मुंबई – मुंबईतील ‘वडाळ्याच्या राजा’ला गणेशोत्सवासाठी मंडप बांधण्यास परवानगी देण्यापूर्वी वडाळ्यातील दोन इमारतीमधील रहिवाशांच्या अडचणी व तक्रारी ऐकून घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के.के. तातेड व न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने बृहन्मुंबई महानगर पालिका प्रशासनाला दिले आहेत. ‘वडाळ्याचा राजा’ हा मुंबईतील लोकप्रिय सार्वजनिक गणेशोत्सव आहे.
वडाळ्याच्या राजाच्या परिसरात येणाऱ्या दोन इमारतींमधील राजेश शाह आणि संजय देढीया व इतर दहा जणांनी मिळून मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये एका डॉक्टरचा व तीन वरिष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. या दोन इमारतीतील नागरिकांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, या दोन इमारतींमधील 15 फूट रुंदीच्या रस्त्यावर वडाळ्याच्या राजाचा उंच मंडप बांधला जातो. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना हवा येत नाही व प्रकाशही येत नाही. तसेच रहदारीसही अडथळा होतो. त्यामुळे अनिल चारिटी ट्रस्टद्वारे साजरा केल्या जाणाऱ्या वडाळ्याच्या राजाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मंडप बांधण्यापासून रोखावे, अशी या याचिकाकर्त्यांची मागणी आहे. या याचिकाकर्त्यांची बाजू तेजस दांडे आणि ग्रीष्मा लाड या दोन वकिलांनी न्यायालयात मांडली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला या याचिकाकर्त्या रहिवाशांच्या अडचणी आणि तक्रारी ऐकून घेण्यास सांगितले आहे. रहिवाशांच्या तक्रारी ऐकून घेतल्या नंतरच वडाळ्याच्या राजाला गणेशोत्सवासाठी मंडप बांधण्यास परवानगी द्या, असे न्यायालयाचे म्हणणे आहे.