मुंबई- भाजपा मंत्र्यांच्या साखर कारखान्यांना दिलेली 310 कोटींची बॅँक हमी रद्द करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतला आहे. उद्धव सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि भाजपाचे दरवाजे ठोठावून आलेले कॉँग्रेस नेते कल्याणराव काळे यांना मोठा दणका बसला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी बँक हमी आणि खेळत्या भांडवलापोटी या चार नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालीन फडणवीस सरकारने 310 कोटींची मदत दिली होती. पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला 50 कोटी, धनंजय महाडिक यांच्या भीमा साखर कारखान्याला 85 कोटी, विनय कोरे यांच्या श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याला 100 कोटी आणि कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याला 75 कोटींची हमी देण्यात आली होती. आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारने या चार नेत्यांच्या साखर कारखान्यांना बॅँक हमी का दिली याची माहिती घेतली. यात राजकीय हेतूने कारखान्यांना बॅँक हमी दिल्याचे आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला.
