राम मंदिर नव्हे! पोटाची खळगी महत्त्वाची – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय लेख

राम मंदिर नव्हे! पोटाची खळगी महत्त्वाची

6 डिसेंबर 1992 सारखी परिस्थिती अयोध्येत निर्माण झाली होती. 15 दिवसांनंतर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचा दणदणीत पराभव होताच हे राम मंदिर उभारण्याचे आंदोलन तूर्त थंड पडले आहे. रथयात्रा, महाआरत्या आणि धर्मसंसदा सध्या थांबल्या आहेत. कारण सर्वात जास्त हिंदू असलेल्या आणि भाजपाचे बालेकिल्ले बनलेल्या मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील जनतेने हिंदुत्ववादी भाजपाला उखडून टाकले आहे. भारतातील ग्रामीण भागात राहणार्‍या 70 टक्के लोकांना पोटाला अन्न हवे आहे. त्यांना राममंदिर नको! राम मंदिरापेक्षा त्यांच्यासाठी पोटाची खळगी महत्त्वाची आहे. हे मतदानात दाखवून दिले आहे.

11 डिसेंबर हा भारताच्या राजकारणातील व लोकशाहीतील ऐतिहासिक दिवस आहे. या देशात दुसर्‍यांदा आलेली अघोषित आणीबाणी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगणाच्या लोकांनी रोखली आहे. विकास आणि विधायक लोकशाहीच्या बुरख्याआड केंद्रातील भाजपा सरकारची व सर्वेसर्वा नरेंद्र मोदींची हुकूमशाही देशभर हातपाय पसरवित असताना या भाजपाशासित राज्यांतील जनतेने मोदींच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. शेतात राबणार्‍या शेतकर्‍यांना नरेंद्र मोदींचा चौखूर उधळलेला अश्‍वमेधी घोडा अडवून परत पिटाळला आहे. नोव्हेंबर 2018 पर्यंत देशातील 29 पैकी 15 राज्यांत सत्ता असलेल्या भाजपाचा या तीन राज्यांनी नक्षा उतरविला आहे. सत्तेच्या मदमस्त नशेत कालपर्यंत भाजपा होती. आज हादरलेल्या स्थितीत भाजपा आहे. कारण भाजपा 2019 च्या लोकसभेच्या सेमी फायनलमध्येच घायाळ झाला आहे.
नानाजी देशमुख आणि कुशाभाऊ ठाकरेंची पुण्याई वाया गेली.

भाजपाची जननी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतभर पसरलेल्या शंभरावर संघटना आहेत. एकट्या संघाची सदस्य संख्या 50 लाख आहे. संघाच्या 75 हजार शाखा आहेत. भाजपाची सदस्य संख्या 10 कोटी आहे. संघाच्या 30 हजार एकल विद्यालयांनी आदिवासी भागात मुळे धरली आहेत. वनवासी विकास केंद्राचे जाळेही सर्वदूर पसरलेले आहे. कधी काळी सर्वात जास्त सदस्यसंख्या असलेला ‘भारतीय मजदूर संघ’ संघाचा आहे. विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दल हे त्रिशुलधारी ‘बंभोले हिंदुत्ववाद’ पसरविण्यात अग्रभागी आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थी संघटना संघाची आहे. स्वदेशी आंदोलन, मुस्लीम राष्ट्रीय मंच आणि विवेकानंद केंद्रासहित डझनावारी संघटना संघाने मजबूतपणे बांधल्या आहेत. हा हजार हातांचा ऑक्टोपस देशातील 80 कोटी हिंदूंना विळखा मारून बसला आहे. हिंदुत्वाचा व हिंदू राष्ट्राचा उन्माद जनतेच्या मनात भिनविण्याचे काम हा हजार हातांचा ऑक्टोपस करतो. भाजपा 2014 मध्ये मिळालेली सत्ता हा याच हजार हातांचा चमत्कार आहे.

मध्य प्रदेशात हिंदुत्वाच्या प्रचाराबरोबरच शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी यांच्यासाठी विकासकामे करणार्‍या संस्था संघाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख आणि भाजपा नेते कुशाभाऊ ठाकरे यांनी निर्माण केल्या. हेच विकासाचे व संस्थांचे जाळे देशमुख व ठाकरे यांनी छत्तीसगड, राजस्थान बिहारपर्यंत पोहोचविले. एवढे करोडो कार्यकर्ते, एवढे शेकडो उपक्रम, एवढ्या संस्था असूनही भाजपाचे राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात असा पराभव का झाला? नानाजी देशमुख व कुशाभाऊ ठाकरे यांची पुण्याई वाया का गेली? कारण एकच नरेंद्र मोेदी! त्यांनी शेतकर्‍यांना, कामगारांना व युवकांना निवडणूक जिंकण्यासाठी भरमसाठ आश्‍वासने दिली. बेरोजगार तरुणांना दोन कोटी नोकर्‍या देण्याची घोषणा केली. परदेशातून काळा पैसा आणि प्रत्येकाच्या बँक खात्यात 15-15 लाख रुपये जमा करण्याचे गाजर दाखविले. मोदींच्या योजना व त्यांची आश्‍वासने केवळ बुडबुडे ठरले. कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देऊन 1) जनधन योजना 2) उज्ज्वला योजना 3) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 4) शेतकर्‍यांसाठी पीक विमा योजना 5) दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, अशा 105 योजना नरेंद्र मोेदींनी जाहीर केल्या. मात्र या योजना म्हणजे गाजराची पुंगी होती. या योजना म्हणजे चक्क थापा असल्याचे देशातील तरुण, शेतकरी, महिला, मजूर, कामगार, आदिवासी, दलित, ओबीसी यांना कळून चुकले. त्यामुळेच त्यांनी तीनही राज्यांतून भाजपाला फेकून दिले. खोटे आकडे व खोटा तपशील असा दाटू-माटूचा खेळ खेळण्यात नरेंद्र मोदींनी साडेचार वर्षे घालविली.

सगळ्या संस्था बटीक बनविल्या

नरेेंद्र मोदी पंतप्रधान होताच त्यांनी सर्वप्रथम आपल्या अमित शहा या मित्राला भाजपाच्या अध्यक्षपदी बसविले. त्यानंतर संपूर्ण पक्ष ताब्यात घेतला. आडवाणी, यशवंत सिन्हा, जसवंतसिंह, खुराना, शत्रुघ्न सिन्हा यांना घरी पाठविले. त्यानंतर पक्षातील इतर नेत्यांना आपले ‘होयबा’ बनविले. रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला व नोटबंदीसारखा भयानक निर्णय घेतला. त्यामुळे देशातील उद्योगधंदे, व्यापार, छोटे छोटे व्यवसाय बंद पडले. रोजगार होते तेही गेले. त्यामुळे पोटाला चिमटा बसलेले मतदार चवताळले होते. तो राग त्यांनी मतपेटीतून व्यक्त केला.

एक देश, एक ध्वज, एक धर्म व एकच कर या मोदींच्या हुकूमशाही मानसिकतेतून जीएसटी नावाचा जिझिया कर देशभर सुरू झाला. हॉटेलमध्ये चहावरही जीएसटी कर लागू झाला. त्यामुळे हॉटेल, बार ओस पडले, दुकाने बंद झाली, व्यापार थंडावला. मोदींच्या मानसिकतेमुळे जनतेला त्राही भगवान करून सोडले. ज्यावेळी तरुणांना नोकर्‍या देण्यात अपयश आले तेव्हा त्यांना भजी तळायला व चहा विकण्याचा क्रूर सल्ला दिला. त्यामुळे तरुणांमध्ये संताप धुमसत होता, तो या तीन राज्यात मतपेटीतून बाहेर पडला.

आरबीआय पाठोपाठ सीबीआय, सीव्हीसी आणि ईडी (अंमलबजावणी संचालनालय) या संस्था नरेंद्र मोदींनी आपल्या दावणीला बांधल्या. केंद्रातील प्रशासनाचा तर त्यांनी पार ढांचा बदलून टाकला. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री फक्‍त मान डोलवायचे काम करतात. नरेंद्र मोदी व अमित शहा सांगतील त्याला मुकाट्याने ‘होय’ म्हणतात. तक्रार करण्याची व प्रश्‍न विचारण्याची कुणाच्यात हिम्मत नाही. सरकारची लोकशाही प्रक्रिया संपुष्टात आली आहे. लोकशाहीच्या नावाखाली मोदींची हुकूमशाही जोर धरत होती, अशा वेळी मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भाजपाला लोळविले. लोकांच्या मनात हाच संताप कायम राहिला तर 2019 मध्ये भाजपाचा सुपडा साफ होईल या भीतीने मोदींना ग्रासले आहे.
शेतकर्‍यांची हाय लागली.

एकीकडे आपले सरकार फक्‍त विकासाच्या ध्यासाने पछाडलेले आहे अशी जाहिरात करायची. मात्र प्रत्यक्षात सर्वांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा सपाटा सुरू आहे. संपूर्ण देशभर गेल्या 15 वर्षांत 3 लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. विकासाच्या बाता मारणार्‍या भाजपाशासित राज्यात साडेचार वर्षांत जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामध्ये मध्यप्रदेश हे प्रमुख राज्य आहे. तिथे शिवराजसिंह चौहानांच्या 15 वर्षांच्या काळात एकट्या 2016 या वर्षात 6867 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळेच 2017 च्या जून महिन्यात मध्यप्रदेशातील मंदसौर येथे शेतकर्‍यांनी उग्र आंदोलन केले. भाजपाच्या शिवराजसिंह सरकारने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये 5 शेतकरी ठार झाले. भात, मका, गहू, ऊस, शेंगदाणा, चणाडाळ, सोयाबिन, कापूस, मोहरी, पावटा ही पिके पाण्याअभावी करपून गेली. जी पिके आली ती कवडीमोल भावाने विकावी लागली अशी स्थिती असताना शेतकर्‍यांवरच गोळीबार केला जातो हे अत्यंत दुर्दैवी आहे.

जी परिस्थिती मध्यप्रदेशची तीच परिस्थिती राजस्थानची आहे. नोटबंदीमुळे तेथील पर्यटन आक्रसले. मका, गहू, बार्ली, डाळी, कडधान्ये व ऊस ही पिके पाण्यावर निर्भर असतात. त्यात राजस्थानातील अर्ध्या भागात वाळवंट असते. पश्‍चिम राजस्थानात पीक तेवढे येते. तेथेही कधी पाऊस नसल्याने किंवा अति पाऊस झाल्याने महापूरात पिके वाहून जातात. छत्तीसगड हा आदिवासीबहुल प्रदेश असल्याने येथील शेतकरी पारंपरिक पिकेच घेतो. त्यांच्याही पाचवीला दारिद्य्र पुजलेले !

मध्यप्रदेशात, राजस्थानात व छत्तीसगड या राज्यांतील शेतकर्‍यांना मोदींच्या पीक विमा योजनेचा लाभच झाला नाही. त्या विम्याचा हप्‍ता भरणेच कठीण गेले. बँकांची कर्ज मिळविण्याची प्रक्रिया एवढी जटील होती की, त्यांना बियाणे, खते घेण्यासाठी कर्ज मिळाली नाहीत. एकीकडे मोदी व त्यांचे पिट्टे असलेले त्या त्या राज्यातील मुख्यमंत्री कर्जमाफीचे आकडे जाहीर करीत होते, मात्र कर्जमाफी प्रत्यक्षात होत नव्हती. फक्‍त आकड्यांचे फुगे हवेत सोडले जात होते. कर्जमाफी फक्‍त भाजपा समर्थक कार्यकर्त्या शेतकर्‍यांना मिळत होती किंवा शेतकर्‍यांच्या नावावर भलतेच लोक कर्जमाफीची रक्‍कम लाटत होते. विम्याचे सरकारचे पैसे विमा कंपन्यांना मिळाले. विमा कंपन्यांचे उकळ पांढरे झाले. त्यामुळेच या तीन राज्यांतील शेतकरी संतापाने धुमसत होते. तो ज्वालामुखी मतपेटीतून उसळून बाहेर पडला. तीन राज्यांत काँग्रेस सत्तेवर आला.

लोकसभा निवडणुकीतील भाजपाने 32 जागा गमावल्या

राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील काँग्रेसच्या दणदणीत यशाचे श्रेय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेच आहे. त्यांचे कुशल नेतृत्व व संघटन कौशल्य या निवडणुकीत दिसले. त्यांनी तिन्ही राज्यांत झंझावाती प्रचार धारण केला. एरवी गालाला खळी पाडून सतत हसत हसत बोलणार्‍या राहुल गांधींनी आपला रुद्रावतार प्रचारसभांमध्ये दाखविला. नरेंद्र मोदी व भाजपा सरकार यांच्यावर राफेल विमान घोटाळा, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, 2 कोटी नोकर्‍यांचे गाजर, सीबीआय, सीव्हीसी, आरबीआयची मोडतोड या मुद्यावरून त्यांनी तुफानी हल्‍ला केला.

त्यातच त्यांना मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखा लढवय्या महाराज व कमलनाथ यांच्यासारखा अनुभवी सेनापती लाभला. कमलनाथ यांची रणनीति व व्यूहरचना आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांचा झंझावाती प्रचार यामुळे मध्यप्रदेशात भाजपावर नाराज असलेल्या जनतेने त्यांनाच आपले नेते मानले. राजस्थानातही अशोक गेहलोतसारखा चाणक्य व सचिन पायलटसारखा झुंजार लढवय्या लाभला. सचिन पायलटनी संपूर्ण राजस्थान पिंजून काढला. त्यामुळे अशक्य असलेला विजय मिळाला.

छत्तीसगडमध्ये ताम्रध्वज साहूसारखा लोकप्रिय नेता व सिंहदेव व बघैल यांच्यासारखे धनिक नेते लाभल्यामुळे काँग्रेसचा विजय सोपा झाला. परंतु खरे म्हणजे या तीनही राज्यात भाजपानेच भाजपाचा पराभव केला. भाजपाचा अहंकार, थापेबाजी व आश्‍वासनांचा भुलभुलैय्या यांना जनता विटली होती. भाजपा व संघ यांच्याकडे करोडो कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध फौज असताना झालेला हा पराभव भाजपा व संघामुळे नाही तर नरेंद्र मोदींच्या थापेबाजीमुळे व हुकूमशाहीमुळे झालेला आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे लोकसभेच्या अनुक्रमे 33, 25 व 10 जागा आहेत. या 68 लोकसभेच्या जागांपेकी काँग्रेसकडे सध्या फक्‍त 10 जागा आहेत. मध्यप्रदेशात 9 तर छत्तीसगडमध्ये 1 जागा आहे. राजस्थानात काँग्रेसचा 25 पैकी एकही खासदार नाही. त्याच राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतसंख्येनुसार लोकसभेच्या 12 जागा आताच जिंकल्या आहेत. तर मध्यप्रदेशात 9 जागांवरून तब्बल 20 जागांपर्यंत मजल मारली आहे. छत्तीसगडमध्ये 10 पैकी 9 जागा आताच जिंकल्या आहेत. 12+11+9=32 जागा काँग्रेसने आजच जिंकल्या आहेत. लोकशाहीतच असे चमत्कार घडतात. पोरकट म्हणून चेष्टा होत असलेल्या राहुल गांधींनी मोदींचा चौखुर उधळलेला बेफाम वारू रोखला आहे. हा पराक्रम अभूतपूर्व व न भुतो न भविष्यती असा आहे.
– –

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

आतापर्यंत ९ लाख २६ हजार १४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई – राज्यातील 52 हजार 427 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 11 जुलै पर्यंत राज्यातील 58 लाख 35...
Read More
post-image
आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक ६६१ रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवलीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येने ६०० चा आकडा ओलांडत १२ हजारांचा टप्पा गाठला आहे. आज कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वाधिक ६६१ रुग्णांची...
Read More
post-image
आरोग्य कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकीय

धारावी कोरोनामुक्तसाठी राजकीय श्रेयवाद, शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

मुंबई – दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. याची दखल खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली. मात्र त्यामुळे राज्यात आता नवा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

घोडे तबेल्यातून फरार झाल्यावर जाग येणार का? सिब्बलांचा थेट सवाल

नवी दिल्ली – राजस्थानमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट भाजपच्या वाटेवर आहेत. शिवाय त्यांच्यासोबत काही आमदारही फुटण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल...
Read More
post-image
महाराष्ट्र

लॉकडाऊनआधीच पुण्यात नवनियुक्त आयुक्तांनी स्विकारला पदभार

पुणे – पुण्यात उद्या १३ जुलैपासून लॉकडाऊन जारी करण्यात येणार आहे. त्याआधीच पुण्यात नवनियुक्त महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पदभार स्विकारला आहे. वाचा – धारावी...
Read More