मुंबई - विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांविषयी जागरूकता व देशाचा आदर्श नागरिक घडविण्याच्या दृष्टीने उत्तरप्रदेशच्या धर्तीवर मुंबईसह महाराष्ट्रात जवळपास एक हजार पाठशाळा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी दिली. १ जूनपासून किमान ५०० पाठशाळा महाराष्ट्रभर सुरु करण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक शिक्षकांना व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रातील आव्हाने आणि नवनवीन तंत्रज्ञान लक्षात घेता या स्पर्धेत आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी उत्तर प्रदेशातील भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेने एक हजार भीम पाठशाळा उत्तर प्रदेशात सुरु केल्या आहेत. दिल्ली-आग्रा या ठिकाणी ५०, बिहार १००, छत्तीसगड-५०, मध्यप्रदेश - १०० हरियाणा येथे १०० पाठशाळा भीम आर्मीच्या वतीने सुरु करण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील जिल्हा, तालुका व ग्रामीण भागात किमान ५०० पाठशाळा सुरु करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती कांबळे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या सुट्टीच्या काळात तसेच त्यांच्या सोयीने या पाठशाळा सुरु होतील. महाराष्ट्रातील समाजकल्याण केंद्रे तसेच खाजगी जागेत प्रारंभी या पाठशाळा सुरु करण्यात येतील. प्राथमिक, माध्यमिक, तसेच महाविद्यालयीन विद्यर्थ्यांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या या पाठशाळेत कोणतीही फी आकारण्यात येणार नाही. शिक्षणासोबतच देशातील थोर महापुरुष आणि त्यांचे देशासाठी आणि जनतेसाठी असलेल्या योगदानाबाबत या पाठशाळांमध्ये जनजागृती केली जाईल, या माध्यमातून राष्ट्रभक्तीने प्रेरित आदर्श विद्यार्थी घडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगतानाच स्वयंप्रेरणेने पुढे येणाऱ्या शिक्षकांना यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहीतीही कांबळे यांनी दिली आहे.
Sharing is caring!