(संपादकीय) सारस्वताच्या दरबाराला शुभचिंतनाचे तोरण  – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) सारस्वताच्या दरबाराला शुभचिंतनाचे तोरण 

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची झालेली बिनविरोध निवड हा महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातला नवा इतिहास म्हणावा लागेल. कारण केवळ बिनविरोध नव्हे तर निवडणूक न होता त्यांची सर्वानुमते निवड करण्याचा श्रीगणेशा झाला आहे. साहित्य संमेलन म्हटल्यानंतर निवडणूक आणि मग त्याच्याशी संबंधित येणारे असंख्य आणि अद्भूत वाद असे त्याचे स्वरूप ठरून गेले होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोणी व्हावे, यावर एकमत होऊ नये, त्यासाठी राजकीय थाटाची निवडणूक व्हावी ही खरे तर विवेक भ्रष्टतेचीच लक्षणे होती. गेल्या काही वर्षांपासून साहित्यविश्वातली गुणवत्ता लक्षात घेतली जावी आणि त्यामधून मान्यवर अशा साहित्यिकाला सन्मानाने हे अध्यक्षपद सर्वानुमते दिले जावे, अशी मागणी किंवा चर्चा सुरू झाली होती. परंतु माणूस जितका ज्ञानी किंवा शिकलेला असतो, तितका त्याच्यामध्ये अहंकारही जास्त असतो. शिवाय दुसर्‍याला मोठेपणा देताना आवश्यक तो विनयसुध्दा पाहायला मिळत नाही. अशाच अहंकाराच्या आणि स्वयंभू गुणगौरवाने मंडित झालेल्या लेखकांनी, साहित्यिकांनी निवडणुका लढवून अध्यक्षपद मिळवले. परंतु ज्यांना अशा निवडणुकीत रस नव्हता किंवा आपला विवेकनिष्ठपणा सोडायचा नव्हता त्यांनी निवडणुकांपासून दोन हात लांब राहाणेच पसंत केले होते. अशा या निवडणूकग्रस्त अध्यक्षपदाचा गुंता सुटावा आणि चक्क सर्वानुमते संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड व्हावी हे अक्षरश: आश्चर्य आणि नवल म्हणावे लागेल. म्हणजे आतापर्यंत जे घडू शकले नाही. अगाचि घडलेच नाही पासून ते अगा नवल वर्तले असा हा अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रवास म्हणावा लागेल. म्हणूनच अरुणा ढेरे यांचे अभिनंदन करण्यापूर्वी बिनविरोध निवड करणार्‍या किंवा अशी परंपरा सुरू करण्याचा पुढाकार घेतलेल्या संबंधितांचे आम्ही प्रथमत: मन:पूर्वक अभिनंदन करतो. अशा या निष्पक्ष किंवा सर्वानुमते पार पडलेल्या प्रक्रियेमुळे मराठी साहित्य आणि साहित्यिक यांच्याविषयी जनमानसातला आदर नक्कीच वाढीला लागेल. साहित्य हे समाजजीवन प्रबुध्दी किंवा समृध्द करण्याचे प्रभावी माध्यम मानले जाते. परंतु या साहित्याची धुरा वाहणार्‍यांकडूनच मतभेदांचे राजकारण होऊ लागले आणि संमेलन हा केवळ देखावा ठरू लागला. ‘अमृताते पैजा जिंके’ असा सार्थ अभिमान व्यक्त करणार्‍या ज्ञानेश्वर माऊलींपासून मराठी भाषेचा गौरव होत आलेला आहे. त्या संपन्न मराठी सारस्वतांच्या दरबाराला दिवाळीपूर्वी खर्‍या अर्थाने शुभचिंतनाचे तोरण बांधले गेले आहे.
यवतमाळ आणि ग.दि. माडगूळकर 
अरुणा ढेरे यांची निवड आणखी एका कारणासाठी महत्त्वाची ठरते. आतापर्यंत झालेल्या नव्वदपेक्षा जास्त साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केवळ चारच महिला सन्मानित होऊ शकल्या. अरुणा ढेरे या पाचव्या महिला अध्यक्ष झाल्या आहेत. साहित्य विश्वात स्त्री-पुरुष असा भेद असण्याचे कारण नाही. असे कितीही म्हटले गेले तरीसुध्दा स्त्री जाणिवा आणि स्त्री अनुभवांच्या आधारावर निर्माण होणार्‍या साहित्याची एक स्वतंत्र ओळख मान्य करावी लागते. परंतु संशोधन किंवा लेखनाच्या गुणवत्तेत हा फरक राहात नसला तरी कसदार आणि टोकदार अनुभवासाठी हा विशेष लक्षात घ्यावा लागतो. हे संमेलन यवतमाळमध्ये होत आहे. 1973 साली झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद ग.दि. माडगूळकर यांनी भूषवले होते. त्यांच्याच जन्मशताब्दी वर्षात त्यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या यवतमाळमध्ये साहित्य संमेलन व्हावे, हा सहज घडून आलेला योगायोग म्हणावा लागेल. त्यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात माडगूळकरांनी मांडलेला विचार आज विशेष लागू पडतो. कारण आज लोकसंख्येमध्ये असलेले नवतरुणांचे प्रकार आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेले साहित्य लिहिले गेले पाहिजे. त्यांनी म्हटले होते की, दूर खेड्यात व तालुक्याच्या जागी असलेल्या या उमलत्या साहित्यिकांना नागरी तरुणा इतकी विचित्र निराशा आली नसावी. त्या साहित्यिकांना आणि प्रतिभेचे देणे लाभलेल्या सर्व  तरुणांना आम्ही असे आवाहन करतो की, नवसाहित्याच्या लाटेत वाहून जाण्याआधी तुम्ही जुन्या वाड्मयाचे परिशीलन करा त्यातले काही तुमच्यातला स्वाभिमान प्रकर्षाने जागृत करील. साहित्यिक नावाच्या हस्तिदंती मनोर्‍यातून तुमच्या मनाला खाली उतरवील. त्यांचे हे शेवटचे वाक्य साहित्यिकांनी निर्माण केलेल्या हस्तीदंत मनोर्‍यालाही लक्ष्य करणारे होते. त्यांचा हा विचार चिंतन आणि लेखन याचे मर्मग्राही विवेचन करणारा ठरतो. अशा चिंतनाचे संचित लाभलेल्या अरुणा ढेरे यवतमाळच्या साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा व्हाव्यात म्हणजे ग.दि. मांचा हा विचार त्यांच्याकडून अधिक परिपुष्ट होईल, असे म्हणायला हरकत नाही.
भाषा ही कामधेनू
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड इतक्या चांगल्या पध्दतीने झाल्यानंतर आता यवतमाळला होणारे साहित्य संमेलनही तितक्याच उंचीचे आहे. ज्यामध्ये साहित्यिक आणि वाड्मयीन पैलूंचाच सर्वाधिक विचार व्हावा. राजकारण्यांच्या भाऊगर्दीला तिथे स्थान असता कामा नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजातल्या काही घटनांचा परामर्थ घेत असतानाच संमेलनाचे अध्यक्षपद शोभेचे ठरणार नाही, असा एक नवा मानदंड अरुणा ढेरे यांनी निर्माण करावा. कारण बर्‍याच अनुकूल परिस्थितीमध्ये किंवा सहमतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच साहित्यातल्या विविध प्रकारांचे सौहार्द घडवणारे कार्यक्रम या संमेलनात व्हायला हरकत नाही. कारण मराठी भाषा ही इतकी मृदू, तरल, आणि संवेदनशील आहे की, तिचा प्रभाव निश्चितच मनाला वेगाने स्पर्शून जातो. सातशे वर्षांपूर्वी लिहिला गेलेला ज्ञानेश्वरीचा ग्रंथ माऊली म्हणूनच ओळखला जातो. म्हणूनच 1933 साली नागपूरला भरलेल्या साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षपदावरून बोलताना कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर म्हणाले होते की, वेदांमध्ये भाषेला धेनू असे म्हटले आहे. आणि ही धेनू रोजच्या व्यवहारात लागणारे दूध तर देतेच, पण तसेच भक्त मिळाल्यास हीच भाषा कामधेनूही होते. मराठी भाषा कामधेनू होण्याकरिता तिच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या भक्तांची आज खरोखर आवश्यकता आहे. यवतमाळमधून भाषेच्या या मातृवत संवर्धनाचा प्रयत्न पुन्हा नव्याने सुरू झाला पाहिजे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

322 पीएसआय पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा! भरती प्रक्रियेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या 322 पोलीस उपनिरीक्षक पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरती प्रक्रियेत पूर्व आणि मुख्य परिक्षांतील आरक्षणाचा मुद्दा...
Read More
post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More