…मामाचे ‘पोस्ट’च हरवलं – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

…मामाचे ‘पोस्ट’च हरवलं

निदान महाराष्ट्रात तरी लहानपणी जवळपास प्रत्येकाने मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं. या प्रकारचा खेळ नक्कीच खेळलेला असतो. पत्र या प्रकाराशी मामाचा संबंध जोडून पत्र आणि प्रत्येक व्यक्ती यांच्या नात्यातला हळुवारपणाच नकळतपणे व्यक्त केला गेला. एकमेकांची हुशारी कळवण्याकरिता एकेकाळी अगदी प्रभावी माध्यम असलेला ‘पत्र’ हा प्रकार आता काळानुसार हळुहळू लोप पावत चाललेला आहे. परंतु जनसामान्यांच्या मनामध्ये अतिशय एकाअर्थी स्नेहपूर्ण स्थान निर्माण केलेले पत्र नावाची वस्तू टिकवून ठेवण्यासाठी ‘पोस्ट’ या संस्थेचे सर्वात मोठे योगदान ठरते. कारण एकमेकांविषयी कोणाला कितीही काही वाटत असले आणि त्या सगळ्या भावना एकमेकांपर्यंत पोहचवायच्या असल्या तरी तो व्यवहार पार पाडण्याकरिता तितक्याच भक्कम व्यवस्थेचीही आवश्यकता होती आणि म्हणून असे म्हणतात की, काही शतकांपूर्वी पाश्चात्य जगात पोस्ट संस्था अस्तित्वात आली. ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्याचे आणखीनच भक्कम जाळे बांधले गेले. जगभरात जवळपास सर्व देशांमध्ये ही पोस्टल कार्यपध्दती अनिवार्य ठरली. माहिती तंत्रज्ञान युगाची सुरुवातही झालेली नव्हती, त्या काळात व्यक्ती असो, समाज असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संबंधांविषयीची माहितीची देवाणघेवाण असो या सगळ्या गोष्टी पोस्टामार्फतच केल्या जात असत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोस्टल युनियन स्थापन झाली आणि या युनियनच्या एका बैठकीला गेलेले भारतीय सदस्य आनंद मोहन नरुला यांनी जागतिक पातळीवर पोस्टल डे म्हणजेच टपाल दिन साजरा करावा, अशी मागणी केली. युनेस्कोने ती मान्य केली आणि 1969 ला आंतरराष्ट्रीय टपाल दिन अस्तित्वात आला. या घटनेचे आज बरोबर पन्नासावे वर्ष सुरू होत आहे. त्यातली गौरवाची गोष्ट म्हणजे या टपाल दिनाची कल्पना एका भारतीयाने मांडली आणि ती स्वीकारली गेली. आता या टपाल दिनाच्या अर्धशतकी वाटचालीचा आढावा घेताना अनेक बदलांचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. केवळ पन्नास वर्षांमध्ये पोस्ट आणि पोस्टाशी संबंधित अनेक गोष्टींमध्ये बदल झालेले पाहायला मिळतात.

आता केवळ तंत्र शिल्लक आहे

आपल्या भारताचा विचार केला तर गेल्या वीसपंचवीस वर्षांत पोस्ट, पोस्टमन ही संकल्पना झटकन मागे पडली आणि त्याची जागा अनेक प्रकारच्या कुरियर व्यवस्थेने घेतलेली दिसून येते. चौकाचौकात असलेल्या किंवा झाडांनी लटकवलेल्या पोस्टाच्या लाल पेट्या आता दिसेनाशा झालेल्या आहेत. दिवसातून दोन वेळा पत्र टाकण्यासाठी येणारा पोस्टमन आता एकदाच येतो. पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असलेली कार पाठवण्याची व्यवस्था इतिहासजमा झाली. मनीऑर्डर हा प्रकार जवळपास संपुष्टात आलेला आहे. पूर्वी दहा-पंधरा पैशांत मिळणारे हाताच्या पंजाच्या आकाराचे पोस्टकार्ड किंबहुना आंतरदेशीय पत्र अतिशय क्वचितपणे डोळ्यांना दिसते. मुळातच त्याचा वापर प्रचंड प्रमाणात कमी झालेला आहे. पोस्ट कार्यालयांची संख्यादेखील आता पूर्वीइतकी राहिलेली नाही. परिणामी पोस्ट त्यातून येणारी हुशारीची किंवा अनेक प्रकारचे शुभ वर्तमान कळवणारी पत्र संकल्पना नामशेष होत चालली आहे. पूर्वीच्या काळी आठ-पंधरा दिवसांत नातेवाईकांकडून एखाददुसरे जरी पत्र आले नाही, तरीसुध्दा त्याचा राग धरला जात असे, चिंता व्यक्त केली जात असे. अरे काही नाही तरी एक साधे पत्र तरी टाकायचे असे सांगून त्या साध्या पत्रातल्या अतिशय मौलिक भावना स्नेह, प्रेम, वात्सल्याचे दर्शन घडवित असत. कालचक्राचा वेग सध्या इतका प्रचंड आहे की, तंत्रज्ञानाच्या धबडग्यामुळे सगळ्याच गोष्टी तांत्रिक स्वरूपाच्या होऊ लागल्या आहेत. म्हणूनच मामाकडून किंवा माहेरच्या लोकांकडून पत्ररूपी मिळणारी ही किंबहुना नातेवाईकांसाठी असलेली स्नेहपूर्ण शिदोरी मिळेनाशी झाली आहे. मोबाईल, इंटरनेट यासारख्या गोष्टी जरी आल्या असल्या तरी भावनिक स्तरावर साथसंगत करणारी पत्रव्यवस्था हरवल्याचीच खंत अनेकांना जाणवत असावी. आंतरराष्ट्रीय टपाल दिनाच्या निमित्ताने टपाल या व्यवस्थेचेच मुक्काम पोस्ट बदलले असल्याचे दिसून येते. काळाच्या ओघात केवळ मामाचेच नव्हे, तर मामाच्या गावचे पोस्ट हरवले आहे. असे वाटल्याशिवाय राहात नाही. समाजव्यवस्थेमध्ये दैनंदिन व्यवहारासाठी जेव्हा एखादी कार्यपध्दती स्वीकारली जाते आणि ती जेव्हा प्रदीर्घ काळ टिकून राहाते, यावरून तिची उपयुक्तता आपोआप सिध्द झालेली असते.

नातेसंग्रहाचे प्रभावी माध्यम

आपल्या घरी रोज काही ना काही टपाल येणे ही गोष्टदेखील मनाला सुखावह वाटत असे. यावरून आपला नातेवाईकांशी किंवा समाजाशी असलेला संबंध स्पष्ट होत असे. लोकसंग्रहाचे किंवा नातेसंग्रहाचे टपाल हे महत्त्वाचे निदर्शक मानले जात असे. आज या व्यवस्थेची जागा तंत्रज्ञानाने घेतली आहे. मोबाईलवरचे एसएमएस, व्हॉटसअप, फेसबुक किंवा पत्राऐवजी फोनवरूनच प्रत्येकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असतो. बदलत्या काळाची ही आवश्यकता आहे आणि आता त्याला दुसरा इलाज नाही. या सगळ्या गोष्टी मान्य करूनही पत्राविषयीची प्रेम किंबहुना पत्रातून व्यक्त होणार्‍या प्रेमाची किंवा त्या वेगळ्याच भावनांची जागा ही यातली नवी कोणतीही माध्यमे घेऊ शकत नाहीत. जुन्या जाणत्या मंडळींना ही पत्र किंवा पोस्ट व्यवस्था अजूनही महत्त्वाची वाटते. काही लोक अगदी आवर्जून पोस्टात जाऊन पत्र विकत घेतात आणि पाठवतात. विशेषत: दिवाळी, लग्नसमारंभ अशा शुभप्रसंगाच्यावेळी या पत्रमय शुभेच्छा किंवा ती मंगलमय निमंत्रणे प्रत्येकालाच हवीहवीशी वाटतात. अजूनही अनेक ठिकाणी लग्नाची पत्रिका आली तरी वेगळे पत्र आले नाही म्हणून राग धरून बसणारी मंडळी आहेत. पत्राच्या निमित्ताने जपली जाणारी नाती, संस्कृती वर्तमानाला हाताशी धरून भूतभविष्याचेच जतन करणारी म्हणावी लागते. आजच्या वेगवान युगामध्ये कितीही वेगवान साधने उपलब्ध झाली, तरी मनाला शांत, नितळ आणि निष्पाप प्रेमाची भूक कायम असते. त्याचे जतन टपाल व्यवस्थेच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना होत होते. अशा या अर्धशतकी टपाल दिनाच्या तुम्हा आम्हा सर्वांनाच शुभेच्छा.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मंदिरांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप नको – रजनीकांत

चेन्नई – केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र महिलांच्या प्रवेशाला मज्जाव करण्यात आला....
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय

कर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका आज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत...
Read More