रत्नागिरी – वेधशाळेने काल कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. वेधशाळेचा हा इशारा खरा ठरला आहे. आज सकाळपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून रत्नागिरीत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच 15 जुलैपर्यत मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
मुसळधार पाऊस आणि उद्या अमावस्या असल्याने समुद्राला उधाण येण्याचा धोका आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सर्तकता आणि सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर समुद्रकिनारी असणाऱ्यांनी लाटांच्या जवळ जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत जिल्ह्यात 57 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल राजापूरात 84 मिलिमिटर, चिपळूणमध्ये 80 मिलिमिटर, संगमेश्वरात 75 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. येथे जून महिन्यापासून आतापर्यंत पावसाने १८०० मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे.