स्वराज यांचा पाकला डिप्लोमेटिक स्ट्राईक – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

स्वराज यांचा पाकला डिप्लोमेटिक स्ट्राईक

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या विरोधात घेतलेली भूमिका पाकिस्तानचा तिळपापड करणारी ठरली. कारण पाकिस्तान असे गृहित धरून चालला होता की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेच्या निमित्ताने भारताबरोबर चर्चेची सुरुवात करता येईल आणि आपण भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी कसे उत्सुक आहोत हे दाखवून देता येईल, परंतु पाकिस्तानच्या या ढोंगीपणाला भारत अजिबात भीक घालण्याची शक्यता नव्हती. कारण काश्मीरमध्ये उघडउघड दहशतवादाला पाठिंबा देणे, भारताविरुध्द दहशतवादी कट करणार्‍या अनेक दहशतवाद्यांना संरक्षण देणे एवढेच नव्हे तर त्यांचा हुतात्मा म्हणून गौरव करण्याचा प्रकार पाकिस्तानकडून अगदी उघडपणे होत आला. काश्मीरमध्ये बुरान वाणी याने दहशतीचे थैमान घातले होते. तो जेव्हा भारतीय लष्कराच्या गोळीबारात ठार झाला त्यावेळी पाकिस्तानमध्ये त्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले. एवढेच नव्हे तर आता पाकिस्तान सरकारने अधिकृतपणे बुरान वाणीचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीटच प्रकाशित केले आहे. इतक्या उघडपणे भारतविरोधी गरळ ओकण्याचे काम पाकिस्तानमध्ये सुरू असताना या देशाबरोबर शांततेसंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ शकत नाही. किंबहुना अशी चर्चा करणे भारतीय स्वाभिमानाला तिलांजली देण्यासारखाच प्रकार ठरतो. हा सगळा प्रकार उघडपणे होत असताना संयुक्त राष्ट्रसभेसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर शांततेचे सोंग घेणार्‍या पाकिस्तानचा बुरखा फाडणे अत्यंत महत्त्वाचे होते. सुषमा स्वराज यांनी नेमकी हीच संधी साधली. पाकिस्तान ज्या तथाकथित चर्चेचा आग्रह करीत आहेत, त्यासाठी हा देश कसा पात्र नाही आणि भारतविरोधी कारवाया पाकिस्तानकडून कशा सातत्याने सुरू आहेत हेदेखील यानिमित्ताने जगापुढे मांडता आले. कदाचित या दोन देशांतील चर्चेला जेवढे महत्त्व मिळाले नसते, तेवढे भारताने प्रखर शब्दांत व्यक्त केलेल्या नाराजीला मिळाले हे या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल. स्वराज यांनी आपले भाषण संपल्याबरोबर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची दखलही घेतली नाही. त्यांच्याकडे पाहिलेही नाही आणि हीच गोष्ट पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांना खटकली. त्यात आपला अपमान झाल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली, परंतु हीच गोष्ट सुषमा स्वराज यांना साधायची होती. जो देश दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले आहे किंवा जो देश दहशतवादाचेच समर्थन करीत आला आहे, त्याने भारतासारख्या देशाकडून यापुढे सन्मानाची अपेक्षाही ठेवू नये.

दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले

इकडे भारतामध्ये सर्जिकल स्ट्राईकच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त देशभरात काही ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले गेले. भारतीय लष्कराच्या या कामगिरीविषयी अभिमान बाळगण्यासाठी ‘पराक्रम पर्व’ या नावाने हे कार्यक्रम झाले. त्यामागे सत्ताधारी पक्षाचा राजकीय हेतू होता हे लपून राहत नाही, परंतु याच काळामध्ये संयुक्त राष्ट्रसंघात परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांना अशी काही वागणूक दिली की तोदेखील एक डिप्लोमेटिक स्वरूपाचा सर्जिकल स्ट्राईकच म्हणावा लागेल. नेहमी भारताबरोबर दर्पोक्तीची भाषा करणार्‍या या देशाच्या मंत्र्यांच्या मर्मावर आघात करणारी कृती सुषमा स्वराज यांनी करून दाखवली. लष्करी पातळीवर थेट कारवाई करण्याला जितके महत्त्व असते तितकेच परराष्ट्र व्यवहार सांभाळताना उत्कृष्ट अशा मुत्सद्देगिरीलाही असते. स्वराज यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला पुन्हा जबरदस्तपणे तोंडघशी पाडले आहे. केवळ शेजारी आहोत हा काही भारताचा गुन्हा ठरत नाही आणि शेजारी आहोत म्हणून आम्हाला कोणी इतक्या सहजपणे गृहितही धरू नये, अशी एकाच दगडात दोन पक्षी मारणारी कृती स्वराज यांनी करून दाखवली आहे. या सगळ्या प्रकाराने पाकिस्तानचा तिळपापड झाला आणि पाय आपटत पाकच्या मंत्र्यांनी भारताविरुध्द तक्रार करण्याचा पोरकटपणाही करून पाहिला, परंतु त्याला कोणी फारसे महत्त्व दिले नाही. या सगळ्या वागणुकीतून भारताने आपली प्रतिष्ठा केवळ जपली आहे असे नव्हे तर भारताशी सगळ्या प्रकारचे व्यवहार करताना पाकिस्तानला किती जबाबदारीने वागले पाहिजे याची जाणीव करून दिली आहे. अर्थात अशा वागणुकीतूनही पाकिस्तानच्या स्वभावात फार काही मोठा फरक पडेल अशी अपेक्षा ठेवण्याचेही काही कारण नाही. कारण आतापर्यंतचा अनुभव हेच सांगतो की तिथल्या राज्यकर्त्यांचे हात लष्कर आणि दहशतवाद्यांनी बांधलेले आहेत. केवळ पोपटपंची करणारे हे नेते एक व्यवहार किंवा उपचार म्हणून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असतात.

आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अपेक्षा

भविष्यकाळातही भारताला पाकिस्तानविषयी असेच कडक धोरण स्वीकारावे लागेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर हा देश काय पात्रतेचा आहे हे सातत्याने पटवून द्यावे लागेल. सुदैवाने गेल्या काही वर्षांत जगालाही भारताची भूमिका मान्य झाली आहे. केवळ चीनसारखा एखादा तिरपांगडा देश भारताबरोबरच्या मतभेदांची वसुली करण्याकरिता पाकिस्तानच्या बाजूने उभा राहतो, पण सगळे युरोपीय देश किंवा अमेरिका, रशियासारखे मोठे देशही भारताच्या भूमिकेचे समर्थन करीत आले आहेत. काश्मीरचा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होत असतो. त्याला आता जवळपास लगाम घातला गेला. पाकिस्तानने आपल्या व्यवहारात सुधारणा करावी. तिथल्या दहशतवादाला आळा घालावा, अशाच मागण्या आंतरराष्ट्रीय समुदायाकडून होऊ लागल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात नव्याने सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांनी भारताबरोबरचे संबंध सुधारण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे मत व्यक्त केले होते, परंतु नरेंद्र मोदी यांनी त्याची अजिबात दखल घेतलेली नाही. आताच सत्तेवर आलेले हे सरकार काही दिवस तिथे रुळले पाहिजे आणि या नव्या सरकारने सर्वप्रथम पाकिस्तानातील दहशतवाद संपवण्याचे आश्वासन दिले पाहिजे, अशी स्पष्ट अपेक्षा भारताने व्यक्त केल्याने पाकिस्तानची आणखीनच कोंडी झाली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय

कल्याण- कल्याण-डोंबिवली पालिकेने वारंवार लागत असलेल्या आगीमुळे आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला असून पालिकेकडून आता बारावे गावातील शास्त्रीय पद्धतीने राबवण्यात येणार्‍या...
Read More
post-image
देश

काँग्रेसच्या एसी, एसटी आमदारांच्या संख्येत दुपटीने वाढ

नवी दिल्ली – दलित मतदारांमध्ये नाराजी निर्माण झालेल्या या मोठ्या मतदाराला पुन्हा आकर्षित करण्यास काँग्रेस यशस्वी ठरली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांत...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

पुणे – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्चक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर पोलिसांची नजर राहणार आहे. राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फिंग,...
Read More
post-image
देश

‘मोदी हटाओ, योगी लाओ’ लखनऊत पोस्टरबाजी

लखनऊ – तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर लखनऊमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा असे पोस्टर झळकले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण...
Read More
post-image
देश

वेगळा धर्म म्हणून मान्यता जंतरमंतरवर जोरदार आंदोलन

नवी दिल्ली – लिंगायत समाजाला हिंदू धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, या मागणीसाठी आज दिल्लीच्या जंतरमंतरवर लिंगायत समाजाने जोरदार आंदोलन केले....
Read More