(संपादकीय) सीबीएसईच्या कार्यक्षमतेची गुणवत्ता – eNavakal
आघाडीच्या बातम्या शिक्षण संपादकीय

(संपादकीय) सीबीएसईच्या कार्यक्षमतेची गुणवत्ता

 

केंद्रीय परीक्षा मंडळाच्या म्हणजे सीबीएसईच्या दहावी, बारावी परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करण्यापासून ते बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींनी बाजी मारल्याचेही निकालांमधून स्पष्ट झाले. सीबीएसईचा अभ्यासक्रम म्हटल्यानंतर तो अधिक कठीण असतो. आणि राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रश्नपत्रिकांपेक्षा बर्‍याच कठीण असतात असे अनेक पालक आणि विद्यार्थ्यांचेही निरीक्षण आहे. परिणामी सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे ही एक कसोटी असते. शिवाय अधिक गुणवत्ता मिळवणे तितकेच महत्त्वपूर्ण मानले होते. सीबीएसईतर्फे राबवला जाणारा अभ्यासक्रम असेल किंवा ठरलेल्या मुदतीत निकाल जाहीर करण्याची या मंडळाची परंपरा असेल याचीदेखील तितकीच दखल घेतली पाहिजे. किंबहुना सीबीएसईच्या कार्यक्षमतेचे कोणकोणत्या पध्दतीने अन्य शिक्षण मंडळांना किंवा शिक्षण संस्थांना अनुकरण करता येईल याचादेखील गांभीर्याने विचार व्हायला हवा. अगदी या दोन्ही परीक्षांच्या निकालानंतर सीबीएसईची काही ठळक वैशिष्ट्येे समोर आली आहेत तिच्याकडे जरी एकनजर टाकली तरी या परीक्षेत गुणवत्ता मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असतेच. परंतु सीबीएसईने म्हणजेच त्या मंडळाने स्वतःच्या कार्यक्षमतेची एक गुणवत्ता सिध्द केलेली आहे. हेसुध्दा स्पष्ट होते. अगदी सहजपणाने लक्षात येणारी गोष्ट म्हणजे 4 एप्रिलला दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर संपला आणि पुढच्या अक्षरशः 6 दिवसात सगळ्या उत्तरपत्रिका तपासून ठरलेल्या दिवशी निकाल जाहीर करण्याचा एकाअर्थी विक्रमही या मंडळाने केला. अन्य शिक्षण मंडळांच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ठरलेल्या वेळेत होत नाहीत.निकालाची तारीख जरी जाहीर झालेली असली तरीसुध्दा सीबीएसईच्या चोख कारभाराचा प्रत्यय राज्य मंडळाच्या परीक्षांबाबत येत नाही. म्हणजे परीक्षा संपल्यानंतर विशिष्ट मुदतीमध्ये उत्तरपत्रिका तपासून पूर्ण करणे त्यासाठी पेपर तपासणार्‍यांची तितकीच मोठी कुमक तैनात करणे आणि कोणतीही अडचण निर्माण झाली तरीसुध्दा पर्यायी व्यवस्थेतून ठरवलेले लक्ष्य गाठणे हे तितकेसे सोपे काम नसते. पण योग्य नियोजन नसेल तर या गोष्टी प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत.

दीड कोटी उत्तरपत्रिकांची तपासणी 

या पार्श्वभूमीवर निदान या वर्षी सीबीएसईने आपल्या कार्यक्षमतेचा जो परिचय दिला आहे. त्याचा निश्चितच विचार करणे क्रमप्राप्त ठरते. संपूर्ण देशभरातून  थोडेथोडके नव्हे तर एक कोटी सदुसष्ट लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे आव्हान परीक्षा मंडळासमोर होते. या उत्तरपत्रिका तपासण्याकरीता एक लाख पाच हजार शिक्षकांची फौज तयार ठेवली गेली. आणि रोज सरासरी पाच सहा हजार उत्तरपत्रिका तपासण्याचे काम पार पाडले जात होते. साधारणपणे प्रत्येक उत्तरपत्रिका ही बारा जणांच्या नजरेखालून जात होती. संपूर्ण देशभरामध्ये तीन हजार पाचशे उत्तरपत्रिका तपासणी केंद्र कार्यरत राहिली. हे सगळे नियोजन इतक्या काटेकोरपणे पाळले गेले की केवळ सोळा दिवसांत उत्तरपत्रिका तपासणीचे काम हाता वेगळे केले आणि निकालही वेळेवर जाहीर झाले. गेल्यावर्षीपेक्षा यंदा पेपर तपासणार्‍यांची संख्या चाळीस टक्क्यांनी वाढवली गेली होती. यामधून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की परीक्षांचे नियोजन काटेकोरपणे झाले तर कोणत्याही प्रकारचा गोंधळ उडण्याची शक्यता राहात नाही. महाराष्ट्रात आपण गेल्या अनेक वर्षापासून उत्तरपत्रिका तपासणीमधील गोंधळ अनुभवित आलेलो आहोत. विद्यापीठ स्तरावर तर इतका अतिरेक झाला. की शेवटी मुंबई विद्यापीठाच्या तत्कालिन कुलगुरुंना राजीनामा देणे भाग पडले होते. अजूनही परिस्थिती फार सुधारली आहे असे म्हणता येत नाही. म्हणूनच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसई परीक्षांचे हे नियोजन अनुकरण करण्यासारखे आहे. त्यांच्यातर्फे जी कार्यपध्दती अवलंबली जाते त्याचा अभ्यास अगदी राज्यशिक्षण मंडळाने किंवा मुंबई विद्यापीठाने आवर्जून केला पाहिजे. एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि त्याप्रमाणात पेपर तपासणार्‍या शिक्षकांची आवश्यकता याचे गणित मांडून पेपर वेळेवर तपासून पूर्ण करण्याची व्यवस्था करता येऊ शकते. त्यातून निकालही वेळेवर लागू शकतात काही गोष्टींचे अनुकरण हे जर संस्थेचीच गुणवत्ता वाढवणारे असेल किंवा विद्यार्थ्यांचे हित साधणारे असेल तर त्याचा तातडीने अवलंब केला पाहिजे.

विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला न्याय 

सीबीएसई मार्फत राबवलेल्या या मोहीमेचे आम्ही एवढ्यासाठीच वर्णन करीत आहोत की विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या अभ्यासाचा योग्य तो परिणाम साधता येतो. कारण ज्या परिश्रमाने विद्यार्थी अभ्यास करतात किंवा गुणवत्ता मिळवण्याकरीता वर्षभर झटत असतात त्याची तितक्याच गांभीर्याने दखल घेतली जाणे किंवा मूल्यमापन होणे गरजेचे ठरते. विशेषतः दहावी बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा निर्णायक टप्पा असतो. या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तितक्याच अभ्यासपूर्वक तपासल्या जाणे त्यात विद्यार्थ्यांच्या चुका तपासताना तपासणार्‍यांकडून चुका होणार नाहीत याची काळजी घेतली जाणे खूप महत्वाचे आहे. ज्यावेळेला एखाद्या विद्यार्थ्यांला 99 टक्के मिळवण्याची अपेक्षा असते. त्यावेळी तो विद्यार्थी जेव्हा दोन तीन विषयात अनुत्तीर्ण झाल्याचे दाखवले जाते. तेव्हा त्या विद्यार्थ्यांची आणि एकूणच त्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल याचा विचार झाला पाहिजे. वर्षभर राबून विद्यार्थी परीक्षा देत असतील तर किमान महिनाभर तितक्याच परिश्रमाने या उत्तरपत्रिकांची तपासणी होणे अत्यंत अनिवार्य ठरते. कोणताही ढिसाळपणा न करता विद्यार्थ्याच्या परिश्रमाला आणि अभ्यासाला खर्‍या अर्थाने न्याय देण्याचे अतिशय महत्वाचे काम या उत्तरपत्रिका तपासणार्‍या शिक्षकांना करायचे असते. ही गोष्ट खरी आहे की उत्तरपत्रिकांच्या या मूल्यमापनासाठी त्यांनादेखील तितकाच मोबदलाही मिळाला पाहिजे. विशेषतः यावेळच्या सीबीएसईच्या कालबध्द नियोजनातून निश्चितच एक उदाहरण घालून दिले आहे. कोट्यवधी विद्यार्थी काही लाख उत्तरपत्रिकांचे तपासनीस आणि सोळा दिवसात निकाल घोषित होण्याची सिध्दता यामधून सीबीएसईने स्वत:चीही गुणवत्ता सिध्द केलेली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More