(संपादकीय) पुलवामातली वळवळणारी पिलावळ – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) पुलवामातली वळवळणारी पिलावळ

पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार असलेल्या मुदस्सिर अहमदखान आणि सज्जाद भट या दोघा दहशतवाद्यांना संपवण्यात भारतीय सुरक्षा रक्षकांना यश आले. पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागातल्या पिंगलीश या ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये मध्यरात्रीपर्यंत चकमक सुरु होती आणि त्यात या दोघांना ठार करण्यात आले. पुलवामा हल्ल्यात वापरली गेलेली गाडी याच मुदस्सिरची होती आणि तो 2017 मध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. पुलवामातल्याच रहिवासी असलेल्या या मुदस्सिरचा जैश ए मोहम्मदने स्फोटके जमवण्यासाठीसुध्दा वापर करून घेतला. हल्ला झाल्यानंतर त्यात वापरलेले वाहन कोणाच्या मालकीचे आहे हे शोधत असताना गुप्तचर यंत्रणांना बरीच माहिती उपलब्ध झाली. आणि हे दोघे पुन्हा नव्या हल्ल्याच्या तयारीत असल्याचाही सुगावा मिळाला होता. स्वाभाविकपणे पुलवामा हल्ल्यांनंतरही त्याच परिसरात दडून बसलेल्या त्या दहशतवाद्यांना संपवण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही हे सिध्द होते. विरोधी पक्षांकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले याचा पुरावा मागितला जात आहे. सरकारला आज ना उद्या तो पुरावा गोळा करून द्यावा लागेलच. परंतु जैश ए मोहम्मदचे जाळे जम्मू काश्मीर परिसरात किती पसरलेले आहे. हे या ताज्या घटनेवरून सिध्द होते. बालाकोटमध्ये दहशतवादी ठार झाले असतीलच. पण जैश ए चे काही दहशतवादी अजूनही काश्मीर खोर्‍यामध्ये जीवंत आहेत असा त्याचा अर्थ निघतो. त्यांचादेखील तितक्याच कठोरपणे नायनाट करावा लागेल. याच्यापाठोपाठ अनेक माध्यमातून आता बालाकोटमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचा आकडाही बाहेर येऊ लागला आहे. मोबाईल, नेटवर्क रिसर्चच्या माध्यमातून हवाई हल्ला करण्यापूर्वी बालाकोटच्या या जैशच्या मुख्यालयात जवळपास तीनशे मोबाईल कार्यरत असल्याचा डेटा उपलब्ध झाला होता आणि हवाई हल्ल्यानंतर या सर्व मोबाईलचे नेटवर्कही नेस्तनाबूत झाले. काही स्थानिक रहिवाशांच्या सांगण्यावरून किमान अडीचशे ते तीनशे दहशतवादी ठार झाल्याचा आकडा समोर येतो आहे. आता या हल्ल्याला महिना होईल परंतु अजूनही पाकिस्तानने ज्याठिकाणी हवाई हल्ले झाले त्याठिकाणी कोणालाही पोहचू दिलेले नाही. एवढेच नव्हे तर हवाई हल्ल्यानंतरही तिथे कोणालाही वैद्यकीय मदत उपलब्ध केलेली नाही. यावरून पाकिस्तानने पाळलेली गुप्तता हल्ल्याची सत्यता पटवणारीच ठरते.

संयुक्त सुरक्षा परिषदेत विषय

पुलवामा हल्ल्याची योजना जैश-ए- मोहम्मदकडून आखली गेली. आणि त्याची अंमलबजावणी पुलवामातल्याच काही दहशतवाद्यांकडून केली गेली. याचा अर्थ बालाकोट ते पुलवामा अशी ही दहशतीची मोठी साखळी जैश ए मोहम्मदने तयार केली असावी. कारण 14 फेब्रुवारीपासून आतापर्यंत सुरक्षा रक्षकांशी झालेल्या संघर्षात जवळपास सतरा दहशतवादी मारले गेले आहेत. म्हणजेच ही विषारी पिलावळ अजूनही पुलवामात वळवळ करताना दिसून येते. भारतीय लष्कर किंवा सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेली ही दहशतवादीविरोधी मोहीम अधिक प्रखर झालेली स्पष्टपणे दिसते. बालाकोटमधली मुख्य केंद्रे उडवत असतानाच त्याचे पडसाद वेगवेगळ्या पध्दतीने पुन्हा काश्मीर खोर्‍यामध्ये उमटणार होतेच. ते लक्षात घेऊनच सुरक्षा रक्षकांनी या दडून बसलेल्या दहशतवाद्यांनाही शोधण्याचा जोरदार प्रयत्न केला. म्हणजे एकाचवेळी दोन्ही आघाड्यांवर आक्रमक मोहीम सुरू ठेवल्याने त्याचे परिणाम साधता येणे शक्य झाले आहे. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद अझर हा अद्याप जिवंत असल्याचा दावापाकिस्तान करीत आहे. आणि आज सुरु होत असलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अझरला पाकिस्तानस्थित आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याची मागणी केली जाणार आहे. फ्रान्स, जपान, इंग्लंड या राष्ट्रांनी भारताच्या मागणीला पाठिंबाच दर्शवलेला आहे जर या परिषदेच्या बैठकीत जैश ए मोहम्मद या संघटनेवर कारवाई करण्याचे आणि मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्याचे ठराव पारित झाले तर पाकिस्तानला आणखीनच मोठा धक्का बसू शकेल. या परिषदेपूर्वी भारताने अनेक देशांच्या प्रमुखांना भेटून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या देशाला कठोरपणे त्याची जाणीव करून दिली पाहिजे. हाच त्यामागचा भारताचा उद्देश आहे.

सूत्रधार आणि सूत्र दोन्हीही संपावे

गेली अनेक वर्षे भारत ज्या दहशतवादाचा बळी ठरत आला त्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्याविरोधात आता एकाअर्थी निर्णायक लढा सुरु झालेला दिसतो. पुढच्या काळामध्ये किती दहशतवादी मेले हा प्रश्न मागे पडेल आणि भारताने सुरु केलेल्या या मोहीमेसाठी किती देश भारतासाठी पुढे आले हेच मोजावे लागेल. भारतीय हवाई दलाने अतिशय नेमके लक्ष्य गाठून केलेल्या या कारवाईचा जगातल्या सर्वच मोठ्या राष्ट्रांमध्ये खूप वेगळा संदेश गेला आहे. दहशतवादामुळे शत्रुत्व निर्माण होऊ नये आणि मित्रत्व टिकवायचे असेल तर दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असा तो स्पष्ट संदेश जगभर पोहचला आहे. यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला पाठिंबा लष्करी कारवाईत भारताने मिळवलेले यश आणि स्थानिक स्तरावरच्या दहशतवाद्यांचा नायनाट अशा तीनही आघाड्यांवर मोहीम सुरू आहे. त्याचे योग्य ते परिणामही दिसून येत आहेत. जर प्रमुख सूत्रधारांना दफन करण्यात भारतीय लष्कराला यश येत असेल तर काश्मीर खोर्‍यातले दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पोशिंद्यांचे धाबेही दणाणले गेले. हीच मोहीम याच पध्दतीने पुढची काही वर्षे कायम राहिली तर भारताला छळणारा हा दहशतवाद कायमचा संपू शकेल. सूत्रधार किंवा पोशिंदे ठार होत असले तरी दहशतवादाचे सूत्रदेखील नामशेष करावे लागेल. म्हणजेच दहशतवादाचा हा क्रूर विचार संपुष्टात आणण्याचे आव्हान भारताला पेलावे लागणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More