जालोर – राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. जालोर जिल्ह्यातील महेशपुरा गावात एक बस रस्त्यावरुन जात असताना वीजेच्या तारेचा स्पर्श होऊन वीजप्रवाह संपूर्ण गाडीत पसरला. त्यानंतर बसने पेट घेतला आणि २० हून जास्त प्रवाशांना विद्युत प्रवाहाचा जबरदस्त झटका बसला. या भीषण दुर्घनटनेत सहा प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Rajasthan: Six died and seven injured as a bus caught fire after coming in contact with electric wire in Maheshpur of Jalore district, late last night (January 16).
“The injured have been referred to Jodhpur”, said Additional District Collector, Jalore. pic.twitter.com/TCXNVpImqv
— ANI (@ANI) January 16, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली ही बस रस्ता चुकल्याने गावात पोहोचली होती. ही बस मांडोलीहून ब्यावरकडे निघाली होती. मात्र रात्री रस्ता चुकल्याने ती महेशपुरा गावात आली होती. त्याठिकाणी ड्रायव्हरला रस्त्यावर एक वीजेची तार लोंबकळताना दिसल्यामुळे बस थांबवण्यात आली. तेव्हा क्लीनर बसच्या टपावर चढला आणि त्याने एका काठीच्या मदतीने वीजेची तार वर उचलून धरली. त्यानंतर ड्रायव्हरने बस पुढे नेली. मात्र तेव्हा क्लीनरच्या हातातली काठी सटकल्यामुळे वीजेची तार त्याच्या गळ्यात येऊन अडकली. क्लीनर बसच्या छतावर उभा असल्यामुळे वीजप्रवाह संपूर्ण बसमध्ये पसरला. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना वीजेचा झटका बसला. त्यानंतर वीजप्रवाहामुळे बसमध्ये आगही लागली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
जालोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सात गंभीर जखमींना जोधपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याशिवाय अन्य १३ प्रवाशांवर स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.