मुंबई – कोरोना संसर्गापासून चार हात दूर असलेल्या मुंबईच्या डबेवल्यांंनाही कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. कोरोनामुळे संतोष जाधव या ३९ वर्षीच्या डबेवाल्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील डबेवाला संघटनांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे.
मालाड येथे राहणारे ३९ वर्षीय संतोष रामचंद्र जाधव हे डबेवाले म्हणून गेली १५ वर्ष कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना ताप येत होता. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. उपचार सुरू असताना त्यांची तब्येत अधिक बिघडल्याने बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे आई, वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
मुंबईत कोरोना संसर्ग वेगाने पसरत असला तरी अजूनपर्यंत डबेवाले कोरोना आजारापासून दूर होते. परंतु संतोष जाधव यांच्या मृत्यूने डबेवालेही कोरोनाच्या कवेत आल्याचे दिसते. संतोष जाधव यांच्या मृत्यूने डबेवाल्यांना धक्का बसला आहे.
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये डबेवाल्यांंनीही आपली सेवा थांबवली होती. मात्र तरीदेखील बाधा झाल्याने सर्वांनी काळजी घ्यावी, तसेच डबेवाल्यांना काही समस्या आल्यास त्यांनी तात्काळ संघटनेशी संपर्क करण्याचे आवाहन मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केले आहे.