परभणी – वालूर तालुका सेलू येथील शिवारात एका शेतक-याने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आत्महत्या केली. तर रवळगाव तालुका सेलू येथील शेतमजुर तरुणाने सोमवारी विष प्राशन केले त्यास सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता मंगळवार दुपारी 2-30 त्याचे निधन झाले. मयत राहूल उतमराव भदर्गे वय १८ वर्षे असे या तरूणाचे नाव त्यास मुळगावी जोगवाडा तालुका जिंतुर येथे अंत्यसंस्कार साठी नेण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले तर वालुर येथील गोपाळ नारायण रोकडे(वय28) असे या तरूण शेतक-याचे नाव आहे.
गोपाळ रोकडे यांच्यावर एचडीएफसी बँकेचे 17 लाख रुपयांचे कर्ज असून त्या कर्जाची परतफेड करण्याच्या विवंचनेत ते होते. त्यातूनच सोमवारी शेतात असतांना सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांचे वडील नारायण रोकडे यांना त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिस निरीक्षक साहेबराव चवरे यांच्या पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी नारायण रोकडे यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.