श्रीनगर – काश्मीरमधील दहशतवाद्यांना फंड पुरविल्याप्रकरणी एनआयएच्या रडारवर आलेले फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी अखेर ‘तहरीक-ए- हुर्रियत कॉन्फरन्स’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या स्थापनेपासून सलग 18 वर्ष त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते मुहम्मद अशरफ सेहराई यांची हुर्रियतचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
टेरर फंडिंग प्रकरणात नाव आल्यानंतर तपास यंत्रणेच्या कारवाईच्या भीतीने गिलानी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे समजते. 2001 मध्ये हुर्रियतची स्थापना झाली. तेव्हा पासून त्यांनी संघटनेचे अध्यक्षपद सांभाळले होते. दरम्यान, आयबीने एका अधिकार्यामार्फत चर्चेची ऑफर दिली होती. मात्र आपण ती नाकारल्याचे गिलानी यांनी शुक्रवारी म्हटले होते.
