बाबासाहेबांचे स्मारक हा सन्मानाचा विषय – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

बाबासाहेबांचे स्मारक हा सन्मानाचा विषय

कर्जबाजारीपणा वाढला की दिवाळखोरीचे डोहाळे लागतात आणि मग स्वत:कडच्या जेवढ्या काही वस्तू शिल्लक असतील त्यादेखील गहाण ठेवण्याची भाषा सुरू होते. सध्या महाराष्ट्राच्या वाट्याला असेच दिवस आलेले दिसतात. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक बांधण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, वेळ पडली तर राज्य गहाण ठेवून पैसा उभा करू, असे फार मोठे पुरुषार्थ दाखवणारे उद्गार महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत. नेमकी राज्य गहाण ठेवण्याची भाषा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भातच का करावी, हेही एक आश्चर्यच म्हणावे लागते. ज्याअर्थी थेट राज्य गहाण ठेवण्याची भाषा आणि तीही मुख्यमंत्र्यांकडून केली जाते, त्यावेळी त्यातून दोन गोष्टी अतिशय स्पष्ट होतात एक म्हणजे राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीवर डोळा ठेवून राजकीय फायद्यासाठी असे वक्तव्य केले जात असावे. खरेतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्यांच्या स्मारकाच्या उभारणी करिता सन्मानाने सर्व मार्गांनी पैसा उभा केला जाईल, असे अभिमानपूर्वक वातावरण निर्माण करणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य ठरते, पण त्यांनी गहाण ठेवण्याची भाषा करून स्मारकाच्या विषयाला अनाठायी वेगळेच वळण लावण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. सरकारची अवस्था जर इतकी मेटाकुटीला आलेली असेल तर या महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस आपल्या कमाईतला पैसा देऊन ते स्मारक उभारण्याचा संकल्प पूर्ण करू शकतो. त्यासाठी तो वाटेल ते कष्टही सहन करायला तयार होईल. आज अक्षरश: अब्जावधीचा पैसा नको त्या योजनांवर उधळला जातो. त्या सर्व खर्चामध्ये पाच टक्क्यांची जरी काटकसर झाली तरीसुध्दा वर्षाकाठी काही हजार कोटींच्या रकमेची बचत होऊ शकते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबरोबरच अनेक कल्याणकारी योजनांना पैसा उपलब्ध होऊ शकतो, परंतु आज वाईन उत्पादकांना कर माफ करणे, साखर कारखान्यांना अनुदान देणे, सूतगिरण्यांना पॅकेज उपलब्ध करून देणे, दूध संघांना वाढीव निधी देणे, आमदार, खासदार, नगरसेवकांच्या मानधनामध्ये भरमसाठ वाढ करणे, त्यांच्या निवासस्थानांकरिता शेकडो कोटी रुपयांचा चुराडा करणे अशी ही यादी इतकी मोठी लांबवता येईल की महाराष्ट्रच्या एकूण अंदाजपत्रकापैकी पंचवीस टक्के रक्कम ही अतिशय नियोजनपूर्वक पैसा वापरला तर वाचवता येऊ शकते.

दिवाळखोरीचे डोहाळे

ज्या वेळी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा डोलारा डगमगू लागतो त्यावेळीच अशा प्रकारची विधाने होत असतात. आज महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. शिवाय समृद्धी महामार्गाकरिता चाळीस हजार कोटींचे कर्ज नव्याने उभारले जात आहे. बुलेट ट्रेनसाठी पन्नास हजार कोटींचा वाटा राज्य सरकार उचलणार आहे. या योजनांकरिता सरकार बरोबर पैसा उपलब्ध करून देऊ शकते. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या वेळी राज्य गहाण ठेवण्याची भाषा का तोंडात येते हे स्पष्ट झाले पाहिजे. स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत हालअपेष्टा सहन करून आयुष्य यशस्वी करून दाखवले. अगदी या देशाचे संविधान बनवितानासुद्धा कोणत्याही मोठ्या सरकारी सोयीसुविधा त्यांना मिळाल्या नव्हत्या. हा देश लोकशाही मार्गाने नीट चालावा. सामान्य माणसाची राज्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. समता, बंधुता, स्वातंत्र्य या तीन गोष्टींचा त्याला लाभ व्हावा. प्रत्येकाला जगण्याकरिता किमान गोष्टी उपलब्ध झाल्या आणि प्रत्येकाच्या किमान आर्थिक गरजा पूर्ण झाल्या की मगच समता प्रस्थापित होऊ शकते. देशाचे सर्वार्थाने संवर्धन करणारे संविधान ज्यांनी निर्माण केले त्यांच्या स्मारकाकरिता तितक्याच सन्मानाने आणि परिश्रमपूर्वक पैसा निर्माण करण्याचा संकल्प अपेक्षित ठरतो. आज राज्याच्या तिजोरीला भगदाड पाडून भांडवलदार, व्यापारी, बिल्डर, कंत्राटदार पैशांची लूट करीत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचे धाडस राज्यकर्त्यांकडून दाखवले जात नाही. आणि ज्या मूलभूत कामांसाठी पैशाची आवश्यकता आहे, तेव्हा मात्र दिवाळखोरीची भाषा केली जावी हे अत्यंत चुकीचे ठरते. उद्या राज्य सरकारने जरी हात वर केले आणि पैसा नसल्याचे वातावरण निर्माण केले तरीसुद्धा या राज्यातील सामान्य जनतेच्या सहभागातून हे भव्य स्मारक आकाराला येऊ शकते. सरकार करेल आणि मगच स्मारक उभे राहील, अशा भ्रमात सरकारने राहू नये.

दुर्दम्य इच्छाशक्तीच हवी

खरेतर त्या स्मारकाची उभारणी महाराष्ट्रासाठी अतिशय गर्वाचा विषय ठरतो. असे भव्य स्मारक उभारण्याची संधी महाराष्ट्राला मिळत असताना त्याचे सोने करण्याऐवजी राज्यकर्त्यांच्या बुद्धीचीच कशी माती झालेली आहे हे या विधानावरून स्पष्ट होते. कदाचित मुख्यमंत्र्यांचे हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानावर अजून गेलेले दिसत नाही. अर्थशास्त्रावर किंबहुना सक्षम अर्थकारणासाठी बाबासाहेबांनी दोन मोठे प्रबंध लिहिले होते. अर्थव्यवस्थेचे चिंतन करणार्‍या या महामानवाला आदरांजली म्हणूनच खास ‘भीम अ‍ॅप’ची सुरुवात केली गेली आणि अनेक सरकारी योजनांच्या निधीकरिता किंवा पैशांच्या देवाणघेवाणीकरिता हे ‘भीम अ‍ॅप’ प्रकाशित केले गेले. वेळ पडली तर एकटे केंद्र सरकारसुद्धा या स्मारकासाठी आतापेक्षा दुप्पट पैसा उपलब्ध करून देऊ शकेल. असा पैसा केंद्राकडूनही आम्ही मिळवू, अशी जिद्द दाखवणारी भाषा न करता तारण किंवा गहाण ठेवण्याची विधाने मुख्यमंत्र्यांनी करावीत हे एकाअर्थी दुर्दैव ठरते. कोणाच्या कृपेमुळे आणि राज्य गहाण ठेवण्याच्या कल्पनेतून अशी स्मारके उभी राहात नसतात. जनतेच्या मनात या महामानवाविषयी फार मोठे आदराचे स्थान आहे आणि त्यांच्या सन्मानासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती सामान्य जनतेकडेच असते. त्या इच्छाशक्तीतूनच या स्मारकाची मागणी होत राहिली. आता ती तितक्याच भक्कमतेने पूर्ण झाली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी असे विधान करून राज्याच्या दिवाळखोरीबरोबरच आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचेही प्रदर्शन केले आहे, असे म्हणण्याशिवाय पर्याय राहात नाही.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय

कर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका आज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

साईच्या चरणी विक्रमी दान

शिर्डी – शिर्डीत साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या 4 दिवसांमध्ये भाविकांनी तब्बल 5 कोटी 96 लाखांचे विक्रमी दान अर्पण केले आहे. या सोहळ्याला तीन लाख...
Read More