मुंबई – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतानाच मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ करण्यास राज्य सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई महानगरात १ मार्चपासून काळ्या-पिवळ्या रिक्षा-टॅक्सींच्या भाड्यात किमान तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने सोमवारी घेतला. सध्या रिक्षाचे भाडे १८ रुपये असून नवीन भाडेदरामुळे ते २१ रुपये, तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये होईल. मुंबई महानगरातील ज्या भागांत मीटर रिक्षा आणि टॅक्सी धावतात (मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीसह अन्य भागांमध्ये) तिथे १ मार्चपासून ही वाढ लागू असेल. कोरोना संकटकाळात रोजगार, उत्पन्न आक्रसले असताना प्रवाशांना भाडेवाढीचा हा भार सोसावा लागणार आहे.
खटुआ समितीच्या शिफारशीनुसार वर्षांतून एकदा जूनच्या पहिल्या तारखेस भाडेदरात सुधारणा करावी. प्रति किलोमीटर मूळ दरात ५० पैसे किंवा ५० पैशांपेक्षा जास्त वाढ देय असल्यास भाडे सुधारणा लागू करावी, असाही निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांत चालकांचे उत्पन्न बुडाले. त्यामुळे प्रत्येक महिन्यात प्रत्येक चालकाला किमान दहा हजार रुपये आर्थिक मदत करावी आणि रिक्षांसाठी घेतलेले कर्ज व्याजासह माफ करावे ही प्रमुख मागणी केली होती. परंतु सरकारने यातून पळवाट काढून आर्थिक मदत देणे टाळले व भाडेवाढ दिली. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व वेतनही कमी झाले. अशावेळी भाडेवाढ करुन सरकारने प्रवाशांचीही नाराजी ओढवून घेतली आहे. प्रवासी कमी होण्याची चालकांनाही भीती आहे. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत आहोत. आर्थिक मदत व कर्जमाफीसाठी रिक्षा चालकांकडून निवेदन मागवून ते शासनाला सादर करणार आहोत, असे मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी म्हटले आहे.
तसेच रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ मागे घेण्याची मागणी भाजपने केली असून ते न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवारी सरकारला दिला. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य मुंबईकरांवर आर्थिक बोजा टाकण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.