वाशिम – पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. या आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड अखेर १५ दिवसांनी समोर आले आहेत. ते आज पोहरादेवीत दाखल झाले. यावेळी त्यांनी जगदंबा देवी तसेच सेवालाल महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. मात्र यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नसून मौन कायम ठेवले आहे.
पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आल्यापासूनच संजय राठोड अज्ञातवासात गेले होते. एका ऑडिओ क्लिपमुळे त्यांचे नाव चर्चेत आले होते. यानंतर भाजपाने जाहीरपणे संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी सुरु केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले असून पोहरादेवीत दाखल झाले आहेत. ते येणार असल्याने पोहरादेवीत सकाळपासूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत होते. त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र शक्तीप्रदर्शन करण्याच्या नादात राज्यावर घोंघावणाऱ्या कोरोना संकटाचा त्यांच्या समर्थकांना विसर पडल्याचे दिसून आले. यावेळी संजय राठोड यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन करताना ‘कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला’, अशा घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान, मुळची परळीची असणाऱ्या पूजा चव्हाण हिने पुण्यात ७ फेब्रुवारीला मध्यरात्री आत्महत्या केली. ती शिक्षणासाठी आपल्या भावासोबत पुण्यातल्या हडपसर भागात राहत होती. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तिने महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. प्रेमसंबंधातूनच या तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जाऊ लागले. या घटनेमागे महाविकास आघाडी सरकारमधील एक मंत्री असल्याची चर्चा सुरू असताना आता त्या तरुणीच्या जवळील एका व्यक्तीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यामध्ये ती व्यक्ती साहेब ती आत्महत्या करणार आहे. तिला समजून सांगा, असे सांगत असल्याचे ऐकू येत आहे. पण ती व्यक्ती नेमकी कोणासोबत बोलत आहे हे उघड झालेले नाही.