मुंबई- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीत धनगर आणि मुस्लिम समाजालाही सुरक्षा मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही राहणार आहे. वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरेल असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. या संदर्भात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष न्या. एम.जी. गायकवाड यांची भेटही घेतली.
विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार उपस्थित होते. या बैठकीत धनगर आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, यासंदर्भात चर्चा झाली. राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मराठा समाजाती पाच तरूणांनी आपला जीव गमावला आहे. सरकार फक्त आश्वासन देते. मराठा समाजाच्या मागण्यांचा अधिवेशनात प्रास्ताव मंजुर करून केंद्राकडे शिफारस करायला हवी. घटना दुरुस्ती झाली पाहिजे ही आमच्या पक्षाची भुमिका असल्याचे नवाब मलिक यानी सांगितले.