(संपादकीय) अण्णांना एकटे पाडण्याचे पाप आपण केले! याला माफी कोण देईल? – eNavakal
संपादकीय

(संपादकीय) अण्णांना एकटे पाडण्याचे पाप आपण केले! याला माफी कोण देईल?

अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धीत आंदोलन सुरू आहे. गेले 5 दिवस ते उपोषण करीत आहेत. त्यांची किडणी या उपोषणामुळे खराब होण्याचा धोका आहे. पण देशभरात कुठेही याचे पडसाद दिसत नाहीत. ज्या महाराष्ट्रात हा ‘लोकशाहीचा दाता’ आंदोलन करतो आहे, त्या महाराष्ट्रात त्यांच्या पाठिंब्यासाठी आंदोलन नाही, धरणे नाही, मेणबत्ती मोर्चाही नाही. केवळ त्यांच्या राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ त्यांच्या यशासाठी प्रयत्न करीत आहेत. सामान्य जनतेची ही मानसिकता भयावह आहे.

आजचे युग हे स्वतःसाठी जगणार्‍यांचे युग आहे. दुसर्‍याशी बोलण्याची इच्छाही न होणारी माणसं चार डोकी गोळा करून पबजी खेळत बसतात. फिश महोत्सव, मिसळ महोत्सव, दिंडी, वारी ते अगदी भाऊजींकडून पैठणी मिळविण्यासाठी तुफान गर्दी उसळते. स्वतःचे मनोरंजन आणि स्वतःच्या कुटुंबाचे हित यापुढे काहीच दिसत नाही अशा दृष्टीहीनांची संख्या वाढते आहे. अशा या निष्क्रिय, अनुत्पादकांच्या गाळात रूतून न जाता समाजाचे भले व्हावे म्हणून अण्णा लढत आहेत. लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती, शेतकर्‍यांना दीडपट हमीभाव आणि पेन्शन या त्यांच्या मागण्या लोककल्याणासाठीच आहेत. त्यांची आणखी एक महत्त्वाची मागणी आहे की, मतदान यंत्रावर पक्षाचे निशाण असू नये. केवळ उमेदवाराचे नांव व छायाचित्र असावे. यामुळे पक्षासाठी मतं विकत घेण्यााचा भ्रष्टाचार कमी होईल. हेही लोकहितासाठीच आहे. पण अण्णांची दखल घ्यायला त्यांच्याच लोकांना वेळ नाही.
आज या देशात लोकशाही टिकली आहे त्याचे खूप मोठे श्रेय आरटीआय कायद्याला आहे. या कायद्यामुळे कुणीही कोणतीही माहिती अधिकृतपणे उघड करू शकतो आणि कुणीही भ्रष्टाचार उघड करून कोर्टात दाद मागू शकतो. लोकशाहीचे हे हत्यार मनोरंजनाच्या नाचगाण्यातून मिळालेले नाही. अण्णांनी आंदोलन आणि उपोषणाचा झंझावात आणून हा हक्क आपल्याला मिळवून दिला आहे. पण त्यावेळी मोठे व्यासपीठ होते, खानावळी झडत होत्या. त्यावेळी आंदोलनाचा झमझमाट होता. ते आंदोलन ‘फॅशनेबल’ होते. म्हणून तरुणाई त्या आंदोलनात उतरली. आता ती तरुणाई राळेगणसिद्धी सारख्या आडवाटेवरील गांवी जायला तयार नाही. गेल्या दहा वर्षात अनेकांनी अण्णांची साथ सोडली. काहीजण सत्तेत गेले. काहींना अण्णांचे राजकारण आवडले नाही. प्रत्यक्षात मात्र सत्तेपासून दूर राहून राजकारण्यांना नाचविणारे अण्णांचेच राजकारण यशस्वी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणतात की, अण्णा पैसे घेतात. हा आरोप इतरही अनेक सहकार्‍यांनी केला आहे.

87 वर्षे सत्तेपासून दूर राहिलेला अण्णांसारखा माणूस पैसे घेईल असे वाटत नाही. त्यातही आंदोलन चालवून मागण्या मान्य करायच्या तर व्यासपीठ उभारण्यापासून कार्यकर्त्यांची पाण्याची, भाजी भाकरीची सोय करावी लागते. त्यासाठी पैसा लागतो. हा पैसा काहीजण पुरवतात. पण त्यासाठी अण्णांनी आपल्या मागण्यांच्या बाबतीत कधी तडजोड केली असे एकदाही घडले नाही. पण चांगल्याला चांगले म्हणायचे, एखादा निरपेक्षपणे लढतो आहे. यावर विश्वास ठेवायचा ही मानसिकताच शिल्लक नाही. आपल्याला शंभरजणांनी फसविले म्हणून मग प्रत्येकाबद्दल संशय घ्यायचा हे योग्य नाही. चांगुलपणा ओळखता येत नसेल आणि चांगुलपणाचा सन्मान करता येत नसेल तर देवाने दिलेली बुद्धी काय कामाची आहे? शिवसेनेने अण्णांना ‘माकड’ म्हटले तेव्हा ते ऐकून अनेकांनी फीदीफीदी हंसत दात काढले. कुणाची अशी निर्भत्सना झालेलीच आवडायला लागली असेल तर समाजमन सडू लागले. आहे असे समजायला हवे. अशा समाजाला कीड लागते, त्यातून नवनिर्मिती होत नाही.

अण्णा आज एकटे पडले आहेत. त्याला तुम्ही-आम्ही जबाबदार आहोत. अण्णांनी पंतप्रधानांना 35 पत्रे लिहिली त्यावर उत्तर न देता त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत पंतप्रधान शुभेच्छा पाठवतात ही अण्णांची हार नाही तर ज्या समाजाच्या भल्यासाठी अण्णा उपोषण करतायत त्या समाजाची हार आहे. अण्णांच्या मागण्या लवकर मान्य होणार्‍या नाहीत. कारण त्या राजकारणाला घातक आहेत. म्हणून समाजाने पुन्हा एकदा त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कुंभमेळ्यात डुबकी मारून पुण्य मिळते म्हणून लाखो जातात. पण तितकेच पुण्य अण्णांनी सुरू केलेल्या यज्ञात सामील होऊन मिळेल.
अण्णांच्या आजच्या लढ्यात भव्य व्यासपीठ नाही, टोप्या नाहीत, तंबू नाहीत, झेंडा घुमवणार्‍या महान व्यक्ती नाहीत की त्यांची शिडी करून सत्तेवर जाणारे महाभाग नाहीत. हे सर्व बाह्य रंगकाम काळानुसार येईल आणि जाईल. पण अण्णांच्या मागण्या पूर्वी सच्च्या होत्या तशा आजही सच्च्या आहेत आणि या सर्व मागण्या समाजहितासाठीच आहेत. अण्णा जिंकले तर सर्वच त्याचे श्रेय घ्यायला जातील. पण आज अण्णांना एकटे पाडण्याचे पाप आपण सर्वांनी केले आहे. हे पाप माफ कोण करणार?

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More