न्यूयॉर्क – भारतात फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर भारतीय जनता पक्षाचं नियंत्रण आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये छापून आलेल्या एका लेखाचा हवाला देत राहुल गांधींनी आरोप केला होता. तसेच, अमेरिकेच्या वृत्तापत्रातून भारतीय राजकीय पक्षावर आरोप करण्यात आल्याने अनेकांनी भाजपावर निशाणा साधला. तर, या लेखानंतर फेसबूकनेही अमेरिकन वृत्तपत्रात आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. राजकीय पक्ष किंवा राजकारण न पाहता आमची कंपनी आपले धोरण लागू करते, असे फेसबुकने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
“आम्ही द्वेषयुक्त भाषणे आणि हिंसाचार भडकवणारा कंटेंट प्रतिबंधित करतो. आम्ही कोणताही पक्ष किंवा राजकीय हितसंबंध पाहिल्याशिवाय आमच्या धोरणांची अंमलबजावणी करतो. आमच्या बाजूने आणखी काम बाकी असल्याची आम्हाला जाणीव आहे. परंतु आम्ही या धोरणांची अंमलबजावणी करण्यास आणि आमच्या प्रयत्नांचे नियमित मूल्यांकन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. जेणेकरुन निष्पक्षता आणि अचूकता कायम राहील” असे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण ?
प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका अहवालात फेसबुकवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फेसबुकने भाजप नेत्यांच्या द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक पोस्टवर कारवाई केली नाही, असा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी फेसबुक इंडियाच्या धोरण विभाग प्रमुख अनखी दास यांना जबाबदार धरण्यात आलं आहे.
भारतात या प्रकरणावरुन विरोधी पक्षांनी फेसबुक आणि भाजपला फैलावर घेतलं आहे. फेसबुकने द्वेषपूर्ण भाषण आणि पोस्टसाठी तयार करण्यात आलेल्या नियमांना फाटा देऊन भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई करणे टाळले. ही कारवाई करण्याला फेसबुक इंडियाच्या एका उच्च पदाधिकाऱ्यानेच विरोध केल्याचंही ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या या अहवालात म्हटलं आहे.