(संपादकीय) जीवाशी खेळणारा अक्षम्य निष्काळजीपणा – eNavakal
संपादकीय

(संपादकीय) जीवाशी खेळणारा अक्षम्य निष्काळजीपणा

मुंबई महानगराचे जीवन कसे बेभरोशाचे असू शकते. हे अलीकडच्या अनेक घटनांनी सिध्द झालेले आहेच. परंतु चाळीस पन्नासवर्षांपूर्वी घडणार्‍या याच महानगरातल्या घटना आणि आताच्या घटना यांचे प्रमाण सारखे आहे. प्रकार फक्त बदलले आहेत आणि म्हणूनच या महानगराची ही काळी बाजू मांडणारे त्या काळातले एक सिनेगीतही खूप गाजले होते. ज्यामध्ये ये बंबई शहर हादसो का शहर है, असे वर्णन करून तिथे रोज काही ना काही हादसा म्हणजे दुर्घटना घडतच असते असे छातीठोकपणे सांगितले गेले होते. त्या काळामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त होते. झोपडपट्टी दादांच्या दादागिरीपासून ते अनेक गुंडांच्या टोळ्यांनी घातलेल्या धुमाकुळापर्यंत कितीतरी विचित्र प्रकार घडत असत. दिवसाढवळ्या भर रस्त्यामध्ये खून पाडले जात होते. अशी ही दुर्घटनांची किंवा हादशांची परंपरा असलेल्या या महानगराची संकटातून काही मुक्तता झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेरचा पादचारी पूल कोसळण्याची ही घटना त्याच संकटांचा परिपाठ म्हणावा लागतो. पावणेदोन वर्षापूर्वी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात अशाच पादचारी पुलावर चेंगराचेंगरीचा प्रकार घडला आणि वीस-बावीस लोकांना आपले प्राण गमवावे लागले. मुंबईच्या इतिहासात रेल्वे स्थानकावर अशा प्रकारची चेंगराचेंगरी होण्याचा तो पहिला प्रकार ठरला. गर्दीचे महानगर असूनही आणि सर्वाधिक गर्दी ही रेल्वे स्थानकांवर असूनही चेंगराचेंगरीने कधी कोणाचे प्राण गेल्याचे ऐकिवात नव्हते. त्यानंतर सरकारी यंत्रणांना थोडीफार जाग आली. आणि पुलांच्या बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचे फतवे निघाले. परंतु दुर्दैव असे आहे की, सर्वेक्षणानंतर आढळून आलेल्या त्रुटीसुध्दा पूर्ण होऊ शकत नाहीत म्हणजेच नादुरुस्त किंवा दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या पुलांचा बांधकामाकडे तितकेच अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे आणि या बेपर्वाईने सामान्य माणसांचे बळी जात आहेत. मुंबई महानगराची आवश्यकता काय आहे. आणि प्रचंड गर्दी असलेल्या या महानगरात समस्यांचे निराकरण करण्यामध्ये सरकारी यंत्रणा अक्षरशः नालायक ठरल्या आहेत. एखादी समस्या निर्माण होण्याची कारणे माहीत झाली असूनही त्यावरच्या उपायांबाबतही दिरंगाई केली जावी हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह ठरतो. किंबहुना तो फौजदारी गुन्हा म्हणूनच गणला गेला पाहिजे.

सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीची गरज
या ताज्या दुर्घटनेमध्ये सहा जणांचे बळी गेले. तीसपेक्षा अधिकलोक जखमी झाले. पुलाचा विशिष्टच भाग कोसळल्यामुळे ही जीवितहानी तेवढ्यावरच निभावली. परंतु जर का पुलाचा मोठा भाग कोसळला असता तर प्रचंड रहदारी असलेल्या या रस्त्याचे काय झाले असते याची कल्पनाही करू शकत नाही. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणार्‍यांची नेहमीच गर्दी होते आणि मिळेल त्या जवळच्या मार्गाने आपल्या ठिकाणावर पोहचण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. जेमतेम पंधरा वर्षापूर्वी बांधलेल्या या पुलाची अशी दुर्दशा होऊ शकते. याचा महापालिकेला अजिबात अंदाज येऊ नये. ही गोष्ट अत्यंत खेदजनक ठरते. याच पुलावरून प्रत्यक्ष महापालिकेच्या मुख्यालयात शेकडो कर्मचारी रोज येत असतात. त्यात अगदी या रस्ते बांधकाम किंवा पुलदुरुस्ती खात्याचेही कर्मचारी, अभियंते यांचीही ये-जा या पुलावरून कधी ना कधी झाली असावी. परंतु आपण येत जात असलेला हा पूल अशा पध्दतीने कोसळेल याची त्यांनाही कल्पना आली नसावी. मात्र महापालिकेच्या मुख्यालयाजवळ असलेल्या या पुलाची किरकोळ दुरुस्ती करण्याची शिफारस केली गेली होती. परंतु दुरुस्तीचे किंवा नव्या कामांचे टेंडर काढणे आणि ते टेंडर आपल्याच मर्जीतल्या कंत्राटदाराला मिळणे यासाठी जो काही प्रकार महापालिकेत चालतो तो या दुर्घटनेचे कारण म्हणावा लागेल. मग स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव येण्यापासून ते पालिका सभागृहात त्याला मंजुरी मिळण्यापर्यंत जे काही सिंडिकेट आणि साटेलोटे चालते. ते केवळ कामाच्या तातडीपेक्षाही पैसे खाण्याच्या निकडीचीच काळजी घेणारे असते. एलफिन्स्टन रेल्वे स्टेशन दुर्घटनेनंतर मुंबईतल्या शेकडो पुलांचे सर्वेक्षण झालेले आहे. प्रत्येक ठिकाणी काही ना काही प्रमाणात दुरुस्त्यांची गरज व्यक्त झालेली आहे. अशीच गरज अंधेरीच्या पुलाबाबतही व्यक्त झाली होती. परंतु तेव्हाही दुर्लक्ष केले गेले आणि या पुलाचा काही भाग कोसळून तिघांचेही प्राण गेले होते.

दोषींवर कारवाई हवी
निदान आता या घटनेनंतर मुंबईतल्या सर्व पुलांची तातडीने दुरुस्ती हाती घेतली गेली पाहिजे. मधल्या काळात पंचावन्न उड्डाणपुल बांधले गेले आहेत. आता तर सगळीकडे मेट्रोची जोरदार कामे सुरू आहेत. या कामांमुळेसुध्दा मेट्रो परिसरातल्या अनेक बांधकामांच्या सर्वेक्षणाची गरज आहे. मोठमोठी यंत्रे वापरून मेट्रोचे भूमिगत बोगदे बांधले जात आहेत. त्याचा काही ना काही परिणाम या परिसरातल्या इमारती, उड्डाणपुल, पादचारी पुलांवर होऊ शकतो. म्हणूनच त्याचेसुध्दा स्ट्रक्चरल ऑडीट करायला हवे. गर्दी आणि वेग हीच या महानगराची ओळख आहे परंतु सध्या या महानगरावर कोणत्याहीवेळी कोणतेही संकट वेगाने येण्याचीच शक्यता वाटू लागते. याचा अर्थ या महानगरातल्या प्रत्येक सार्वजनिक साधनसुविधेची देखभाल हा नित्याचा प्रकार झाला पाहिजे. वर्षभरातून किमान दोनवेळा या सर्व सार्वजनिक सोयीसुविधांची तपासणी केली गेली पाहिजे. अगदी नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाचेसुध्दा सर्वेक्षण पुढच्या सहा महिन्यामध्ये करायला हवे. कारण या सर्व सोयीसुविधांचा वापर लाखो लोक किंवा हजारो वाहने रोज करीत असतात. हा गर्दीचा ताण लक्षात घेऊन खबरदारीच्या अधिक कार्यक्षम उपाययोजना महापालिका आणि राज्य सरकारकडून राबवल्या गेल्या पाहिजेत. आता कोसळलेल्या पुलाची दुरुस्ती कोणत्या कारणासाठी लांबवली गेली त्याला कोण कारणीभूत आहे हे लोकांपुढे यायला हवे. त्यातल्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पाकिस्तानचा उद्दामपणा! सरकारकडून फक्त मुस्लिमांना मदत, हिंदूना डावललं

इस्लामाबाद – लाखो लोकांची चिंता वाढवणारा आणि हजारो लोकांचे प्राण घेणारा कोरोना व्हायरस जगातील प्रत्येक देशात थैमान घालतोय. पाकिस्तानातही या विषाणूने हातपाय पसरले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जमावबंदीची ऐशीतैशी! सोलापूरमध्ये रथोत्सव, पोलिसांवर दगडफेक

सोलापूर – वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, घरात राहून कोरोनाविरोधात सामना...
Read More
post-image
देश

नोएडातील रस्त्यांवर निमलष्करी दल तैनात

नोएडा – सर्व जिल्ह्यांच्या आणि राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशचे गौतम बुद्ध नगर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

हे संकट लवकर संपणार नाही, येत्या काळात काटकसरीची सवय लावा – पवार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला ‘हे संकट लवकर संपणार नाही, मात्र...
Read More