लाट नसल्याने बिकट वाट – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

लाट नसल्याने बिकट वाट

निवडणूक आयोगाने राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे दिवाळीनंतरची ही राजकीय बंपर लॉटरी कोणाला लागते याच्याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले असेल. चार वर्षांपूर्वीच म्हणजेच 2014 साली भारताच्या राजकीय इतिहासाला अभूतपूर्व कलाटणी देणारी निवडणूक झाली. बिगर काँग्रेसी एकाच राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत देणारा ऐतिहासिक कौल भारतीय मतदारांनी दिला. नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाची एक प्रचंड लाट त्यावेळी निर्माण झाली होती. आता ही लाट किती प्रमाणात टिकून आहे, हे गेल्या दोन वर्षांतल्या वेगवेगळ्या निवडणुकांमधून दिसून आले. 2014 साली असलेली नरेंद्र मोदींची लोकप्रियता आणि आताची लोकप्रियता यामध्ये निश्चितपणे फरक पडला आहे. त्याची अनेक कारणे जरी असली तरी मोदी यांच्या नेतृत्वाखालचे सरकार देशात वैशिष्ट्यपूर्ण असे परिवर्तन घडवेल आणि सामान्य माणसाच्या कष्टाबाबत दिलासा मिळेल अशी साधारण अपेक्षा होती, परंतु त्यात कोणताही मोठा फरक पडलेला दिसत नाही. अशा पार्श्वभूमीवर पाच विधानसभांच्या निवडणुका होत आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होणारी ही मोदी यांच्या कारकिर्दीतली सर्वात मोठी एकत्रित अशी निवडणूक ठरेल. यासाठीच ही निवडणूक मोदी यांच्या लोकप्रियतेची कसोटी ठरवणारी अखेरची निवडणूक म्हणता येईल. या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या विजयावरच जनतेचा कौलही निश्चित होणार आहे. अर्थात स्थानिक पातळीवरचे राजकारण किंवा प्रश्न हे वेगळ्या स्वरूपाचे असतात आणि म्हणून विधानसभा निवडणुकीतल्या मतदानाची फूटपट्टी मोदींच्या लोकप्रियतेसाठी योग्य ठरत नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद भाजपाकडून केला जाऊ शकतो, परंतु या पाच विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये त्यातल्या तीन राज्यांमध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे. ही सत्ता टिकवून ठेवणे या पक्षासाठी सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. कारण सत्ता टिकून राहिली तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्याचा खूप मोठा फायदा भाजपाला होऊ शकतो, मात्र एका खासगी वाहिनीच्या सर्वेक्षणानुसार या तीनही राज्यांत सत्ता टिकवणे भाजपाला कठीण जाणार आहे.

लोकसभेपूर्वीची अखेरची मोठी निवडणूक

प्रत्यक्ष निवडणुका पार पडायला अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. मधल्या काळात प्रचाराचे स्वरूप काय राहील त्यावर या निवडणुकांची समीकरणे बदलू शकतील. तरीदेखील राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये भाजपाला अक्षरशः कांटे की टक्कर द्यावी लागेल. राजस्थानात वसुंधरा राजे यांच्या कारभाराविषयी लोकांच्या मनात फारशी सहानुभूती दिसून येत नाही, तर छत्तीसगढमध्ये बहुजन समाज पार्टी आणि तिथले काँग्रेसचे माजी नेते अजित जोगी या दोघांनी समझोता केला आहे. ही युती भाजपाला काँग्रेसपेक्षाही जड जाऊ शकेल, असे अंदाजही व्यक्त झाले आहेत. मध्य प्रदेशमध्ये मात्र चित्र पुरेसे स्पष्ट जरी नसले तरी शिवराज चव्हाण यांनी आपला दबदबा टिकवण्यात बर्‍यापैकी यश मिळवले आहे. मिझोराममधली परिस्थिती अशीच बेभरवशाची म्हटली जाते. शेजारच्या त्रिपुरामध्ये भाजपाची सत्ता आली असल्याने मिझोराममध्ये आपला प्रभाव वाढेल अशी व्यूहरचना भाजपातर्फे केली जात आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या या तेलंगणा राज्यात ही दुसरी विधानसभा निवडणूक होत असल्याने राजशेखर राव यांच्या लोकप्रियतेला फारसा धक्का लागण्याची चिन्हे दिसत नाहीत. या सगळ्या आढाव्यातून काहीशी मिनी लोकसभा निवडणूक ठरणार्‍या या संघर्षाचा निकाल मिश्र स्वरूपाचा राहील असे म्हणता येते. राजकारणात वातावरण केव्हा बदलेल याचा कोणीही भरवसा देऊ शकत नाही, मात्र एकाचवेळी पाच ठिकाणी होणार्‍या या विधानसभा निवडणुका निदान भारताच्या पुढच्या पाच वर्षांच्या भवितव्याचा दिशानिर्देश करणार्‍या ठरू शकतील यातही काही शंका नाही. वेगवेगळ्या सर्वेक्षणांतून व्यक्त होणारे अंदाज हे अगदी गैरलागू ठरत नाहीत. निदान स्थानिक स्तरावरची जनभावना काय आहे याचे काही प्रमाणात संकेत मिळतात. ते संकेत कोणाचीही लाट नसल्याचेच निदर्शक ठरत आहेत. स्वाभाविकपणे प्रयत्न करूनही लाट निर्माण होत नसल्यामुळे भाजपाची वाट बिकट होत चाललेली आहे, हेही सरसकटपणे नाकारता येत नाही.

काँग्रेसचा आक्रमक प्रचार

अर्थातच फारशी अनुकूल परिस्थिती नसताना भाजपाच्या समोर असलेला विरोधी पक्ष आज पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरण्याचा चंग बांधत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अतिशय नियोजनपूर्वक आणि आक्रमकपणे थेट नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केल्याने एकाअर्थी भाजपाच्या मुळावरच घाव घातला आहे. मोदींची प्रतिमा आणि त्यांचा राज्यकारभार किंवा त्यांच्याकडून सातत्याने केले जात असलेले देशविकासाचे जाळे हे कसे फोल आहेत या गोष्टी वेगवगळ्या पध्दतीने सातत्याने सांगण्याचा धडाका राहुल गांधी यांनी लावला आहे. राजकारणामध्ये आपली बाजू भक्कम करण्याकरिता मतदारांसमोर पर्याय उभा करणे आणि सत्ताधार्‍यांविरुध्द अधिकाधिक संभ्रम निर्माण करणे गरजेचे ठरते. हेच काम सध्या राहुल गांधी आणि काँग्रेसकडून सुरू आहे. ज्याअर्थी काही सर्वेक्षणांमधून भाजपाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे दिसून येते त्याअर्थी काँग्रेसने आपल्या प्रचाराचा परिणाम काही प्रमाणात साधल्याचे त्यातून आपोआप स्पष्ट होते. आज परिस्थिती इतकी उलट स्वरूपाची आहे की एकेकाळी जी अवस्था भारतीय जनता पार्टीची होती ती आज काँग्रेसची झालेली आहे. केवळ चार ते पाच राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेवर आली, तर 21 ठिकाणी भाजपाचे राज्य आहे. केंद्रातही त्यांचीच सत्ता असल्यामुळे लोकप्रियता आणि राज्यकारभाराचा अनुभव या दोन्ही गोष्टींच्या जोरावर आहे ती राज्ये टिकवण्याचा प्रयत्न भाजपाला करावा लागेल, परंतु काँग्रेसने थोड्याच कालावधीत आणि तेही राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर काही महिन्यांतच परिस्थिती बदलवण्यात यश मिळवल्याचे दिसून येते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

‘मोदी हटाओ, योगी लाओ’ लखनऊत पोस्टरबाजी

लखनऊ – तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर लखनऊमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा असे पोस्टर झळकले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण...
Read More
post-image
देश

वेगळा धर्म म्हणून मान्यता जंतरमंतरवर जोरदार आंदोलन

नवी दिल्ली – लिंगायत समाजाला हिंदू धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, या मागणीसाठी आज दिल्लीच्या जंतरमंतरवर लिंगायत समाजाने जोरदार आंदोलन केले....
Read More
post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात एमआयएमचा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन

सोलापूर – गोपालसिंह समिती, सल्पर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाने मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी...
Read More