नवी मुंबई – नवी मुंबईतील वाशी खाडीपुलावर काल रात्री 10 वाजेच्या सुमारास रवी रेड्डी या तरुणाने भांडण झाल्याने प्रेयसी समोरच वाशीच्या खाडीपुलावरून उडी मारली. तो मानखुर्द इथं राहणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी रेड्डी आणि त्यांची प्रेयसी दोघे वाशी खाडीपुलावर भांडत होते. दोघांमध्ये कुठल्या तरी मुद्यावरून कडाक्याचे भांडण झाले होते. भांडता भांडता रवी रेड्डी याने थेट खाडीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून तरुणीला देखील चक्कर येऊन पुलावरच पडली. पुलावर पडलेल्या या मुलीला पाहून पुलावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी पोलिसांना सांगितले.
त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलीस आणि वाशी पोलीस ठाण्याच्या दोघा कर्मचाऱ्यांनी कोळी बांधव महेश सुतार यांच्या मदतीने लागलीच होडीच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली. तेव्हा रवी रेड्डीचे शरीर पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. लागलीच तरुणाला होडीत घेऊन त्याच्या शरीरात शिरलेलं पाणी बाहेर काढल्यामुळे या तरुणाचे जीव वाचला.
यापूर्वी अनेकांचे जीव वाचवणाऱ्या महेश सुतार याचे पोलिसांनी कौतुक केले आहे. तर फोन येताच क्षणाचा ही विलंब न करता घटनास्थळी धाव घेणारे पोलीस कदम, खोत, दराडे आणि होमगार्ड जवान पाटील यांचे देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.