मुंबई – आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून यावी अशी ऐतिहासिक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप येथे राहणारे कॅप्टन अमोल शिवाजी यादव यांनी भारतीय बनावटीचे पहिले 6 आसनी छोटे प्रवासी विमान बनविले आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. या भारतीय बनावटीच्या विमानाने टेक ऑफ व लँडिंगच्या चाचण्या कशा पूर्ण केल्या याचा व्हिडिओ सुद्धा दाखविला. तब्बल 20 वर्ष अमोल यादव हे आपले विमान बनविण्यासाठी आणि विमान कारखाना सुरू करण्यासाठी धडपडत आहेत.
वाचा – भारतीय लसीबाबत मोदींचे मोठे वक्तव्य, आजच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
या 6 आसनी विमानाने धावपट्टीवरून टेक ऑफ करण्याची आणि लँडिंग करण्याची चाचणी लीलया पार पाडली आहे. त्याचप्रमाणे हवेत सरळ विमान चालविण्याची चाचणीही यशस्वीरित्या पार पाडली आहे. आता एका विमानतळावरुन दुसऱ्या विमानतळापर्यंत विमान चालविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे, असे अमोल यादव यांनी सांगितले. अमोल यादव यांना हे विमान उडविण्याची डायरेक्टर जनरल ऑफ सिविल अविएशन कडून परवानगी मिळण्यास खूपच उशीर झाला.
वाचा – मुलींच्या विवाहाचं वय बदलणार, मोदींनी दिले संकेत
तसेच हे विमान उडविण्यासाठी विमा संरक्षण मिळणे सुद्धा तेवढेच आवश्यक होते. या दोन्ही बाबी पूर्ण झाल्यानंतरच आज त्यांनी आपले विमान प्रवासासाठी सिद्ध असल्याचे जाहीर केले. अमोल यादव यांनी 19 आसनी विमान तयार करण्यासाठी आपली “थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी” स्थापन केली आहे आणि त्यांना पालघर येथे सरकारने जागाही दिली आहे.