(संपादकीय) भारतीय राजकारणाचेही उत्तरायण – eNavakal
लेख

(संपादकीय) भारतीय राजकारणाचेही उत्तरायण

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढत असतानाच अनेक राजकीय पक्ष आपापल्या शेकोट्या पेटवून राजकीय ऊब निर्माण करत असल्याचे दिसून आले. दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची झालेली सभा आणि त्यात पुन्हा एकदा रामाला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची सुरू झालेली तयारी तर दुसरीकडे लखनऊत मायावती आणि अखिलेश यादव म्हणजेच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांनी एकत्र येऊन निवडणूक लढण्याची केलेली घोषणा म्हणजे जणुकाही सत्तेचा मायावी मृग निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. भाजपाचा राम जर या मायावी मृगाच्या पाठीमागे लागला तर पुन्हा एकदा भाजपाला वनवास किंवा रावणाबरोबरचे युध्द खेळावे लागेल. राजकारणामध्ये काहीही घडू शकते आणि याबाबतीत भारतीय राजकारणाचा हात कोणीही धरू शकत नाही. पंचवीस वर्षांपूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू असल्याची शपथ घेतलेल्या सपा बसपाने एकत्र येण्याची करामत करून दाखवली आहे. म्हणजे दिल्लीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वेगवेगळी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करीत असताना सपा – बसपाने मात्र एकत्र येण्याचे ऐलान करून किमान उत्तर प्रदेशसाठी तरी प्रश्न निर्माण करून ठेवला आहे.

हातातून गेलेली सत्ता राजकारण्यांना कशा पध्दतीने अस्वस्थ करू शकते किंवा कोणत्या थराला जाऊन निर्णय घ्यायला लावू शकते, याचे हे उत्तम उदाहरण म्हणायला हवे. उत्तर प्रदेश हा एक आणखी राजकीय चित्रविचित्र राजकारण खेळणारा वेगळाच प्रदेश ठरतो. प्रादेशिक स्तरावर सपा- बसपा यांनी आपापले स्थान निर्माण केले आहे, यात काही शंका नाही. या दोन्ही पक्षांना आपापला वकुब माहिती असल्याने आणखी अडचणी येण्यापूर्वीच त्यांनी शहाणपणा केलेला दिसतो. लोकसभेच्या अडतीस – अडतीस अशा जागांचे वाटप करून भाजपा आणि काँग्रेस या दोघांनाही समान अंतरावर ठेवण्याचा प्रयोग केला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाच्या हाती सत्ता जाऊ नये, असा आमचा उद्देश असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. हे म्हणत असतानाच काँग्रेसपेक्षाही उत्तर प्रदेशात सपा-बसपाची ताकद जास्त असल्याचे त्यांनी नकळतपणे स्पष्ट केलेले दिसून येते.

पाण्यात पाहाणारे एकाच पाळण्यात
पुढचा महिना हा संपूर्ण देशभर राजकारणाच्या पतंगबाजीला उधाण आणणारा ठरेल. संक्रांतीच्या आधीपासूनच प्रत्येकजण आपापली ताकद आजमावून घेताना दिसून येतो. प्रत्येकजण स्वतःवर येणारी राजकीय संक्रांत टाळण्याकरीता तयारी करीत आहे. सत्तेच्या गुळासाठी तत्वांचे तीळ बाजूला ठेवली जात आहे. हे या सगळ्याच आघाड्या किंवा महागठबंधन किंवा वेगवेगळ्या समझोत्यावरून स्पष्ट होते. सपा-बसपाची उत्तर प्रदेशातली युती हे भाजपापुढे आव्हान आहेच. परंतु या दोन्ही पक्षांनी काँग्रेसप्रणित महागठबंधनमध्ये जायला नकार देऊन महागठबंधनला मोठाच धक्का दिला. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या जवळपास 80 जागा आहेत. त्यातल्या जवळपास 76 जागा या दोन्ही पक्षांनी एकमेकांमध्ये वाटून घेतल्या आहेत. उरलेल्या चार जागा काही मित्र पक्षांना देण्याचा त्यांचा हेतू आहे.

याचा अर्थ आजच्या घडीला उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार हे स्पष्ट होते. आता या मतविभाजनाचा नेमका फायदा कोणाला होईल, हे जसजसे राजकीय वातावरण तापत जाईल, तसे स्पष्ट होईल. जर हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले असते तर भाजपाला त्याचा अधिक लाभ मिळाला असता. परंतु या दोघांच्या एकत्र येण्यामुळे भाजपाच्या परंपरागत मतपेढीवर संक्रांत आल्यासारखीच परिस्थिती आहे. ज्या आत्मविश्वासाने या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला दिसतो त्यावरून उत्तर प्रदेशातले वातावरण बर्‍यापैकी बदललेले दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकीतील परिस्थिती आता राहिलेली नाही त्याचे हे संकेत म्हणायला हवेत. एक गोष्ट मात्र खरी की राजकारणात काळदेखील आपला सूड उगवत असतो. सतत पंचवीस वर्षे एकमेकांना पाण्यात पाहाणारे हे दोन पक्ष आता एकाच पाळण्यामध्ये आलेले आहेत. यावरून सत्ता किंवा बदललेली राजकीय परिस्थिती कशी नवी समिकरणे मांडायला भाग पाडते. हेही हळूहळू स्पष्ट होते. काँग्रेसने या दोघांच्या युतीमुळे मोठाच धसका घेतला. परंतु पराभव मान्य करायचा नाही. या उद्देशाने महागठबंधन उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा जिंकेल, असे स्वतःचे समाधान करून घेणारे विधान काँग्रेसला करावे लागले आहे.

महिनाभरात रणधुमाळी
संक्रांतीला उत्तरायण सुरू होते. कदाचित राजकीय उत्तरायणालाही सुरुवात झालेली दिसते. भाजपा आणि सपा-बसपा या पक्षांनी उत्तर भारतातूनच ठोकलेल्या राजकीय ललकार्‍या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचीच सुरुवात ठरतात. पुढच्या महिनाभरामध्ये आचारसंहिताही लागू होईल. वेळ कमी असल्यामुळे आणि भाजपाला पराभूत करण्याचे मोठे आव्हान असल्यामुळे प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष जिथे मिळेल तिथे युती आणि समझोते करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. कदाचित याच परिस्थितीचा अंदाज घेऊन भाजपाने बिहारमध्ये आधीच तिथल्या जनता दलाशी युती करून ठेवली. एवढेच नव्हे तर जागा वाटपाचा फॉर्म्युलाही नक्की केला आहे. या निवडणुकीचे हेच मोठे वैशिष्ट्य राहील की महागठबंधन विरुध्द राष्ट्रीय आघाडी. यातून काही घटक पक्ष जरी गळाले असले तरी आपली परिस्थिती अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. 2014 ला मोदी या व्यक्तिमत्वाभोवती निवडणूक फिरत होती. यावेळी मात्र मोदी सरकारने केलेल्या कामाची कसोटी पाहिली जाईल. कदाचित म्हणूनच स्वतः नरेंद्र मोदी यांनी एकट्या मोदीवर अवलंबून न राहाता पक्षकार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन केले आहे. म्हणजेच अनेक प्रश्नांचे आव्हान समोर असल्यामुळेच एकाअर्थाने भारतीय राजकारणाचेही उत्तरायण सुरू झाले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उद्धव ठाकरेंनी खासदारांसह घेतले रामलल्लांचे दर्शन

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More