स्वयंउद्योजकतेचा ध्यास हाच कोकणाचा विकास – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

स्वयंउद्योजकतेचा ध्यास हाच कोकणाचा विकास

अवघ्या महाराष्ट्राला ज्याचा खरोखरीच अभिमान वाटावा किंबहुना भारताला लाभलेल्या विविध ठिकाणच्या निसर्ग सौंदर्यात ज्याची सन्मानाने गणना व्हावी आणि जिथली नैसर्गिक संपत्ती हीच समृध्दतेची शाश्वती वाटावी, असा प्रांत किंवा परिसर म्हणजे कोकण. काश्मीर, केरळ आणि त्याच्यानंतर कोकण अशी जरी क्रमवारी लावली तर ती चुकीची ठरणार नाही. या कोकण विकासाविषयी अनेक वेळेला अनेक प्रकारची चर्चा होते. उपक्रमांची, घोषणांची रेलचेलही होते, परंतु या समृध्दतेचा वारसा समजून घेण्याचा आणि त्या समृध्दतेला प्रत्यक्ष लोकोपयोगी करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. कोकणाचा विकास असा मुद्दा समोर आला की, अतिशय चाकोरीबध्द रितीने त्याचे विश्लेषण केले जाते. आंबा, फणस, काजू, सुपारी या व्यवसायाचे संवर्धन, मासेमारीला प्रोत्साहन आणि पर्यटनाचे आकर्षण अशा काही मर्यादित पैलूंचाच विचार होतो किंवा बाहेरून आणलेले मोठे उद्योग कोकणाच्या डोक्यावर बसवायचे आणि विकासाचे झेंडे मिरवायचे असाही एक प्रकार पाहायला मिळतो, परंतु आजच्या बदललेल्या काळाचा विचार केला तर कोकण विकासासाठी तितकीच मोठी झेप घेता येऊ शकते. ज्याप्रमाणे समाजातल्या प्रत्येक क्षेत्रात कोकणातल्या माणसाने आपली प्रतिभा सिध्द केलेली पाहायला मिळते. मग ते साहित्य असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, औद्योगिक क्षेत्रातही देशाच्या आणि जगाच्या अनेक भागांत कोकणातला माणूस गेला आणि त्याने आपले कर्तृत्व सिध्द करून दाखवले. जसा कोकणातला माणूस देशाच्या किंवा जगाच्या सर्व भागात पोहचला, त्या सर्व कोकणवासीयांना एकत्र करून कोकणाच्या विकासासाठी किंवा कोकणात आणण्यासाठी तितक्याच प्रगल्भ प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ मुंबईमध्ये स्टॉल्स उभारून आंबा महोत्सव करून किंवा कोकणच्या खाद्यपदार्थांच्या जत्रा भरवून विकासाचे गणित साध्य होणारे नाही. ज्येष्ठ साहित्यिक आणि एकाअर्थी कोकणाचे सुपुत्र असलेल्या मधु मंगेश कर्णिकांनी कोकण कॉनक्लेव्ह या कार्यक्रमात बोलताना फार सुंदर शब्दात त्याचे वर्णन केले. आजपर्यंत मुंबईच्या नरे पार्क किंवा शिरोडकर हॉलमध्ये होणारे कोकण मेळावे प्रत्यक्ष कोकणातील स्थानिकांना व्यवसाय संधीचा लाभ देऊ शकले नाहीत, परंतु काळाच्या बदलानुसार आणि जगाला कोकणाकडे आकृष्ट करण्याकरिता जर तितकाच दर्जेदार उपक्रम राबवला जात असेल, तर त्याचे स्वागत व्हायला हवे आणि आम्हालाही ते योग्यच वाटते.

विविध संधींचा सागर
कोकणातल्या नैसर्गिक संपत्तीचा हा वारसा तितक्याच श्रीमंतीने मिळवायचा असेल तर वैचारिक आणि कर्तृत्वाच्या बाबतीत अनाठायी निर्माण झालेला दरिद्रीपणाही दूर करावा लागेल. निसर्गसंपन्न या कोकणामध्ये तिथल्याच साधनसंपत्तीचा उपयोग करून तो उद्योगसंपन्न करता येऊ शकतो आणि अशा उद्योगांचे क्षितिज कोकणातल्या तरुणांना खुणावत आहे, हे काही उदाहरणांसकट जागतिक दर्जाच्या प्रकल्पांसकट दाखवावे लागेल. चंद्रमौळी झोपडीतला कोकणवासीय जेव्हा तारांकित उपाहारगृहातल्या आणि जगाला आमंत्रित करणार्‍या उद्योगांविषयी चर्चा करतो, विचारमंथन करतो त्याचवेळेला ते खर्‍या अर्थाने विकासाचेच कॉनक्लेव्ह ठरते. असा प्रयत्न होणे काळाची गरज आहे. कारण ज्या कोकणाचे भवितव्य नाणारमुळे बदलू शकेल असे आमिष दाखवले जाते, त्याचवेळी साडेतीनशेपेक्षा जास्त उद्योजक स्वत:च्या हिमतीवर कोकणातच स्वत:चे उद्योग सुरू करण्याचा आत्मविश्वास दाखवतात, तेव्हा तो जास्त आश्वासक वाटू लागतो. म्हणजेच कोकणाचा विकास हा तिथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर आधारित उद्योगांवर आणि कोकणातल्याच उद्योजकांच्याच आत्मविश्वासावर होऊ शकतो आणि हेच चित्र फार मोठे आश्वासक मानावे लागेल. कोकण हा किती विविध संधींचा सागर आहे, हे त्या त्या क्षेत्रातील व्यक्ती जेव्हा सांगतात, त्यावेळी ‘तुज आहे तुजपासी परि जागा चुकलासी’ असे म्हणण्याची वेळ येते. मग अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या जलदुर्गांना जोडणारा आरमारी मार्ग हादेखील पर्यटनाचा विषय होऊ शकतो किंवा खाड्यांमध्ये सी प्लेनसाठी विमान उतरवणारी विमानतळे उभारता येऊ शकतात किंवा फायबर निर्मित होड्यांचा प्रकल्प आकाराला येऊ शकतो. एवढेच नव्हे तर सी वर्ल्डसारखे प्रकल्प उभारून रोज किमान पाच हजार पर्यटकांना कोकणाकडे आकर्षित केले जाऊ शकते. अशा या प्रकल्पांची किंवा उद्योग व्यवसायांची अगणित यादी लांबवता येते.

तोच शाश्वत विकास
मराठी माणूस एकमेकांचे पाय ओढतो असे म्हटले जाते, परंतु कोकणातला माणूस एकत्र आला तर तो या कोकणाला नंदनवन बनवू शकतो, ही गोष्टदेखील तितकीच सिध्द करता येईल. यासाठीच त्याच्यातला आत्मविश्वास जागवून जागतिक स्तरावर कशी संधी आहे हे दाखवून देणारे त्याच दर्जाचे कॉनक्लेव्ह तरुण वयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिनेश कानजी आणि समीर गुरव आयोजित करीत असतील तर ते पुन्हा एक नवे आव्हानच स्वीकारत आहेत, असे म्हणावे लागते. आज संपूर्ण कोकणामध्ये स्थानिक माणसाने उभारलेल्या उद्योगांचीच गरज आहे. सरकारने अलीकडेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात अडाळी येथे सातशे एकर जागा एक मोठी एमआयडीसी उभारण्याकरिता संपादित केली आहे. गोव्यामध्ये आकाराला येत असलेल्या मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 25 किलोमीटरवर असलेली ही एमआयडीसी कोकणातल्या स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देणारी ठरू शकते आणि असे कोकण विकासासाठी कोकणातल्याच माणसाने तिथल्याच साधनसंपत्तीवर आधारित उभारलेले उद्योग हाच शाश्वत विकास ठरू शकतो. नाणार, जैतापूरपेक्षाही तिथला माणूस सर्व दृष्टीने संपन्न होणे अधिक महत्त्वाचे ठरते. याकरिता जगातल्या कोकणवासीयांना कोकणात आणणारे कॉनक्लेव्ह कोकणातच यापुढे घेण्याची गरज आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More