(संपादकीय) फळांच्या राजाला रासायनिकतेचा शाप – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) फळांच्या राजाला रासायनिकतेचा शाप

फळांचा राजा म्हणून आंबा ओळखला जातो. वर्षातून एक दोन महिनेच या राजाला खरा मान मिळतो किंवा तो राजा आपल्यावर प्रसन्न राहावा असा प्रयत्न एका विशिष्ट हंगामामध्ये केला जातो. देशाच्या सर्व भागामध्ये साधारणपणे एप्रिल ते जून , जुलै अखेरपर्यंत आंब्याची प्रचंड आवक होते. निसर्गाच्या प्रक्रियेमुळे आंबा पिकण्यासाठी हाच मोसम योग्य ठरत असल्याने या काळात जिकडे तिकडे भरघोस आंबा पाहायला मिळतो. निसर्गाची ही किमया इतकी विलक्षण आहे की या फळाच्या नुसत्या दर्शनाने मन तृप्त व्हावे इतकी त्यामध्ये ताकद असल्याचे जाणवते. दुसरे वैशिष्टय म्हणजे हा आंबा प्रत्येकाला प्रिय असतो. आंबा किंवा आमरस न आवडणारे लोक शोधूनही सापडणार नाहीत. म्हणजेच अन्य फळांपेक्षाही आंबा खाणारे किंवा आमरसावर ताव मारणार्‍यांची संख्या सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळेल. म्हणजे सर्वाधिक लोकांकडून खाल्ला जाणारा असा सर्वप्रिय आंबा यासाठीच राजा या नावलौकिकाला शोभून दिसतो. वेगवेगळ्या जातीचे आंबे देशाच्या वेगवेगळ्या भागात पाहायला मिळतात. त्यातल्या चवीसुध्दा वेगवेगळ्या असतात. अगदी काही ठिकाणी आंबट आमरस असला तरी तिथेदेखील त्यात साखर घालून हमखासपणे खाल्ला जातो. किंवा खान्देश विदर्भसारख्या परिसरात आमरस हा आंबट असेल असे गृहित धरून पुरणपोळीसोबत खाल्ला जातो. म्हणजेच सर्वप्रिय किंवा सर्वाधिक आवडणारा हा आंबा हे एकूणच भारतीयांना मिळालेल्या निसर्ग संपदेचे एक वेगळेच वैशिष्टय म्हणावे लागते. असा हा फळांचा राजा स्वतःचा मान मिरवत असताना त्याच्या या लौकिकाला गालबोट लावण्याचा उद्योगही तितक्याच मोठ्या प्रमाणात सुरू झालेला पाहायला मिळतो त्यावेळी अति लोकप्रियता कशी घातक ठरू शकते. हे फळांच्याबाबतही दिसून येते.

कोकण आणि हापूस

विशेषतः मुंबई किंवा कोकण या परिसरामध्ये हापूस आंव्याचा जो काही दबदबा पाहायला मिळतो तो देशातल्या इतर कोणत्याही भागात पाहायला मिळणार नाही हे आम्ही तितक्याच छातीठोकपणे सांगू इच्छितो म्हणजे आंबा म्हटल्यावर हापूस असे समीकरण केले जाते. त्याप्रमाणेच हापूस म्हटल्यावर कोकणचा हापूस हेदेखील तितक्याच ठामपणे गृहितही धरले जाते. अलिकडे देशाच्या अनेक भागात हापूस आंबा पिकवण्याचे प्रकार होतात. पण चवीमध्ये निश्चितपणे फरक पडतो. याचा अर्थ इतर आंबे अगदी बेचव असतात असे आम्हाला म्हणायचे नाही. परंतु हापूस आंब्याची जागा इतर फळ घेऊ शकत नाही. त्यातही कोकणचा हापूस हा एक काही वेगळाच दर्जा आणि प्रकार असतो. भारतातून एका विशिष्ट काळामध्ये सर्वाधिक प्रमाणात निर्यात होणारा फळ प्रकार म्हणूनही आंब्याचे वर्णन करावे लागेल. एवढेच नव्हे तर सर्वाधिक किंमत खेचणारा हा एकमेव प्रकार म्हटला तरी चालेल जवळपास पाच हजार रुपये डझनाच्या भावाने हा आंबा परदेशात निर्यात होतो. म्हणजे जवळपास सहाशे रुपयाला एक आंबा असे साधारण त्याचे स्वरुप राहाते. आम्हाला वाटते की जगातले असे कोणतेही फळ नाही की ज्याची किंमत अशा पध्दतीने होत असावी. अर्थात या निर्यातीचा एक तोटा आहे की, भारतातल्या सर्वसामान्य माणसाला तो दर्जेदार आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. अगदी तो भाव देण्याची तयारी असतानाही तो क्वचितच उपलब्ध होतो. दिवसेंदिवस आंब्याची लोकप्रियता वाढताना दिसते. शिवाय त्यापासून बनवल्या जाणार्‍या इतर प्रकारांमध्येही भर पडली आहे. सतत मागणी वाढत गेल्यामुळे आता आंब्याचा पुरवठा करतानाही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होऊ लागल्याचे दिसते. अर्थात ही तक्रार सगळ्याच बाबतीत पाहायला मिळते. परंतु याचा संबंध लोकांच्या शरीराशी असतो. अशा फळांबाबत किंवा खाद्यपदार्थांबाबत तितकेच सावधान राहाण्याची गरज आहे. केवळ मागणी आहे म्हणून त्याचा गैरफायदा घ्यायचा किंवा पुरवठा टिकवून ठेवण्याकरीता वाटेल त्या तडजोडी करायच्या हे अत्यंत अयोग्य ठरते. म्हणजे राजा म्हणवल्या जाणार्‍या आंब्याबाबत जेव्हा हा प्रकार घडतो तेव्हा त्याच्या प्रतिमेला आणि प्रतिष्ठेला धक्का लावण्याचे कारस्थानच या फळाचे शत्रू करीत राहातात असे म्हटले तरी चुकीचे राहाणार नाही. मग अगदी रासायनिक पध्दतीने आंबे पिकवण्यापासून ते अयोग्य पध्दतीने आंब्यांचे उत्पादन करण्यापर्यंत अनेक प्रकार सुरू झाल्याचे दिसून येते.

आरोग्याशी खेळ

दरवर्षी या गैरप्रकारांमध्ये वाढ होत असल्यामुळेच लोकांकडून तक्रारी आल्या त्याची दखल सरकारला घ्यावी लागली कारण आपल्या देशात तक्रार केल्याशिवाय उपाय होत नसतात. एकेक वर्ष आधी आंब्याची खरेदी केली जाते. म्हणजेच एका विशिष्ट जागेतील आंब्याच्या झाडांची आमराई खरेदीकेली जाते. त्याचा लिलाव केला जातो आणि हंगामाच्या काळात त्या आमराईतल्या सर्व झाडांचे आंबे एका विशिष्ट खरेदीदारालाच दिले जातात. सर्वात आधी हे आंबे लोकांपर्यंत पोहचवले तर सर्वाधिक भाव खेचता यावा या स्पर्धेमुळे फळ पूर्ण पिकण्याआधीच तोडले जाते आणि रासायनिक पध्दतीने ते पिकवले जाते. आता अशा रासायनिक फळांची विक्री करणार्‍यांनाच तब्बल पाच लाखाचा दंड ठोठावण्याची तरतूद केली गेली आहे. ज्या अर्थी इतका मोठा दंड आकारला जातो. त्याअर्थी तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक पध्दतीने आंबे पिकवले जातात हे स्पष्ट होते. शिवाय या रासायनिकतेचे तितकेच घातक परिणाम असल्याचेही या दंडाच्या रकमेवरून सिध्द होते. काही काळासाठी उपलब्ध होणारा हा आंबा केवळ पैशाच्या हव्यासापोटी अशा पध्दतीने पिकवला जात असेल तर तो लोकांशी केलेला विश्वासघात म्हणावा लागेल. कितीही खबरदारी घेतली तरी आंबा पिकवतानाच त्यात काही प्रमाणात विषारी मूलद्रव्ये घुसडली जातात आणि मग कालांतराने त्याचे दुष्परिणाम खाणार्‍यांना सहन करावे लागतात. लोकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरतो. हे गैरप्रकार टाळण्याकरीता कितीतरी मोठी यंत्रणा कार्यरत करावी लागेल. ती तर केली पाहिजेच, शिवाय सामान्य ग्राहकाला कोणता आंबा रासायनिक पध्दतीने पिकवला आहे हे लक्षात येण्याकरीता काही युक्त्याही सांगितल्या गेल्या पाहिजेत. ज्यामुळे लोकांची दिशाभूल होणार नाही आणि या फळांच्या राजाचे महत्त्वही टिकून राहील.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More