व्हेनेझुएलातील राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकट – eNavakal
गुरुवार विशेष

व्हेनेझुएलातील राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकट

व्हेनेझुएला…दक्षिण अमेरिका खंडातील एक चिमुकला पण खनिज तेलसमृद्ध देश. जगाला ‘मिस युनिव्‍हर्स’ आणि ‘मिस वर्ल्‍ड’ देणाऱ्या व्हेनेझुएलात होत असलेली राजकीय, आर्थिक आणि सामाजिक उलथापालथ सर्व जगाचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. सध्या जगातील सर्वात अशांत देशांच्या यादीत व्हेनेझुएलाचं नाव घेतलं जातं आहे. याला जबाबदार व्हेनेझुएलाचे सध्याचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या आर्थिक आणि राजकीय धोरणांना मानण्यात येत आहे. गेल्या दशकात व्हेनेझुएलाचे दिवंगत माजी अध्यक्ष ह्य़ुगो चॅवेझ यांच्या नेतृत्वात व्हेनेझुएलाची लक्षणीय आर्थिक प्रगती झाली. परंतु आपल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे सध्या तेथील जनता गरिबी, महागाई आणि उपसमारीत होरपळून निघत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

दक्षिण अमेरिका खंडातील हा लहानसा देश त्याच्या मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या खनिज तेलाच्या साठ्यांमुळे प्रकाश झोतात आला. मात्र, जगाला कच्च्या तेलाचा पुरवठा करणारा व्हेनेझुएला हा देश सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही वर्षांपासून व्हेनेझुएलात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे त्या देशाला अनेक समस्यांना सामोरे जाव लागत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या व्हेनेझुएलातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करणंही कठीण बनलं आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तू, औषधं यांच्या किमती गगनाला भिडल्या आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी या वस्तूंची खरेदी अशक्य बनली आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. डोंगराएवढी महागाई, चलनाचे रसातळाला गेलेले मूल्य, जीवनावश्यक वस्तूंसाठी स्थलांतरन करणारी जनता असे सध्या तेथील चित्र आहे..

व्हेनेझुएलाची भौगोलिक पार्श्वभूमी 

व्हेनेझुएला नैसर्गिक साधनसंपत्तीनं नटलेला देश. पश्चिमेकडे अँडीजची पर्वतराजी आणि दक्षिणेला अॅमेझॉनचं जंगल, उत्तरेला समुद्र असं या देशाचं रुपडं आहे. लॅटिन अमेरिकेत सगळ्यांत जास्त शहरी लोकवस्ती याच देशात आहे. या देशाची तब्बल 95 टक्के अर्थव्यव्यवस्था खनिज तेलावरच अवलंबून आहे. त्याशिवाय इथं कोळसा, लोखंड, बॉक्साईट आणि सोनं अशी खनिजं सुद्धा आढळतात. एवढं सारं असूनही इथले अनेक लोक दारिद्र्यात जगतात. इथले बहुसंख्य लोक छोट्या शहरांमध्ये दाटीवाटानं राहतात. या देशाची राजधानी असलेल्या कराकसजवळच्या टेकड्यांवर अशा बऱ्याचशा वसाहती आहेत.

व्हेनेझुएलाची संकटाची पार्श्वभूमी

जगातील सर्वात जास्त खनिज तेलाचे साठे असलेल्या व्हेनेझुएला या देशाने २०व्या शतकात केवळ खनिज तेलाच्या उत्पादनाच्या मदतीने चांगली आर्थिक प्रगती केली. ह्युगो चॅवेझ यांच्या उल्लेखाशिवाय व्हेनेझुएलाची गोष्ट अपूर्ण आहे. व्हेनेझुएलावर डाव्या विचारांचे नेते ह्य़ुगो चॅवेझ यांनी १९९९ ते २०१३ या काळात एकहाती सत्ता गाजवली. गोरगरिबांना मदत व्हावी म्हणून त्यांनी २००३ साली देशातील आवश्यक वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण आणले. साखर, कॉफी, दूध, तांदूळ, पीठ आणि मक्याचे तेल अशा वस्तूंच्या किमती ठरावीक पातळीच्या वर नेण्यास मज्जाव केला. औद्योगिकीकरणामुळे वाढत्या खनिज तेलाच्या मागणीचा पुरवठा करत त्यांनी आर्थिक गरज भागवली. खनिज तेलाच्या उत्पादनावर अवलंबून असलेला देश अशीही ओळख व्हेनेझुएलाची त्या काळात निर्माण झाली. यामुळे चॅवेझ यांनी लोकांची मनं तर जिंकली मात्र त्याचा भार सरकारच्या तिजोरीवर मोठ्याप्रमाणावर पडू लागला. सरकारच्या नियंत्रित अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणावर व्हेनेझुएलातील उद्योग व व्यवसायांना आवश्यक असणारे स्वातंत्र्य मिळाले नाही. सरकारवरील कर्ज वाढत गेले. अशा प्रकारचे आर्थिक धोरण स्वीकारल्याने नंतरच्या काळात नवनव्या समस्या तोंड वर काढू लागल्या. इथूनच खऱ्या अर्थाने व्हेनेझुएलाच्या आर्थिक उतरंडीला सुरुवात झाली.

असंतोषाचे तात्कालिक कारण

ह्युगो चॅवेझ त्यांच्या निधनानंतर त्याच पक्षाचे निकोलस मादुरो हे सत्तेत आले. चॅवेझ यांचाच अनुकरण करत त्यांनी अर्थव्यवस्थेच्या बाबतीत अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने देशाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्याचा निषेध म्हणून सर्वच स्थरावरून राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना विरोध होऊ लागला आहे. आधीच गंभीर असलेली परिस्थिती मादुरो यांनी काही चुकांची भर घालत आणखीनच चिघळवली. यास्थितीतून मार्ग काढण्यासाठी मादुरो यांनी नव्या चलनी नोटांची छपाई करून बाजारात आणल्या. पण त्याने महागाई आणि चलन फुगवटय़ात वाढच झाली. जीवनावश्यक वस्तूंचे रेशनिंग सुरू केले. पण त्यातून साठेबाजी, काळा बाजार आणि नफेखोरी वाढली. मादुरोंना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. 2016 आणि 2017 साली त्यांना प्रचंड असंतोषाचा सामना करावा लागला. त्यांच्या सरकारविरुद्ध अनेक आंदोलनं झाली. 2016 सालच्या मे महिन्यात त्यांनी आणीबाणी जाहीर केली आणि परिस्थिती आणखी चिघळली.

तेलाची अर्थव्यवस्था 

व्हेनेझुएलाची ९५ टक्के अर्थव्यवस्था खनिज तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. देशात त्या व्यतिरिक्त फारच कमी वस्तू आणि पदार्थाची निर्मिती होते. त्यामुळे अगदी अन्नधान्यासाठीही हा देश नेहमीच आयातीवर अवलंबून राहिला आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती भराभर घसरत आहेत. त्याचा फटका व्हेनेझुएलाला बसला. त्यात व्हेनेझुएला सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक देशांनी कच्च्या तेलासाठी इतर देशांना पसंती देत आहेत. त्यामुळे एकेकाळी रोज ३० लाख बॅरेल तेल काढणाऱ्या व्हेनेझुएलात सध्या अवघे अडीच लाख बॅरेल तेल काढले जात आहे. याने देशाचे उत्पन्नही घटले आहे. देशात खनिज तेलाव्यतिरिक्त फारच कमी वस्तू आणि पदार्थाची निर्मिती होते. त्यामुळे अगदी अन्नधान्यासाठीही हा देश नेहमीच आयातीवर अवलंबून राहिला आहे. पण आता डॉलरचा ओघ आटला आणि परदेशांतून जीवनावश्यक वस्तू विकत घेणे जिकिरीचे झाले आहे. सरकारचा परदेशी आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक मदतीवर भर होता. सध्याच्या बदलत्या स्थितीत त्याचीही शाश्वती राहिलेली नाही.

व्हेनेझुएलात महागाईचा नवा उच्चांक

जगात मोठे तेल साठे असलेल्या व्हेनेझुएलाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की देशातील नागरिकांना देश सोडून जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. व्हेनेझुएलाच्या चलनात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. देशात महागाईत २६०० टक्के वाढ झाली आहे. महागाईने इतका कळस गाठला आहे की १ लिटर दुधासाठी ८० हजार रुपये तर १ किलो मांसासाठी ३ लाख रुपये मोजावे लागत आहेत. एका ब्रेडसाठी तिथे हजारो रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे व्हेनेझुएलात एका दिवसाच्या जेवणाची सोय करण्यासाठी नागरिकांना पोतं भर पैसे जवळ ठेवणे आवश्यक बनलं आहे. इतकेच नव्हे तर औषधे नाहीत यामुळे आजारी लोकांना उपचारासाठी दुसऱ्या देशात जाण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. देशातील श्रीमंतानाही जगणे शक्य होत नसून त्यांच्यावरही रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे.

मोठ्या संख्येने स्थलांतर

देशावर हे आर्थिक संकट ओढविण्यामागे तेलाच्या जागतिक बाजारात घसरलेल्या किमती आणि सरकारची चुकीची धोरणे ही कारणे दिली जात आहेत. आर्थिक संकटाच्या गाळात रुतत चाललेले व्हेनेझुएलाचे नागरीक संधी मिळेल तसे देश सोडून जात आहेत. कोलंबियामध्ये या स्थलांतरीत नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. कोलंबिया सरकारला इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांची व्यवस्था करणे कठीण होत असून त्यांनी स्थलांतरीतांचे हे लोंढे थांबवण्यासाठी कोलंबियानं आंतरराष्ट्रीय स्तरावर मदत मागितली आहे. तर सीमेला लागून असलेल्या अन्य ब्राझील, चिले, मेक्सिको, आर्जेन्टिना, स्पेन या देशांनी वेनेझुएलातील नागरिकांना विरोध सुरु केला आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

गूगलवर ‘इडियट’ सर्च कराल तर दिसतील ‘ट्रम्प’

वॉशिंग्टन – गूगलने इडियट सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत असल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत गूगलचे सीईओ सुंदर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याची ‘दीवार’ धोक्यात

मुंबई – मुंबईतील जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे 6० फूट रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या बिग बी अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचा काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा निवडणुकीपूर्वीच जनतेपर्यंत जाऊन पोहचा – मोदी

नवी दिल्ली – कार्यकर्त्यांचे प्रचंड जाळे असूनही भारतीय जनता पक्षाचा राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत दणदणीत पराभव झाल्यामुळे भाजपा हादरला आहे. आज...
Read More
post-image
महाराष्ट्र

१८ डिसेंबर रोजी नांदेड मनपा सभापती पदाची निवडणूक

नांदेड – महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा...
Read More
post-image
मुंबई

मुंबई मेट्रो ३ च्या दिनदर्शिकेत विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे झळकणार

मुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या २०१९ दिनदर्शिकेमध्ये काही आकर्षक चित्रे सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळणार आहेत. आगामी वर्षाची दिनदर्शिका सर्वोत्तम असावी यासाठी एमएमआरसीने “मुंबई...
Read More