हिंगोली – हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे शेततळ्यात बुडणार्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना आई व मुलाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाकर विठ्ठल मगर (22) व विजयमाला विठ्ठल मगर (45) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजयमाला यांच्या पतीचे निधन झाले असून त्या आपल्या मुलगा प्रभाकर बरोबर राहत होत्या. गुरुवारी प्रभाकर व विजयमाला कामासाठी शेतात गेले होते. पण प्रभाकरला तहान लागल्याने तो बाजूच्या शेततळ्यात पाणी पिण्यासाठी गेला. त्याचवेळी अचानक त्याचा तोल गेला आणि तो शेततळ्यात पडला. प्रभाकरला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला. हे बघताच विजयमाला यांनी मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्यांना पोहता येत होते. पण शेततळ्यात गाळ असल्याने त्या त्याच्यात रुतल्या. यामुळे त्यांचा व प्रभाकरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.