(संपादकीय) स्टार्टअप उद्योगांचा गळा घोटू नका – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) स्टार्टअप उद्योगांचा गळा घोटू नका

एंजल टॅक्स वरून उद्योगक्षेत्रात रोष पसरला आहे. सरकार एका बाजूने लोकानुनयासाठी जीएसटीत बदल करीत असताना दुसर्‍या बाजूने उद्योगांचा गळा घोटत असल्याची टीका होऊ लागली आहे. केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने देशातील तब्बल 2000 स्टार्टअप उद्योगांच्या मालक व गुंतवणूकदारांना नोटिसा पाठविल्याने हा रोष पसरला आहे. एंजल टॅक्स स्टार्टअप अर्थात नव्याने सुरू झालेल्या विशेष उद्योगांच्या मालकांना व गुंतवणूकदारांना लागू होणारा एक विशिष्ट कर आहे. हा कर 2012 पासून लागू आहे, पण तो दंडासह भरण्याची सक्ती आता सुरू करण्यात आली आहे. भारतात 14000 स्टार्टअप असल्याचे सांगतात. त्यातील 2000 कंपन्यांना आतापर्यंत दंडासह कर भरण्याच्या नोटिसा पाठविल्या गेल्या आहेत. स्टार्टअप सुरू करणार्‍याकडे मोठे भांडवल नसते. त्याच्याकडे असते ती उद्योगात परावर्तित होऊ शकेल अशी एक भन्नाट कल्पना. मग तो माणूस कुटुंबीय, नातेवाईक, मित्र यांच्याकडून वित्त उभारणी, भांडवल उभारणी करतो. याप्रसंगी काही लोक धाडसाने पुढे येऊन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतात. त्यात त्यांना मोठी जोखीम पत्करावी लागते. उद्योग वाढला तर मोठा नफा होण्याची शक्यता असते. मात्र उद्योग अडचणीत आल्यास मोठा तोटा सहन करावा लागतो.

अमेरिकेसारख्या देशामध्ये या स्टार्टअपच्या माध्यमातून नवनवे उद्योग पुढे आले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाले. तशी उद्योगप्रवणता देशात निर्माण व्हावी म्हणून सरकारने स्टार्टअपचा मोठा गवगवा केला. मात्र आता तिजोरीत खडखडाट होताच, त्यांच्या कोवळ्या गळ्याला सरकार नखे लावत असल्याची टीका होते आहे. स्टार्टअपकडून 30 टक्के कर आणि 20 टक्के दंड वसूल केला तर कितीतरी उद्योग कायमचे बंद होतील. सरकारला हे कळत नाही असे नव्हे, पण निवडणुकीचे वर्ष तोंडावर असल्याने सत्तेची गणिते जुळविण्यात सरकार हे घातकी पाऊल उचलत आहे. धाडसी गुंतवणूकदारांनी स्टार्टअपच्या भांडवलासाठी दिलेली रक्कम ही त्या स्टार्टअपचे उत्पन्न समजून त्यावर कर आकारण्याची ही अत्यंत चुकीची पद्धत असल्याचे जाणकार सांगतात. एखाद्या व्यक्तीने एखाद्या उद्योगात एक कोटी रुपये गुंतवले असतील तर त्यावर 30 टक्के कर आणि 20 टक्के दंड असे मिळून उद्योगास सरकारकडे 50 लाख रुपये जमा करावे लागतील, हे अत्यंत भयानक आहे. यामुळे तो उद्योग वरती येणे असंभवनीय असून तो बंद होण्याची शक्यताच अधिक दिसते. स्टार्टअपची सर्व मिळून गुंतवणूक दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त नसल्यास त्यांना करसवलत दिली असल्याचे कळते, मात्र ज्या अमेरिकेच्या धरतीवर आपल्याकडे स्टार्टअप सुरू झाले ते पाहता उद्योग मोठे करायचे असतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सक्षमपणे उभे करायचे असतील तर दहा कोटींची मर्यादा ही फारच छोटी मर्यादा आहे. शिवाय स्टार्टअपने घेतलेली जोखीम पाहता अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणात कर व दंड करणे अन्यायकारक ठरते.

सरकारने जर अशी अघोरी वसुली केली तर हे उद्योग बुडतील. ते पुन्हा उभे राहू शकणार नाहीत. एक तर कोणतीही आर्थिक सुबत्ता नसताना अनेक जण या उद्योगात धाडसाने उतरले आहे. काही भांडवलदारांनी अधिक जोखीम घेऊन या उद्योगात गुंतवणूक केली आहे. दरवर्षी तीनशे ते चारशे उद्योगांना काही धाडसी गुंतवणूकदार देवदूत बनून अर्थसहाय्य करीत आले आहेत. तेसुद्धा अडचणीत येतील. शिवाय अशा प्रकारे गुंतवणूक करण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही. स्टार्टअप हा उद्योगवाढीसाठी निर्माण केलेला फॉर्म्युला होता. सरकारला त्याचा आता विसर पडला आहे काय? हे उद्योग बंद झाले तर गुंतवणूकदार आणि उद्योजक दोघेही नष्ट होतील. कोणी उद्योगात उतरण्याचे धाडस करणार नाही. चांगल्या कल्पना मरून जातील. जगाच्या स्पर्धेत आपण मागे पडू. याचे भान ठेवून सरकारने याचा पुनर्विचार केला पाहिजे.

सरकारने एंजल टॅक्सच्या नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली त्याचे मुख्य कारण- सरकारी महसुलात घट झाल्याने- सरकारी तिजोरीत झालेला खडखडाट हे आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट का झाला हेही आपण पाहिले पाहिजे. आर्थिक भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन सत्तेत आलेल्या भाजपाने गेल्या काही वर्षांत सरकारी कंपन्या, सरकारी बँका यामधील आर्थिक गैरव्यवहारांना योग्य तो पायबंद घातला नाही. काळ्या पैशाचा मुद्दा सतत लावून धरणार्‍या भाजपाने काळया पैशाबाबत योग्य ती पावले उचलली नाहीत. करात बदल करून जीएसटी लागू केला त्यातून पुरेसा महसूल गोळा झाला नाही. एकूण सरकारी अपयशामुळेच तिजोरीत खडखडाट झाला आहे आणि निवडणूक समोर असल्यामुळे मतांच्या राजकारणाचा विचार करता महसूल वाढविण्याचे असे वेगळे मार्ग सरकार शोधू पाहते आहे. हे एंजल टॅक्सवरून स्पष्टच दिसते.

भारत हा तरुणांचा देश आहे. त्यांच्या मतावरच भाजपा सत्तेत आली. पण आता तरुणांच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होते आहे असे दिसते. बेरोजगारी प्रचंड आहे. सरकारला त्याचे फारसे भान नाही असेच दिसते. मोठ्या प्रमाणावर असलेल्या तरुण वर्गाच्या कल्पनांना चालना देणारा स्टार्टअपसारखा चांगला उपाय अंमलात आणला गेला होता. असे आणखी काही मार्ग चोखाळून बेरोजगारांच्या हाताला काम आणि त्यांच्या कल्पना वास्तवात याव्यात यासाठीची काही मदत सरकारने देऊ केली पाहिजे. मात्र बरोबर उलट्या दिशेला जाऊन सरकार काम करू लागल्याचे आढळते. प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेला हा तरुण वर्ग बेरोजगारीने त्रस्त आहे. अशा वेळी त्यांच्यासाठी नवनव्या संधी उपलब्ध करून देता आल्या नाहीत तर किमान स्टार्टअपमधून तरुणांना मिळणारी चालना लक्षात घेऊन त्यांचे गळे घोटण्याचे पाप तरी सरकारने करू नये अशी आता अपेक्षा केली जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News देश

अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस, पी.व्ही.सिंधू, मेरी कोम यांना पद्मविभूषण

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार जाहीर केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, माजी...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रेडी मिक्स सिमेंटच्या 12 प्लांटवर कारवाई! ठाणे पालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – ठाण्यातील बेकायदा रेडी मिक्स सिमेंट प्लांटविरोधात ठाणे महापालिकेने मोहीम हाती घेतली असून 18 पैकी 12 प्लांटवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ही कारवाई...
Read More
post-image
News विदेश

कोरोना व्हायरसची जगभरात दहशत! चीनमध्ये 41 जणांचा मृत्यू

दिल्ली – कोरोना व्हायरसची जगभरात दहशत निर्माण झाली आहे. चीनमध्ये सुमारे 41 जणांचा या विषाणूजन्य संसर्गाने मृत्यू झाला आहे. या रोगाचा प्रसार होऊ नये...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगडावरील वाघ्याचा पुतळा हटवणारे निर्दोष

माणगाव- छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरील समाधीच्या मागे असलेला वाघ्याचा पुतळा हटवल्याच्या खटल्यात संभाजी ब्रिगेडच्या 73 जणांची माणगाव सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी शुक्रवारी निर्दोष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

अंबाबाई आणि जोतिबा मंदिराचे होणार स्ट्रक्‍चरल ऑडिट

कोल्हापूर – करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर आणि श्री जोतिबा मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट (इमारत संरचना पाहणी) लवकर केली जाणार आहे. दोन्ही मंदिराचे स्ट्रक्‍चरल ऑडिट स्ट्रक्टवेल...
Read More