मुंबई – मुंबई स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात एनआयए कोठडीत असलेल्या सचिन वाझे यांनी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावर खंडणीचा आरोप केला आहे. त्यावर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?, असा सवाल पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.
अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का ? @OfficeofUT
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 7, 2021
सूत्रधार कोण हे शोधावं
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वाझे हे हिमनगाचं टोक आहे. मुख्य सूत्रधार वेगळाच आहे, हे हँडलर्स कोण आहेत. ते बाहेर येणं महत्त्वाचं आहे, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. या सर्व गोष्टी आता लवकर बाहेर येतील असंही त्यांनी म्हटलं आहे.
परबांवर आरोप काय?
सचिन वाझे यांनी आज एनआयए कोर्टात एक पत्रं देऊन परब यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. परब यांनी जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये मला बोलावून घेतलं होतं. यावेळी त्यांनी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी)कडून 50 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून 50 लाख रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो. तसेच चौकशीशी माझा काही संबंधही नव्हता, असं वाझेंनी या पत्रात म्हटलं आहे.
पालिकेच्या कंत्राटदारांकडून वसुलीचे आदेश
त्यानंतर परब यांनी जानेवारी 2021मध्ये पुन्हा मला बोलावून घेतलं. मुंबई पालिकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले. त्यांनी मला 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी कमीत कमी दोन कोटी रुपये वसूल करायला सांगितलं, असा दावा वाझेंनी केला आहे. अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी मला वसुली करायला सांगितल्याबद्द्ल मी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सांगितलं होतं. त्यावर सिंग यांनी या मागण्या मान्य करू नका म्हणून सांगितलं होतं, असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे.