मुंबई – महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे, अशी महाआघाडीतील सर्वच पक्षांची मागणी आहे, असे प्रथमच खुद्द शरद पवार यांनी जाहीर केले. त्याचवेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यासाठी तत्वत: तयार असल्याची कबुली दिली. त्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारविनिमय करण्यासाठी वेळ मागून घेतली होती. नेहरू सेंटरमधील बैठकीनंतर उद्धव ठाकरे थेट महापौर बंगल्यावर गेले व तेथे त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे यांच्याशी विचारविनिमय केला. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तत्त्वत: तयार असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले.
त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली व सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी वेळ मागून घेतल्याचे संकेत मिळत आहेत.
उद्या महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होण्याचीही शक्यता आहे. सायंकाळी आघाडीची बैठक संपल्यानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, आज तिनही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला तिनही पक्षांचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सरकार स्थापनेबाबत सकारात्मक चर्चा झाली असून चर्चा असून संपलेली नाही. उद्याही चर्चा सुरू राहील,
असे सांगितले. आज वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या केंद्रीय आणि राज्यातील बड्या नेत्यांची ऐतिहासिक बैठक झाली.
या बैठकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यावर एकमत झाले. तसेच उद्या शनिवारीच महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे व संजय राऊत तसेच काँग्रेसचे केंद्रीय नेते अहमद पटेल, मल्लीकार्जुन खर्गे, के.सी.वेणूगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे अजित पवार, जयंत पाटील व छगन भुजबळ या महाआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंब्याची पत्रे दिल्याचे समजते. तसेच उद्याच राज्यपालांकडे सत्तेचा दावा करण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.
त्यापूर्वी आज सकाळी धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस-राष्ट्रवादी प्रमाणेच शेकाप, सपा, माकप, भाकप, रिपाइं(कवाडे), बहुजन विकास आघाडी आदी घटक पक्षांचे नेते हजर होते. या बैठकीत सर्वानुमते शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास सर्वांनी संमती दिली. समाजवादी पार्टीनेही शिवसेनेला पाठिंबा देताना उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी केली. तर जोगेंद्र कवाडे यांनी एक मंत्रिपद मागितले. याच बैठकीत या सर्व घटक पक्षांच्या पाठिंब्याची पत्रे घेण्यात आली.
त्याचवेळी शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची खलबते सुरू होती. शरद पवार यांच्या घरी काहीकाळ छगन भुजबळ, जयंत पाटील व अजित पवार यांची बैठक झाली.
त्यानंतर विधान भवनात काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे सर्व 44 आमदार हजर होते. या सर्व आमदारांच्या पाठिंबा पत्रावर सह्या घेण्यात आल्या. विधीमंडळाचा नेता निवडण्याचे अधिकार सोनिया गांधी यांना देणार्या दुसर्या पत्रावरही आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या. या सह्यांवरूनही काँग्रेसमधील मतभेद दिसून आले. या आमदारांच्या सह्या सत्ता स्थापनेच्या पाठिंब्यासाठी घेण्यात आल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. तर बाळासाहेब थोरात यांनी या सह्या केवळ किती आमदार हजर आहेत हे पाहण्यासाठी घेण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे काँग्रेसमधील सत्तेची रस्सीखेच उघड झाली.
