(संपादकीय) चीनचा पुन्हा अडेलट्टूपणा – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

(संपादकीय) चीनचा पुन्हा अडेलट्टूपणा

चीनने पुन्हा एकदा आपल्या अडेलतट्टूपणाचे प्रदर्शन करून आपल्या भारतविरोधाची परंपरा जपण्याचा उद्योग केला आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेने मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला होता. या प्रस्तावाला फ्रान्स , इंग्लंड, अमेरिका यांच्यासह सर्वच देशांनी पाठिंबा दिला. एकट्या चीनने नकाराधिकार वापरून केवळ मसूद अझरची किंवा पाकिस्तानचीच नव्हे तर दहशतवादाची पाठराखण केली आहे असेच म्हणावे लागते. यापूर्वीसुध्दा तीनवेळा असा प्रस्ताव भारतातर्फे ठेवला गेला. प्रत्येकवेळी चीनने त्यालाविरोध केला आहे. मसूद अझरला दहशतवादी ठरवण्यापूर्वी आणखी सबळ पुरावे पुढे आले पाहिजेत. असा अतिशय विकृत युक्तिवाद चीनने केला. पाकिस्तान किंवा मसूद अझरला प्यादे बनवून चीन भारताबरोबर तिरकी चाल खेळतो आहे. चीनचा हा विरोध म्हणजे जाणीवपूर्वक केलेला भारताचा द्वेष ठरतो. कारण सगळे देश भारताच्या बाजूने असताना एकट्या चीनने विरोधी सूर लावण्याचे कोणतेही कारण उरत नाही. चीनची ही भूमिका पाहून अमेरिकेनेसुध्दा आश्चर्य व्यक्त केले आणि अशीच भूमिका राहिली तर पश्चिम आशियातील वातावरण दूषित होऊ शकते. अशा प्रकारचा स्पष्ट इशाराही अमेरिकेने दिला आहे. दहशतवादासारख्या विषयावर सगळे जग एकीकडे असताना चीनने पाकिस्तानची बाजू घेण्याचे कोणतेही विशेष कारण दिसत नाही आणि याच पध्दतीने चीन जर भारत द्वेषापोटी असाच विरोध करीत राहिला तर आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेला वेगळा उपाय करण्याची वेळ येईल. दहशतवादासारख्या आंतरराष्ट्रीय समस्येबाबत एखादा देश सातत्याने नकाराधिकार वापरत असेल किंवा तिथल्या बहुमताचाही वारंवार अनादर होत असेल तर या नकाराधिकारालाही नाकारण्याचे स्वातंत्र्य सुरक्षा परिषदेला स्वतःकडे ठेवावे लागेल. स्वाभाविकपणे चीनने यावेळेला केलेला हा विरोध त्याच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. त्याचा भारत चीन संबंधांवर मोठा परिणाम होऊ शकेल. तांत्रिक कारणांमुळे का असेना परंतु विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनने समजूतदारपणा दाखवणे अपेक्षित होते. वैशिष्ट्य असे आहे की भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांचा पाठिंबा मिळवून आपली प्रतिष्ठा कायम राखल्याचे यावेळच्या परिषदेतून स्पष्ट झालेले आहे. चीनचा जरी नकार असला तरी जगातले अनेक देश भारताबरोबर आहेत हे चित्रसुध्दा चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना पुरेसा इशारा देणारे ठरते.

पाकिस्तानचे प्यादे, चीनचा डाव

चीनचा हा भारतविरोध असण्याची आणखी काही कारणे आहेत. एकतर चीनने समुद्री महामार्गाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आखला होता. जो मार्ग भारताच्या सागरी हद्दीतून जात होता आणि ज्यामुळे भारताच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होणार होता. याविरोधामुळे अन्य काही देशही चीनच्या विरोधात गेले.  अनेक देशांची सागरी सीमा ही चीनच्या वर्चस्वाखाली येणार होती ही बाबही भारताच्या विरोधानंतर समोर आली. आणि अनेक देशांनी त्यातून माघार घेतली. एवढेच नव्हे तर डोकलाम भागामध्ये सैन्याची जमवाजमव करण्यापासून तर त्या भागात महामार्ग उभारणे विमानतळ तयार करणे, हे उद्योग चीनने सुरू केले. त्याला त्याच भाषेत रोखण्याचाही प्रयत्न भारताने केला आणि आपणही त्या भागात तशाच स्वरुपाची बांधकामे सुरू करून चीनला शह दिलेला आहे. अरुणाचल प्रदेशातल्या चीनचा हस्तक्षेपही आता भारताने हळूहळू मोडून काढला आहे. या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी वचपा काढण्याच्या हेतूने चीनकडून पाकिस्तानचा वापर करून घेतला जाताना दिसतो. परंतु चीनचे दुर्दैव असे आहे की, त्याने विरोधासाठी निवडलेला विषय हा जागतिक टीकेचा होऊ शकतो आणि आज ना उद्या याच विषयावर चीनला पाठिंबा द्यावा लागेल त्यावेळी मात्र चीनची परिस्थिती अत्यंत केविलवाणी असेल यात काही शंका नाही. भारत हा विषय सातत्याने लावून धरेलच. पण त्याही पलिकडे मसूद अझरचा खातमा करणे हादेखील एक मोठा पर्याय भारताकडे उपलब्ध आहे. जर तसे घडून आले तर चीनला परस्पर उत्तर मिळू शकेल आणि नाक वर करून वारंवार वापरल्या जाणार्‍या नकाराधिकाराला तेव्हा कवडीचीही किंमत उरणार नाही.

आपल्याच चुकीचे परिणाम  

ही गोष्ट खरीच आहे की चीनच्या या भूमिकेमुळे भारतीय जनमानस दुखावले गेले. किंबहुना चीनविरुध्द संतापलेही आहे. अशा परिस्थितीत या विषयाचे राजकारण केले जाणे आणखीनच दुर्दैवी ठरते. सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे भारतातील राजकीय पक्ष एकमेकांचा वचपा काढण्यासाठी कोणते विषय वापरतील याला काही नेम नाही. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर हे राजकीय मतभेद चुकीचा संदेश देणारे ठरतात. किंबहुना चीन पाकिस्तानसारख्या भारतविरोधी देशांना एक आयते भांडवलच मिळते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनच्या या भूमिकेबद्दल नाराजी   व्यक्त केली. तर राहुल गांधींनी मोदी हे चीनला घाबरतात. चीनविरुध्द ते तोंड उघडत नाहीत. अशा शब्दात त्यांनी टीका केली. हा विषय मोदी आणि चीन यांच्याविरोधातला नसून दहशतवाद विरुध्द सगळे जग अशी त्याला आता व्यापक पार्श्वभूमी झाली आहे आणि म्हणून चीनच्या या भूमिकेचा भारतातल्या सर्वच राजकीय पक्षांनी निषेधच केला पाहिजे. याच चीनला याच भारताने आपली संधी सोडून सुरक्षा परिषदेमध्ये स्थान देऊ केले. काँग्रेसचेच शशी थरूर यांच्या एका पुस्तकामध्ये तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनला सुरक्षा परिषदेत कायमचे स्थान देण्यात कसा पुढाकार घेतला याचे वर्णन आलेले आहे. म्हणजे आपणच केलेली चूक आता आपल्यालाच भोवते आहे हे वास्तव नाकारता येणार नाही आणि तोच चीन आता शिरजोर होऊन भारताविरुध्द नकाराधिकार वापरताना दिसून येतो. परंतु भविष्यकाळात चीनबरोबर असलेल्या अनेक संबंधांबाबत भारतानेही विचार केला पाहिजेआणि आपल्याकडेही चीनची कोंडी करणारे स्वतःचे नकाराधिकार आहेत हे चीनला दाखवून
दिले पाहिजे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More