(संपादकीय) प्रणव मुखर्जींना ‘भारतरत्न’ पुरस्कार का दिला? ‘भारतरत्न’चे महत्त्व कमी होऊ नये – eNavakal
संपादकीय

(संपादकीय) प्रणव मुखर्जींना ‘भारतरत्न’ पुरस्कार का दिला? ‘भारतरत्न’चे महत्त्व कमी होऊ नये

2019 सालच्या ‘भारतरत्न’ पुरस्कार सन्मानितांची नावे जाहीर झाली तेव्हा प्रणव मुखर्जी यांना हा सर्वोच्च सन्मान का दिला हा प्रश्न पडला. प्रणव मुखर्जी हे माजी राष्ट्रपती होते, विविध खात्यांचे मंत्री होते, इंदिरा गांधी यांचे एकनिष्ठ सहकारी होते ही कारणे ‘भारतरत्न’ देण्यासाठी पुरेशी नाहीत. मग प्रणव मुखर्जी हे संघाच्या व्यासपीठावर आले म्हणून त्यांना पुरस्कार दिला का? हा प्रश्न पडतो. पण संघाच्या व्यासपीठावर त्यांनी सडेतोड विचार मांडले होते. त्यामुळे पश्चिम बंगालकडे नजर ठेवून केलेली ही चाल असावी अशी सशक्त शंका येते.

‘भारतरत्न’ पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार असला तरी यापूर्वीही त्याचा राजकारणासाठी वापर केला गेला आहे. 1988 साली एम.जी. रामचंद्रन यांना या पुरस्काराने सन्मानित केले तेव्हा याच मुद्यावरून वाद झाला. कामराज यांना हा पुरस्कार दिला तेव्हा याच कारणाने विरोध झाला. अगदी सचिन तेेंडुलकरला पुरस्कार दिला तेव्हा पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर होत्या त्याकडे लक्ष ठेवून हा पुरस्कार दिल्याची जोरदार चर्चा झाली. ‘भारतरत्न’ पुरस्कारांची सुरुवात झाली तेव्हा ते सर्व क्षेत्रातील मान्यवरांसाठी खुले नव्हते. त्यामुळे ‘क्रीडा’ क्षेत्राकडे हा पुरस्कार कधीच गेला नाही. 2011 साली नियमावलीत बदल करून हा पुरस्कार अत्युच्च कार्य करणार्‍या कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर सचिन तेंडुलकरला पुरस्कार मिळाला. त्यामुळे एकूणच ‘भारतरत्न’ पुरस्कार आणि वाद हे समीकरण सतत कायम आहे.

‘भारतरत्न’ पुरस्काराची शिफारस पंतप्रधानांनी करायची असते. मग प्रणव मुखर्जी यांची शिफारस का केली याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यायला हवे. प्रणव मुखर्जी यांनी दोन क्षेत्रात प्रदीर्घ काम केले. काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधींचे एकनिष्ठ सहकारी ही त्यांची एक ओळख आणि वित्तमंत्री म्हणून त्यांची दुसरी ओळख आहे. या दोन्ही क्षेत्रात त्यांच्या प्रखर बुद्धीची चुणूक दिसली तरी या दोन्ही क्षेत्रातील त्यांची वाटचाल ही वादग्रस्त ठरली आहे. किंबहुना या दोन्ही क्षेत्रातील मार्गक्रमणात त्यांच्यातील ‘राजकारणी’ कायम श्रेष्ठ ठरला.

प्रणव मुखर्जी यांना स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1969 साली राज्यसभेवर आणले. तेव्हापासून ते इंदिराजींचे एकनिष्ठ सहकारी होते. 1975 ते 77 दरम्यान आणीबाणी घोषित झाली. या आणीबाणीच्या काळाचा आपण सर्वच धिक्कार करतो. मात्र आणीबाणी लादली गेल्यावरही प्रणव मुखर्जी यांनी काँग्रेसला विरोध केला नाही. किंबहुना त्यांनी कायदा पायदळी तुडवून अनेक बेकायदेशीर गोष्टी केल्या असा ठपका शहा कमिशनने त्यांच्यावर ठेवला होता. इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधींनी त्यांना बाजूला सारताच त्यांनी पश्चिम बंगालला जाऊन स्वत:चा ‘राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस’ हा पक्ष काढला. पुढे तीन वर्षांतच त्यांचे राजीव गांधींशी संबंध सुधारले आणि त्यांनी लगेच आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिन केला. 2012 पर्यंत ते काँग्रेस सत्तेच्या काळात कॅबिनेट मध्ये वित्त मंत्री, परराष्ट्र मंत्री अशा नंबर दोनच्या महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री राहिले. बहुमताचे आकडे गाठण्यात तरबेज आणि आपली राजकीय शक्ती कायम राखण्यासाठी आवश्यक असलेला मुत्सद्दीपणा असलेला राजकारणी अशीच त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे.
प्रणव मुखर्जी हे उत्तम वित्तमंत्री होते. पण त्यांच्या निर्णय प्रक्रियेत राजकारणाला प्राधान्य असायचे. अंबानी आणि वाडिया यांच्या उद्योगाच्या वादात त्यांनी तटस्थ न्याय केला नाही अशी त्यांच्यावर टीका होती. वित्त मंत्री म्हणून त्यांचे अनेक निर्णय अर्थतज्ज्ञांना पसंत नव्हते. राष्ट्रपती पदाचे उमेदवार बनण्यासाठी त्यांनी वित्तमंत्री पदाचा राजीनामा दिला. पण 2012 पर्यंतचा वित्तमंत्री म्हणून त्यांचा अखेरचा काळ अयशस्वी मानला जातो. या काळात त्यांनी वित्तमंत्री म्हणून देशाच्या अर्थस्थितीनुसार निर्णय घेण्याऐवजी राजकीय दृष्टीकोन ठेवून निर्णय घेतले अशी त्यांच्यावर खूप टीका झाली.
सर्व पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध राखलेला उत्तम अनुभवी राजकारणी असा त्यांचा प्रवास आहे. त्यामुळे त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान का प्रदान केला याचे उत्तर कुणीतरी जनतेला द्यायलाच हवे. ‘उत्तम राजकारणी’ हा निकष भारतरत्न पुरस्कारासाठी असता कामा नये. तो निकष ठेवायचा तर राजकारणात सरस काम केलेले अनेक पैलवान आहेत. ‘भारतरत्न’ पुरस्कार समाजासाठी निरपेक्ष कार्य करणार्‍यांसाठी आहे. त्याचे महत्त्व आणि सन्मान कमी होऊ नये.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More
post-image
मुंबई शिक्षण

साने गुरुजी विद्यालयाचा प्राथमिक विभाग बंद

मुंबई – विद्यार्थ्यांच्या संर्वांगीण विकासाठी सतत धडपडणारी एक नामांकित संस्कारक्षम शाळा म्हणून ओळख असणाऱ्या दादर पश्चिम भागातील साने गुरुजी विद्यालयातील मराठी माध्यमाचा प्राथमिक विभाग...
Read More