पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. राज्यपालांनी संपूर्ण गडाची पायी फिरून पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेचे दर्शन घेतले तसेच शिवजन्मस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळण्याला वंदन केले.
यावेळी त्यांनी संपूर्ण शिवनेरी गडाची पायी चढून पाहणी केली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक डॉ.राजेंद्र यादव उपस्थित होते. गडावरील शिवाई देवतेची आरती करून त्यांनी दर्शन घेतले. विविध वास्तूंची माहिती घेतली. गडावरील विविध झाडांची नावे विचारत आणि दिलखुलास गप्पा मारत त्यांनी शिवनेरीचा फेरफटका मारला. शिवकुंज इमारतीतील राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या प्रतिमेशी ते लीन होऊन नतमस्तक झाले. शिवजन्मस्थळी शिवाजी महाराजांच्या पाळण्याची पूजा करत तेथील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.