जालना – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचीच सत्ता असणार, या निवडणुकीतले विजय आमची ताकद दाखवणारे असतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला आहे. आज जालन्यात आयोजित राज्य भाजप कार्यकारिणी बैठकीदरम्यान ते बोलत होते. पालिका निवडणुकांमध्ये ३ ठिकाणी भाजपचा विजय झाला तर आता पुढची कार्यकारिणी बैठक ही विजयानंतरच असा विश्वास त्यांनी दिला. २०१९ ची निवडणूक नव्या पर्वाची निवडणूक असेल आणि राज्यातील जनता भाजपच्याच पाठीशी असेल असे ते म्हणाले.
मला खुर्ची कशी मिळेल धोरण, मोदी हटाव धोरण राबवत आहे. विरोधकांकडे नीती नाही, नियम नाही आणि धोरणही नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या यात्रेवर कडाडून टीका केली. गेल्या ६० वर्षातले खड्डे ५ वर्षात बुजवता येतील का असा सवालही त्यांनी विचारला. मोदी सरकार हे गरिबांसाठी काम करणारे सरकार असून गेल्या ४ वर्षांत या सरकारने दुप्पट काम केले आहे. जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे असे सांगत त्यांनी पिकविम्याच्या आरोपांना थेट उत्तर दिले.