‘सर्जिकल स्ट्राईक’चा वाढदिवस साजरा करणे ही बुद्धीची दिवाळखोरी! – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

‘सर्जिकल स्ट्राईक’चा वाढदिवस साजरा करणे ही बुद्धीची दिवाळखोरी!

भाजपा हा इतरांपेक्षा वेगळा पक्ष आहे अशी जनतेला आशा वाटली आणि केंद्रात भाजपाची सत्ता आली. पण सत्ता आल्यानंतर भाजपा सरकारने भलत्याच विषयात रस घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे 2014 नंतर 2019 सालच्या निवडणुकीसाठी भाजपाला विकासाचा मुद्दा सोडून प्रचारावर लक्ष केंद्रित करावे लागत आहे. भाजपाने विकासाचा मुद्दा तर गुंडाळलाच, पण कोणत्या मुद्यांचा प्रचार करावा याचा विवेकही पक्षाकडून हरवत चालला आहे. प्रमोद महाजनांच्या ‘इंडिया शायनिंग’च्या प्रचाराने भाजपाची सत्ता गेली, यातून कोणताही बोध न घेता सफाईपासून सर्जिकल स्ट्राईकपर्यंत नको तो ढोल वाजविण्याचा निर्णय अमित शहा यांनी घेतला आहे. पण हा ढोल वाजणार नाही तर निश्चितपणे फाटणार आहे.

भाजपाने सत्तेसाठी प्रचाराचा धुमाकूळ घालायचा हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. जे घडले नाही किंवा जे नेहमी घडते ते आम्ही केले असा वायफळ प्रचार सुरू झाला की जनतेला सत्याची जाणीव होते. इतकेच नव्हे तर असा गैरप्रचार करणारा पक्ष सत्तेसाठी बिथरला आहे हेही जनतेच्या लक्षात येते. मग ही जनता दुबळ्या बिथरलेल्या पक्षाला कधीच मतदान करीत नाही, याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे.

भाजपाने याच आठवड्यात 29 सप्टेंबरला देशभरात ‘सर्जिकल स्ट्राईक’चा वाढदिवस वाजतगाजत साजरा करण्याचा अत्यंत लज्जास्पद निर्णय घेतला आहे. शनिवारी 29 सप्टेंबरला सर्व वाहिन्यांवर याच विषयाचे कार्यक्रम, वृत्त देण्याचे आदेश गेले आहेत. या दिवशी रेडिओवर भक्तीपर गाणी लावण्यास सांगितले आहे. राजधानी दिल्लीत इंडिया गेटवर भल्या मोठ्या पडद्यावर कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे. इतकेच नव्हे तर या दिवसाचे थिम साँग तयार होत आहे. हा सर्व प्रचार डोळे दिपवणारा असणार हे निश्चित आहे पण हा प्रचार मन सुन्न करणाराही आहे. पाकिस्तानवर केलेल्या गुप्त लष्करी हल्ल्याचा प्रचार करायचा असतो का? लष्करी हालचालींचे असे प्रदर्शन मांडायचे असते का? पाकिस्तानमध्ये घुसून आपल्या सैन्याने त्यांची ठाणी उडविली याच्या चित्रफिती तयार करून त्याचे प्रक्षेपण वाहिन्यांवरून करणे योग्य आहे का? भारताच्या लष्कराने पूर्ण गुप्तता पाळून पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे असे प्रदर्शन मांडायचे ही अत्यंत विकृत मानसिकता आहे. हे प्रदर्शन मतांसाठी मांडायचे हा तर विकृतीचा कडेलोट आहे. देशाबद्दल आणि भारतीय लष्कराबद्दल अभिमान जागृत व्हावा म्हणून आम्ही हा दिवस साजरा करीत आहोत, असा भाजपाकडून युक्तीवाद होईल. पण हा अभिमान जागृत करायचा असेल तर रोज देशभक्तीपर गाणी ऐकवा. आपले जवान घरी परततात तेव्हा गावागावांत त्यांचा सन्मान करा, त्यांच्या कुटुंबाला प्रथम कुटुंबाचा मान द्या, जवानांना मिळणार्‍या सुविधा आणि शस्त्रास्त्र यात वाढ करा, एक वर्षाचे लष्करी प्रशिक्षण सक्तीचे करा. आपला एक जवान रोज सीमेवर शहीद होतो आहे. रोज एक पार्थिव भारताच्या झेंड्यात लपेटून गावी येते आहे. हे यापुढे घडणार नाही यासाठी जे करणे गरजेचेे आहे ते करायला हवे. या गोष्टी जेव्हा होतील तेव्हा त्याच्या प्रचारालाही मान्यता मिळेल. परंतु रोज एक वीरपत्नी टाहो फोडते, रोज एका मातेचा हंबरडा चित्त विचलित करतो अशा परिस्थितीत सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार करून काय मिळविणार आहात? 29 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राईक केल्याची दवंडी पिटविणार आहात. त्याआधी असे हल्ले कधीही झाले नाहीत असे म्हणणार आहात का? सैन्याच्या गुप्त कारवाया सतत सुरू असतात, गुप्त चर्चा सतत सुरू असतात. या गुप्त कारवायांतूनच शाश्वत विजय मिळतो. त्यासाठीच या कारवाया आणि चर्चा गुप्त ठेवली जाते. पण आता गुप्त कारवायांचाही इव्हेन्ट केला जाणार आहे. लष्कर प्रमुख अलीकडे पत्रकार परिषदा घेऊन किती दहशतवादी ठार केले याचे आकडे सांगू लागले आहेत. आजवर लष्कर प्रमुख फक्त स्वातंत्र्य दिनी जनतेला पडद्यावर दिसायचे. आता ते प्रत्येक हल्ल्यानंतर पत्रकार परिषद घेताना दिसतात. लष्कर प्रमुख बिपीन रावत वाहिन्यांना मुलाखती देऊन सांगतात की, आम्ही पाकिस्तानला घाबरत नाही. हा सर्व पोरखेळ थांबायला हवा. लष्कर प्रमुखांचे असे बुजगावणे करणे शोभते का?

भाजपा सरकारचे राजनैतिक अपयश या सर्वाला कारणीभूत आहे. हे अपयश लपविण्यासाठी सैन्याला दावणीला बांधून निवडणुकीसाठी प्रचार करायचा हे लांच्छनास्पद आहे. उरी भागात दहशतवाद्यांनी हल्ला करून आपले 18 पोलीस मारले. त्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून त्यांची ठाणी उडविली. भारताच्या जनतेला जेव्हा कळले तेव्हा जनतेला समाधान वाटले. सर्जिकल स्ट्राईक झाला की नाही अशी शंका एकाही भारतीयाच्या मनात आली नाही. भारतीय लष्करावर जनतेचा पूर्ण भरवसा आहे. तरीही 29 सप्टेंबरच्या या गुप्त कारवाईची चित्रफित काही वाहिन्यांपर्यंत पोहचवून त्याची ब्रेकिंग न्यूज करण्यात आली हे दुर्दैव आहे. आमच्या जवानांच्या शरीराची विटंबना केली जात आहे. पोलिसांना घरात घुसून ठार मारले जात आहे, रोज सीमेवर दहशतवादी हल्ले होऊन भारतमातेचे सुपुत्र शहीद होत आहेत. ही वृत्तंं ऐकून आमची मने हेलावून जातात. डोळ्यात अश्रू तरळतात. हे रोज घडत असले तरी लष्कर याला चोख प्रत्युत्तर देईल असा प्रत्येक भारतीयाला विश्वास आहे. पण लष्कराला केंद्राचे सरकार पुरेसे बळ देते आहे का? हा प्रश्न मनात येतो. ही शंका पुसून काढण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकच्या चित्रफिती दाखविण्याची गरज नाही. केंद्र सरकारने लष्कराला सक्षम केले की त्याचे परिणाम दिसतीलच. सीमेवरचा दहशतवाद कमी झाला हे जनतेला जाणवेल तेव्हाच जनता सरकारचे गोडवे गाईल. तोच खरा प्रचार ठरेल. मात्र हे न करता सर्जिकल स्ट्राईकचा वाढदिवस साजरा करायचा आणि तिकडे सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांशी चर्चेचे नियोजन करायचे हे स्वत:चे हसे करून घेण्यासारखे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोंबडी, अंडी शाकाहारी माना! संजय राऊत यांची मागणी

मुंबई – ‘अंडे शाकाहारी की मांसाहारी’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. पण याचे ठोस उत्तर काही अद्याप सापडलेले नाही. मात्र शिवसेना खासदार...
Read More