शेतकऱ्यांनी मनमाडजवळील पुणे-इंदोर महामार्ग रोखून धरला
नाशिक – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज मनमाड जवळील पुणे-इंदोर महामार्गावर किसान सभेने जोरदार जेलभरो आंदोलन केले. आंदोलनामुळे मनमाड-शिर्डी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत मनमाड चौफुली परिसर दणाणून सोडला. शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चावर दिडपट हमीभाव मिळालाच पाहिजे या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांच्या होत्या. आता शासन खूप काळ शेतकऱ्याना फसवू शकत नाही असा गर्भित इशारा यावेळी राजू देसले यांनी दिला आहे.
गेल्या दोन माहिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पेठ तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिक-मुंबई असा लॉग मार्च काढला होता. आमदार जिवा पांडू गावीत यांच्या नेतृत्वाखाली रणरणत्या उन्हात काढलेल्या मोर्चात सहभागी झाल्याने महिला तसेच पुरुषांच्या तळपायांना अक्षरक्ष: फोड झाले होते. तुमच्या मागण्या न्यायिक असून या मागण्या लवकरच निकालात काढू, असे ठोस आश्वासन देत मुख्यमंत्र्यानी आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले होते. दोन महिने उलटून गेले तरी सरकारकडून आश्वासनाची पूर्ती होत नसल्याने आता शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले आहे.
किसान सभेचे राजू देसले, साधना गायकवाड, भास्करराव शिंदे, देवीदास भोपळे, दत्तात्रय गांगुर्ड, शंकर गंभीरे यांच्या नेतृत्वाखाली मनमाडजवळील मालेगाव-मनमाड चौफुलीवर आज दुपारी शेतकऱ्यांनी जोरदार जेलभरो आंदोलन छेडले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतीमालाच्या भावासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, राज्यातील शेतकऱ्यांना विजबिले माफ करा, कसणाऱ्यांच्या नावे वनजमिनी करा आदी मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला. यामुळे मालेगाव-मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा देत महामार्ग परिसर दणाणून सोडला.