी काय ट्वीट (tweet) केले ते माहीत नाही. त्यांची मागणी आजोबांना आवडली, की नाही आवडली, यावर मला बोलायचे नाही. पण त्यांची सीबीआयची मागणी एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली. कदाचित याच कारणामुळे पार्थ पवारांनी ट्वीट केले असावे’, असे महाराष्ट्राचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुशांत प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नागरिकांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढेल. या प्रकरणात मुंबईत ज्या पद्धतीने हाताळणी झाली त्यावर राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असेही फडणवीस म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सुशांत प्रकरणी सीबीआय लवकर चौकशी करेल. त्याला आणि त्याच्या चाहत्यांना न्याय मिळेल, अशी आशा फडणवीस यांनी ट्वीट करुन व्यक्त केली.
सुशांतच्या कुटुंबाला आता न्या मिळेल- नितीश कुमार
या प्रकरणात बिहारने तेच केले जे कायद्याला धरून आहे. आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हे स्पष्ट झाले आहे की, बिहारमध्ये पूर्णपणे कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रियेचे पालन केले गेले. गुन्हा दाखल केला गेला, आणि त्यावर तपास सुरू झाला. जेव्हा सीबीआय चौकशीची मागणी झाली तेव्हा सीबीआय चौकशीची शिफारस केली गेली, सीबीआयने देखील शिफारस स्वीकारली, असे, नीतीश कुमार म्हणाले. सर्व प्रक्रिया न्यायाशी सुसंगत होती. या प्रकरणात आता सुशांतच्या कुटुंबाला न्याय मिळेल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.