नवी दिल्ली – दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांची चिंता प्रचंड वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये झालेली वाढ आणि केंद्र व राज्य सरकारकडून इंधनाच्या मूळ दरावर आकारला जाणारा कर अशी या इंधन दरवाढीची दोन कारणे सांगितली जात आहेत. मात्र अशातच काही राज्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेत कर कमी केला आहे. नागालॅण्डमधील सरकारनेही इंधनावरील कर कमी केला आहे. नागालॅण्ड सरकारच्या अर्थ विभागाच्या सचिवांनी जारी केलेल्या एक पत्रकातून याबाबत माहिती देण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्यात आले असून नवे दर हे २२ फेब्रवारीपासून लागू झाले आहेत.
नागालॅण्ड सरकारने पेट्रोलवर आकारण्यात येणारा कर २९.८० वरुन २५ टक्क्यांवर आणला आहे. म्हणजेच आता या राज्यात प्रति लिटर पेट्रोलसाठी १८.२६ रुपये कर देण्याऐवजी १६.०४ रुपये कर मोजावा लागणार आहे. तर डिझेलवर आता ११.०८ रुपयांऐवजी १०.५१ रुपये कर द्यावा लागणार आहे. एकंदरीतच एक लिटर पेट्रोल २.२२ रुपयांनी, तर डिझेल ५७ पैशांनी स्वस्त झाले आहे. तसेच यापूर्वी पश्चिम बंगाल, राजस्थान, आसाम आणि मेघालयमधील राज्य सरकारांनी इंधनावरील कर कमी करण्याची घोषणा केली होती. राजस्थानमधील श्रीगंगानगर आणि हनुमानगढ जिल्ह्यात पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरहून अधिक झाले होते. त्यानंतर राजस्थान सरकारने इंधनावरील कर ३८ टक्क्यांवरुन ३६ टक्क्यांवर आणला.