(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा वारंवार उपस्थित होणार्‍या या मुद्द्याचे निराकरण कसे करणार हा प्रश्न अनुत्तरित राहतो. सर्वोच्च न्यायालयाला या याचिकेमध्ये तथ्य वाटले नाही. किंवा पन्नास टक्के ईव्हीएमच्या सोबत असलेल्या प्रत्यक्ष मतपत्रिकेशी पडताळणी करण्याचीही गरज सर्वोच्च न्यायालयाला वाटली आहे. याचा अर्थ ईव्हीएम मशिनमध्ये कोणत्याच प्रकारचा गोंधळ नाही असा निष्कर्ष काढणेही चुकीचे ठरते. पुढच्या दोन दिवसात देशभरातल्या पाचशे बेचाळीस मतदारसंघातले निकाल जाहीर होतील. निकालाचे चित्र काहीही असले तरीसुध्दा ईव्हीएम मशिनने निर्माण केलेले संशयाचे धुके दूर करण्याची जबाबदारी निवडणुक आयोगाला स्वीकारावी लागेल. मशिनमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही. हे पटवून देण्याचे काम आतापर्यंत अनेकवेळा निवडणूक आयोगाने केले आहे. तरीदेखील त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका करताना जे जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्दांचा स्वतंत्र परामर्ष निवडणूक आयोगाने स्वतःहून घेतला पाहिजे. उलट त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संधी न देता सगळ्या विरोधी पक्षांची स्वतंत्र बैठक निवडणूक आयोगाने बोलवायला काहीच हरकत नव्हती. ते केवळ विरोधी पक्षीय आहेत. म्हणून त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांची तक्रार अगदीच तथ्यहीन आहे. असा निवडणूक आयोगाने समज करून घेणेदेखील चुकीचे ठरते. विशेषतः निवडणूक प्रक्रियेविषयी राजकीय पक्षांच्या शंका कुशंका असतील त्याचे निराकरण करणे केवळ नैतिकच नाही तर कायदेशीर जबाबदारीसुध्दा निवडणूक आयोगाचीच आहे. आतापर्यंत निवडणूक आयोगाने व्यापक भूमिका का स्वीकारली नाही किंवा विरोधी पक्षांना समजून घेण्याची तयारी का दाखवली नाही. असेदेखील प्रश्न निर्माण होतात. आयोगाने आपला निपक्षपातीपणा कायम ठेवला पाहिजे आणि सर्व राजकीय पक्षांचा विश्वास संपादन केला पाहिजे. ज्या भारतीय लोकशाहीचे आपण वारंवार कौतुक करत असतो. त्या लोकशाही व्यवस्थेत जर निवडणूक प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्व असेल तर त्या प्रक्रियेशी सर्वाधिक पारदर्शकता टिकवून ठेवणे हेदेखील निवडणूक आयोगाचे कर्तव्य ठरते.

आयोगाची विश्वासार्हता

ही गोष्ट तर निश्चितच आहे की निकाल जरी लागले तरी ईव्हीएम मशिनच्या अनेक तांत्रिक बाबी म्हणजेच त्याचे वेगवेगळे तांत्रिक दोष समोर येण्याची दाट शक्यता आहे. यावेळेला तर व्हीव्हीपॅट सुविधेमुळे प्रत्येक मतदार संघातील पाच केंद्रांवरच्या मतपत्रिकांची आणि ईव्हीएम मशिनमधील मतदानाची प्रथमच पडताळणी होणार आहे. यामध्ये थोडाफार जरी फरक आढळून आला तरीसुध्दा संपूर्ण ईव्हीएम मशिनविषयी शंका उपस्थित होऊ शकेल. किंबहुना या लोकसभा निवडणुकीचे वेगळ्या अर्थाने भवितव्य ठरवण्याचे काम ईव्हीएम मशिन करणार आहे. कदाचित संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या निकालाला स्थगिती मागण्याचा अभूतपूर्व प्रकारही विरोधी पक्षांकडून होऊ शकतो. गेल्या दोन महिन्यापासून विरोधी पक्षांनी सातत्याने ईव्हीएम मशिनबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. त्यातल्या तांत्रिक बाजूंचे निराकरण करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला. आता तर पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट मशिनबरोबर पडताळणी होणार असल्याने त्याबाबत विरोधी पक्ष अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर असे वाटते की यंदाची लांबलेली निवडणूक प्रक्रिया निकाल प्रक्रियासुध्दा लांबवेल. एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष लोकसभा निकालांपेक्षाही किंवा लोकांनी केलेल्या प्रत्यक्ष मतदानाच्या चर्चेपेक्षाही ईव्हीएम मशिनची प्रणाली एका मोठ्या चर्चेचा मुद्दा ठरू शकेल. म्हणजेच कोणाला किती विजय मिळाला. किती जागा मिळाल्या. यापेक्षाही ईव्हीएम मशिनने कसे काम केले यावरही सर्वाधिक चर्चा रंगण्याची शक्यता आहे. 542 मतदारसंघातील उमेदवारांपेक्षाही एकूणच लोकशाहीचे भवितव्य हे ईव्हीएम मशिन ठरवेल. अशा प्रकारचे वातावरण निर्माण झालेले दिसून येते. ज्याअर्थी विरोधी पक्ष इतक्या आत्मविश्वासाने ईव्हीएम मशिनविषयी शंका उपस्थित करीत आहेत त्याअर्थी त्यांच्याकडे अजून सबळ पुरावे असले पाहिजेत हे सिध्द होते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन निवडणूक आयोगानेसुध्दा पूर्व तयारी करून ठेवायला हवी. जे गोपनीय मतदान देशाचे भवितव्य घडवते. ते ईव्हीएम मशिन त्याच गोपनीयतेची विश्वासार्हता पणाला लावेल असे म्हणायला हरकत नाही.

ईव्हीएम मशिनविषयी निकाल

भारताच्या इतिहासात म्हणजेच स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान प्रक्रियेविषयी विरोधी पक्ष इतक्या मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेला दिसून येतो. किंबहुना पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. याबद्दल निवडणूक आयोगाला सोयीस्करपणे मौन बाळगता येणार नाही. शंकांचे निरसन करता येत नसेल तर विरोधी पक्षांच्या प्रश्नांचा अभ्यास करणारी तज्ज्ञांची समिती निवडणूक आयोगाने नेमायला हरकत नव्हती. कारण यामुळे केवळ ईव्हीएम मशिनविषयी प्रश्न उपस्थित होत नाहीत तर त्यानिमित्ताने निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा पणाला लागते आहे. या लोकशाही व्यवस्थेतली ही प्रमुख यंत्रणा म्हणून निवडणूक आयोग काम करते त्यावेळी सामान्य मतदारापासून ते सर्व राजकीय पक्षांपर्यंत सर्वांच्या मनात आयोगाविषयी आदर आणि विश्वास असणे गरजेचे ठरते. यापूर्वीच्या निवडणुकांच्यावेळी ईव्हीएम मशिनविषयी कधीच शंका उपस्थित झाली नाही. आणि मग ती आतासुध्दा इतक्या आक्रमकपणे पुढे येत आहे याचादेखील खुलासा व्हायला हवा. ज्या ईव्हीएम मशिनमधून लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील त्या ईव्हीएम मशिनविषयीचा निकाल या निवडणुकीत सर्वाधिक महत्त्वाचा ठरेल. म्हणूनच निकालानंतरची खरी कलाटणी ईव्हीएम मशिनच्या निमित्ताने मिळण्याची शक्यता वाटू लागते. आजच्या निवडणूक निकालासाठी देशभर लोकांचीदेखील उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. त्याबाबतचा उत्साह कायम ठेवत असतानाच निवडणूक आयोगाला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा सामना करण्याची वेळ येऊ शकते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 कर्णधार कोहलीचे शानदार अर्धशतक

लंडन – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अपराजित असलेल्या भारतीय संघाचा मुकाबला तगड्या वेस्ट इंडिज संघाशी होत आहे. वेस्ट इंडिज संघाबाबत काहीच भाकीत करणे कठीण आहे पण...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षण वैध, मात्र १६ टक्के आरक्षण नाही

मुंबई – ज्या ऐतिहासिक न्यायालयीन निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते त्या मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आज २७ जून २०१९ रोजी आपला निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

बॉम्बच्या धोक्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लॅंडिंग

लंडन – एअर इंडियाच्या बी777 फ्लाइट ए-191 या मुंबई-नेवार्क विमानाचे लंडनमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. बॉम्बच्या धोक्यामुळे या विमानाचे लंडनच्या स्टॅनस्टेड विमानतळावर इमर्जन्सी लॅंडिंग...
Read More
post-image
विदेश

शिंजो आबे आणि पंतप्रधान मोदींमध्ये बुलेट ट्रेनबाबत चर्चा

ओसाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले. ओसाका विमानतळावर मोदी-मोदी आणि वंदे मातरमच्या घोषणा देऊन मोठ्या उत्साहात त्यांचे...
Read More
post-image
देश

कॉंग्रेस-सीपीएमने ममतांची भाजपा विरोधातील ऑफर नाकारली

कोलकाता – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला हरवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते....
Read More